कालच्या कविता सदरात आपण लता दिदींविषयीच्या काही भाव कविता सादर केल्या.
पण त्या नंतरही कवितांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे आजही वाचू या काही कविता….
१.
शब्दांजली
ईश्वरा ही मोह पडला जणु सूर रंगी रंगण्याचा
कां ऋषींना ध्यास जडला स्वर समाधी शोधण्याचा
काळास ही वाटे विचारू कां प्राण रसिकांचा हिरावे
दृष्टीस तुझीया कां न आला अन्य पाचोळा जीवांचा
नव्हती लता तो ताल होता सूरासवे रंध्रात भिनला
ठाव हृदयांचा अलौकिक स्पंदनी विश्वात भ्रमला
आतां रितेपण या श्रुतीना आणि कोलाहल स्मृतींचा
शब्द थिजले भाव बुजले सरगम पहा अश्रूत भिजला
गीत गावे कां लिहावे प्रतिभाच बघ कोमेजली
आठवांचा डोह याची खोली कुणी कां मोजली
गीते तुझी घेतील जागा चांदण्यांची आतां नभी
प्रतिबिंब त्यांची अनुभवूही जागेपणी स्वप्नातली
दे जन्म मंगेशा पुन्हा तू मागे पुढे असशी पहा
श्रद्धांजली ना अर्घ्य हे तुज अर्पितो अरविंद हा
– रचना : अरविंद
२.
स्वर स्तब्ध झाले.
श्वास थांबला विश्वाचा जणू
सुर पोरके झाले
लतादीदींच्या जाण्याने
जग सैरभैर हे झाले
सप्तस्वरांची सम्राज्ञी ही
स्वरास सोडूनी गेली
मूक झाल्या दाही दिशा
अन् स्तब्ध झाली सावली
अडखळला तो खट्याळ वारा
रविकर आणि शाशिधर
गान सम्रlज्ञीचे वैभव
पाहू लागले सारे
संघर्षात सारे बालपण
तारुण्यात व्रतस्थ
लाखो सुरेल गाणी गाऊन
होत्या दिदी तटस्थ
वडील जाता लता छोटी ही
मोठी अचानक झाली
जबाबदारी भावंडांची
प्रेमाने पेलली
सुखदुःखाच्या दोन्ही क्षणांना
आधार जणू लाभला
विश्र्वामध्ये सुर दिदींचा
लोकप्रिय हा झाला
दैवी सुर हा असे लाभला
आपल्या लता दिदीना
स्वरामधूनी स्वर्ग निर्मिला
भारतामध्ये पुन्हा
सुर असा कधी झाला नाही
पुढे ही होणे नाही
शब्दसुमनांजली अर्पिते
लता दीदींच्या पायी
– रचना : प्रभावती अरुण मोरांणकर
३.
गान कोकिळा लतादीदी
तलम रेशमी सूर लोपले
संगीताचे अमृत संपले
वसंतात थिजले कूजन
आज सूर पोरके झाले
आज इला उदास भासली
लोचने तिची ही ओलावली
कंठ असा तिचा आला दाटून
एक साधिका तिची हरपली.
एकमेव ती माय स्वरांची
आज हरवली ती कायमची
ऋतुराजाचा मुजरा घेऊन
पंचतत्वी विलीन कायमची.
– रचना : राधिका इंगळे. देवास.
४.
स्वरसम्राज्ञी लता
सरस्वतीच तु रुप घेऊन
ह्या भूतलावर अवतरली
गोड सप्तसुरांनी मंत्रमुग्ध
केले गाऊन सकळी
कोकीळ कंठी गायनाने
गाजवली चित्रपट सृष्टी
अथक घेतल्या परिश्रमाने
लाभली स्वरांचीच दृष्टी
संगीतसागरी गानतपस्वी
झालीस तू अति ओजस्वी
पाहून तुझी ही गगनभरारी
भारत माता प्रसन्न मनस्वी
सूर तुझा राहील गुंजत
सदा सर्वदा ह्या गगनात
चिरंजीव अमर तुझे स्वर
ऐकीव आता ते स्वर्गात
सजल अश्रुपुर्ण नयनांनी
भारतवासीयांची श्रद्धांजली
भावपूर्ण शब्दांत अर्पितो
ही शब्दांचीच आदरांजली
– रचना : ॐप्रकाश शर्मा
५.
