भारत – चीन १९६२ चे युद्ध नुकतेच संपले होते. भारताचा दारुण पराभव झाला होता. ह्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारी १९६३ रोजी लतादीदींनी पंतप्रधान नेहरूंच्या उपस्थितीत
“ऐ मेरे वतन के लोगों
तुम भूल न जाना उन को
जो शहीद हुये है उनकी
जरा याद करो कुर्बानी”
हे गाणे अत्यंत आर्त स्वरात गायले होते. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
त्यानंतरही 1 मे, महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात, हिंदुसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्य मंत्री श्री. मनोहर जोशी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पुन्हा ते गाणे त्यांनी सादर केले. हजर असलेले हजारो लोक भावनांनी भारावून उभे राहिले. सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले.
हे दीदींच्या अनेक गाण्यापैकी एक अजरामर गाणे ! जिथे जात तिथे हे गाणे म्हणण्याचा त्यांना आग्रह होई. अत्यंत आर्त पणे, अंतःकरणाच्या तळापासून, जीव ओतून दीदींनी गायलेले. प्रत्येक ओळीतून त्यांचा सैनिक व शहीदां बद्दलचा आदर व्यक्त होतो म्हणून अजरामर.
दीदींना सैनिकां बद्दल किती आदर होता ह्याचे उदाहरण म्हणून खालील स्वानुभव सादर करत आहे.
१९८८ – ८९ चे वर्ष होते. त्यावेळी माझे पती मेजर विनायक गुप्ते मुंबईला CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) चे मानद सेक्रेटरी होते. क्लब मध्ये काही कार्यक्रम होता. त्या साठी विशेष अतिथि म्हणून लतादीदींना आमंत्रण द्यायचे होते. दीदी इतकी महान व्यक्ती ! त्यांना निमंत्रण पोस्टाने/कुरियरने कसे द्यायचे ? म्हणून आपण स्वतःच त्यांच्या घरी नेऊन द्यायचे असा मेजर गुप्ते ह्यांनी निर्णय घेतला.
दीदींकडून भेटीची वेळ मागून घेतली. ठरल्या दिवशी बरोब्बर संध्याकाळी ५ वाजता मेजर गुप्ते दीदींच्या पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’ इमारतीत पोचले. आणि काय आश्चर्य ! मेजर गुप्ते ह्यांना बेल सुद्धा वाजवावी लागली नाही. स्वतः दीदींनी, हो ! हो ! स्वतः दीदींनी दार उघडून, हात जोडून त्यांचे स्वागत केले. (त्यांच्याकडे नोकर किती असतील ! तरी स्वतः दार उघडले. केवढा मान !) वाट सुद्धा बघायला लावली नाही.
आपल्या मधाळ आवाजात “नमस्कार मेजर साहेब ! या. आत या. बसा !” सोफाकडे अंगुलि निर्देश करत त्या म्हणाल्या.
अर्थात इतक्या मोठ्या व्यक्तीसमोर मेजर गुप्ते बसले नाहीत. उभेच राहिले. ब्रीफकेसमधून निमंत्रण पत्रिका काढून, आदराने झुकून गुप्त्यांनी दीदींच्या हातात दिली व नम्र नमस्कार केला.
दीदी पट्कन म्हणाल्या,
“अहो ! तुम्ही मला नमस्कार कसला करता ? आम्हीच तुम्हाला सॅल्युट करायला पाहिजे. तुम्ही (सैनिक) सीमेवर प्राणपणाने लढता, सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही निश्चिंत असतो.
बसा तरी ! प्रथमच माझ्या घरी आलात ! चहा-बिस्कीट तरी घ्या !”
दीदींच्या प्रेमळ आदरातिथ्याने मेजर गुप्ते अवघडून गेले होते.
“माफ करा मॅडम ! पण कार्यक्रमाची खूप तयारी करायची आहे. घाईने निघायला हवे. अनुमति द्या !”
प्रथम भेट म्हणून दीदींनी स्वहस्ते मिठाईचा एक तुकडा त्यांच्या हातावर ठेवला. (हे भारतीय, संस्कार)
“पुन्हा सावकाशीने या मेजर साहेब ! निवांत बसून चहा-बिस्कीटांच्या जोडीने, मला तुमच्याशी आर्मी विषयी खूप गप्पा मारायच्या आहेत.”
त्यांच्या भेटीचा हा सुवर्ण क्षण आम्ही जपून ठेवला आहे. आमच्या सारख्या सामान्य लोकांना इतका आदर, प्रेम, आदरातिथ्य लतादीदींसारख्या असामान्य व्यक्ती कडून मिळावा हे केवढे भाग्य !
पुन्हा असा सुवर्ण योग आला नाही.
आज दीदी आपल्याला सोडून स्वर्गवासी झाल्या. स्वर्गात त्यांचे प्रत्यक्ष परमेश्वराने स्वागत केले असेल.
क्रिकेट आणि सैनिक ह्यांच्यावर दीदीं चे खूप प्रेम होते. c c। वर क्रिकेट मॅच असली की त्या आवर्जून हजर असत. क्रिकेट अंपायर ह्या नात्याने मेजर गुप्ते तिथे असायचे तेव्हाही त्या त्यांना आवर्जून भेटत. त्यांना त्या म्हणत….
“नमस्कार मेजर साहेब ! कसे आहात ? तुम्ही सैनिक पण आणि अंपायर सुध्दा ! मला तुमच्या बद्दल खूप आदर वाटतो !”
बाजूचे लोक आश्चर्याने बघत असायचे
मी लेखिका सुलभा गुप्ते, पती मेजर गुप्ते ह्यांनी सांगितलेला अनुभव शेअर करत आहे. त्यांच्या लाखो आठवणी लोकांकडे असतील पण माझ्या वाट्याला आलेला हा अत्यंत अनमोल, दुर्मिळ अनुभव आहे.
दीदी तर अजरामर आहेतच.
माझी विनम्र श्रध्दांजली 🙏

– लेखिका : सुलभा गुप्ते
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूप छान अनुभव share केलात तुम्ही सुलभाताई.
एक दुर्मीळ अनुभव लतादीदी बद्दल व सैनिकां बद्दल सार्थ अभिमान वाचायला मिळाले.
अत्यंत अनमोल आणि दुर्मिळ अनुभव वाचायला मिळाला आहे.. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.