💠 शब्द मुके झाले 💠
शब्द मुके झाले
सूर अनंतात विलीन जाहले
वसंत बहरून आला
एक पान मात्र गळून पडले (१)
वसंताला बहर आला
पक्ष्यांची किलबिल वाढली
अवनिवरून उडून मात्र एक
कोकिळा स्वर्गी झेपावली (२)
गानकोकिळेच्या स्वागतासाठी
देव स्वर्गद्वारी उभे राहिले
पृथ्वीवरून तिला उडालेले पाहताच
पुष्पवृष्टी करू लागले (३)
आज सूर हरवले भूमीवरचे
शोकात बुडाले लोक सारे
आसमंत स्तब्ध जाहला
शांत झाले सभोवतालचे वारे (४)
स्वागतास अप्सराही सज्ज जाहली
स्वर्गात सुरांची आनंद मैफिल सजली
देव गंधर्व जिच्या पायी पडले
ती गानसम्राज्ञी तिथे गाऊ लागली (५)
दैवी सप्तसूर पुनश्च
स्वर्गी जाऊन स्थिरावले
सरस्वतीच्या उत्तरपूजेस
स्वरमंडल अर्पित करवले (६)
दुःखात बुडाले मनुष्य प्राणी
उत्सव सुरू जाहला स्वर्गात
हरवलेला आवाज परत आल्याचा
आनंद मावेना गगनात (७)
-✍️ तनुजा प्रधान, अमेरिका 💙🌷🌿
६.
गानसम्राज्ञी लतादिदी
श्याम वर्णी कांती |. मधुर भाषीनी
सुरात संगिनी. | लता दीदी/१/
भावंडात नाते. |. हृदयी जपले
विद्वत्ते लाभले | कौतुकाचे /२/
जन्मा आले रत्न |कृपा सरस्वती
पूजे गणपती| सार्ध होती/३/
खडतर दिन | रगडे दगड
फुटला पाझर | चैतन्यात/५/
स्वरांची झंकार | नस नाडी वाहे
विश्वंभर पाहे | आश्चर्यात/६/
गान कोकीळेचे | वेड चराचरी
आनंदाच्या सरी | चैतन्यात/७/
वसंत पंचमी | धावलासे काळ
दुनिया घायाळ | घरोघरी /८/
झाल्या लाटा स्तब्ध | पवन खिळला
देह विसावला | अनंतात/९/
नाना भाषेतील | स्वरांची सम्राज्ञी
ईश पदी राज्ञी. |. विसावली/१०/
आज नाही उद्या. | ना बरसणार
नामे गर्जणार. | युगयुग /११/
– रचना : सौ.शोभा प्रकाश कोठावदे
७.
स्वर्गीय नाद
अनादी अनंत
स्वर हा गुंजे
धरती अंबर
मंजुळ वाजे
निनाद नदीचा
स्वर हा वीणेचा
ऋतुराज बहरे
ऐकून स्वरलतेचा
चहूकडे तो सूर
तृप्त हर एक उर.
स्वर्गीय आनंद
धरा धुंद – मूंद
– रचना : फरझाना इकबाल
8.
स्वरमाधुरी
स्वरमाधुर्याचा गाभारा
सरस्वतीचा देव्हारा
आनंदाचा फुलोरा
सुस्वरांचा मंद वारा
स्वरगंधर्वांचा निवारा
वीणेच्या झणत्कारा
साथ देती स्वरधारा
मंजुळमृदुलतेचा सहारा
गानकोकिळेच्या सुस्वरा
जिंकला विश्वपसारा
नादब्रह्माचा हा सोहळा
हा स्वरलतेच्या गळा।
कौतुकासाठी शब्द अपुरे
स्वरगुंजन हृदयी उतरे
अथांग सागरी संगीत झरे
अनिलाच्यासंगे बहरे
सुगंधपरिमळ पसरे
लोचनीअश्रुतून झरे
आनंदोर्मिनी हर्ष विहरे
मयुरनर्तन स्मरे
स्वरलतेच्या सुस्वरे
अवघे नवरस अवतरे
हृदयकुपीत साठवून सारे
क्षणोक्षणी संगीत निर्झरे
तव स्वराने धुंद सारे
लतादीदी स्मृती गंध न विसरे
विश्वव्यापी मधुर स्वरे
तुझे हृदयी स्थान खरे
स्वरमाधुर्याचा हा सोहळा
प्रत्येक हृदयी आनंद आगळा
आता तुझ्या नसण्याने
पोकळीच्या जाणिवेने
सारे ओस वाटे उदासमने
तुझ्यासारखी तूच स्वराने
गुंगविले मधुर आलापाने
स्वर्गगंधार नादमाधुर्याने
गायिलिस देवांची स्तवने
स्वर बहरले गोड भजने
बालगीतेही अल्लडतेने
प्रीतगीते भारिली प्रेमरसाने
देशगीतेही देशप्रेमाने
मातृगीतेही मायाममतेने
संगीताचे स्वर आर्ततेने
सुस्वर कंठे जिंकले जने
हे स्वरलतिके, तव स्मृती सोहळा
स्वरझपुर्झ्याचा वसे मनी हिंदोळा
हृदयंगम हे वंदन लतादीदी तुजला
स्मरण सदैव तव स्वरमाधुर्याला।
– रचना : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
९.
अजातशत्रू
ठायी ठायी अस्तित्व तुझे
आज सूर थांबले
शब्द मूक झाले
घरांघरांतुनी सारे
स्तब्ध जाहले !
कणखर सैनिकाच्या
डोळां आज पाणी आले
ऐशी वर्षें दशदिशा
सूर तुझे निनादले
अंगाईगीताने तुझ्या झोपणारं
बाळ बालगीतात रमले
कोणत्याच शाळेतील कार्यक्रम
तुझ्या गीताशिवाय नच जाहले
तरुणपण त्यावरच लहरले
पन्नाशीतही फुलत राहिले
वृद्धत्वात आठवणीत हरवले!
तू गेलीस? खरंच गेलीस?
मन पुन्हां पुन्हां विचारत राहिले!
केवळ सूर नव्हेत,
तुझा नम्रपणा बोलण्यात आपुलकी
साधेपणा अन् जाज्वल्य देशभक्ती
प्रत्येक गाणं उमललं हृदयापासुनी
म्हणूनच भिडलं प्रत्येक अंतःकरणी !
‘किताब उपचारपुरता
भारतरत्न नेहमीच होतीस
राज्य तुझे मनामनावर कधीचंच
लहान-थोर साऱ्यांचीच होतीस !
उगाच नाही आज शिवाजी पार्कवर
धावला जो तो तव वंदन करण्यास
सच्चे कुणी तकलादू स्वार्थी…
समस्त बॉलिवुड मंडळी
एकमेकां पाण्यात पाहणारे
सारे पुढारी
राग लोभ द्वेष सारे विसरूनी
जमली तुजसाठी गं सारी !
इथे नव्हती
जात,पंथ,धर्म,भाषा
तुझ्यावरील प्रेमाशिवाय
कशास नव्हता थारा
राऊळातही मागणीशिवाय
गेले नसतील कधी
आज धावले तसे
निर्लेप नसतील कधी!
“अजातशत्रू” चा अर्थ
आज कळला खरा
अलौकिक तू, अद्वितीय तू
त्यजलेस शरीर
सूररूपे अमर तू
प्रत्येक भारतीय हृदयांत
रोमारोमात आहेस तू !
– रचना : नीला बर्वे. सिंगापूर
१०.
स्वर मौन झाले….
गानकोकिळेचा आज थंडावला स्वर
मंगेशीच्या गाभाऱ्यात झाला अंधःकार
मधुमुलायम स्वर आज मौन झाले
स्वर्गी तिथे गंधर्वाचे डोळे पाणावले
स्वर्गाच्या वाटेवरती अत्तराचे सडे
दिदीच्या स्वागताला देव सारे खडे
अशी स्वरलता आता पुन्हा होणे नाही
गानरुपी भेट मात्र सदा होत राही
तिच्या गाण्यासाठी मना लागे पिसे
लता दीदी आमच्या हृदयांतरी वसे
– रचना : उद्धव भयवाळ
११.
सूर लता दिदींचे…
खुशाल ने मज दूर
परंतु मृत्यू जरा सबुर
अखेरच्या क्षणी कानी पडू दे
माझ्या लता दिदींचे सूर ।।
गान कोकिळा सप्तसुरांनी
या विश्वाला घाली मोहिनी
ऐकून तिची अमृतवाणी
धन्य होऊ दे मज या जीवनी ।।
लता अस्मिता भारत भु ची
भासे मूर्ती जणू सरस्वतीची
कृपा तिजवरी मंगेशाची
दिली देणगी गोड गळ्याची ।।
सूर लतेचे भिडता गगनी
होते प्रमुदीत सारी धरणी
जाता जाता फुल श्रद्धेचे
मज वाहूदे तीचीया चरणी ।।
हात जोडूनी करतो विनवणी
होऊ नकोस असा निष्ठूर
अखेरच्या क्षणी कानी पडू दे
माझ्या लता दिदींचे सूर ।।
– रचना : सौ.अनिता नरेंद्र गुजर. डोंबिवली