गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे.
या निमित्ताने नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी गतवर्षी 28 सप्टेम्बरला लतादीदींच्या पहिल्या जयंती दिनी प्रकाशित केलेल्या “चिरंजीवी स्वरलता” या व्यक्तिरंग पुस्तिकेत समाविष्ट केलेला, श्री शशांक दंडे यांनी लिहिलेला पुढे देत आहे. दीदींना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
गानकोकिळा लता मंगेशकर यांना हे जग सोडून आज, ६ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले.
त्यांचे वडील आणि पहिले गुरू मास्टर दीनानाथ नेहमी म्हणायचे- “पोरी, तुझ्या गळ्यात देवदत्त गंधार आहे. तो जप.” दीदींनी तो जपला आणि पाऊणशे वर्षे सिनेसंगीतावर, उपशास्त्रीय संगीतावर अक्षरश: महाराणीसारखे राज्य केले. त्याच देवदत्त गंधाराबद्दल सांगत आहेत लतादीदींचे लहान भाऊ, अद्वितीय संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर…
त्या दिवशी आम्ही सर्व रेकॉर्डिंग करण्यासाठी एच. एम. व्ही. मध्ये जमलो होतो. रेकॉर्डिंग होते ज्ञानेश्वरीचे. “ॐ नमोजी आद्या” या ज्ञानेश्वरांच्या पहिल्या ओवीपासून ध्वनिमुद्रणाचा प्रारंभ होणार होता. सर्व वादक जमले होते, तालमी चालू होत्या, पण मनासारखे काही जमत नव्हते. कुठे ना कुठेतरी खटकत होते. मन स्वस्थ नव्हते.
तेवढ्यात दीदी आली. अगदी वेळेवर आली. वेळेचं महत्त्व ती जाणते. त्यामुळेच, इतके नाव होऊनही दीदीमुळे ध्वनिमुद्रण कधीही खोळंबत नाही. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिने कागद-पेन घेतलं आणि ज्ञानेशांच्या पहिल्या ओव्या ती कागदावर उमटवू लागली. तिची एक सवय आहे. दुसर्याने लिहिलेला गाण्याचा कागद घेऊन ती कधीही माईकसमोर उभी राहत नाही. आधी स्वतः गाणे लिहील, नंतरच माईकपुढे उभी राहील. गाणे उतरवून घेत असताना ती गुणगुणत रिहर्सल करते.
थोड्या वेळाने आम्ही कसेबसे वृंदवादन जमविले व दीदी माईकपुढे उभी राहिली. मी ध्वनिमुद्रकाच्या खोलीत गेलो. छानपैकी दोन तंबोरे सुरात मिळाले होते. दोघांचे सुर एकमेकात मिसळत होते. तेवढ्यात तिसरा सुर त्यात मिसळला- ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या…
मनाची अस्वस्थता पार पळाली. ते एका नव्याच जाणीवेने भरून आले. आपण या शब्दांना फार छान सुर दिलेत असे वाटू लागले. तोच दुसरा विचार मनात आला- अरे, दहा मिनिटांपूर्वी काही जमत नाही म्हणून मन खट्टू झालं होत, तोच हा अहंकार ! अरे, ही तुझ्या संगीत नियोजनाची नाही, तर तिच्या स्वराची किमया आहे.
गुरूचे स्मरण करून कानाला हात लावला. सगळ्यांचे चेहरे भारावले होते. ज्ञानेशांची वाणी एका समर्थ, सुरेल गळ्यातून प्रसवत होती. दोन तंबोर्यात जणू तिसरा तंबोरा मिसळला होता. तंबोर्याच्या खर्जातून उठणारा गंधार दीदीच्या गळ्यातून उमटणार्या गंधारात लोप पावत होता.
या गंधारावरून आठवण झाली. लताबाईंच्या गळ्यातच गंधार आहे. म्हणून त्यांचे इतके नाव झाले वगैरे… असे वारंवार ऐकावयास मिळते, वाचावयास मिळते. चांगले चांगले संगीतकारही ही गोष्ट बोलताना मी ऐकले आहे. गळा गोड आहे, सुरेल आहे, सुर तीक्ष्ण आहे, खर्ज तयार आहे. हे सर्व शब्दप्रयोग मला मान्य आहेत. ते रूढही आहेत. पण गळ्यात गंधार याचा अर्थ काही माझ्या लक्षात येत नव्हता.
गळ्यात गंधार आहे, मग बाकीच्या सहा सुरांचे काय ? बरे, माझे वडीलच दीदीला म्हणाले होते , “लता, गळ्यातला गंधार जप हो” मला बरेच दिवस हे कोडे होते. ही गंधाराची काय भानगड आहे ?
पण, अचानक एके दिवशी हे कोडे उलगडले. मी तंबोरा सुरात मिळवत बसलो होतो. रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबई त्या रात्री तरी शांत होती. मी अगदी सहज गंमत म्हणून तंबोरा मिळवत बसलो होतो. पण तंबोरा सुरातच मिळेना. कधी जोड सुरात मिळे, तर कधी पंचम सुरातून सुटायचा. कधी पंचम, जोड सुरात लागला, तर खर्ज सुरातून निसटायचा. कितीतरी वेळ मी प्रयत्न करीत होतो. सहज घड्याळ्यात बघितले. पहाटेचे अडीच वाजले होते. अरे बापरे, मी साडेतीन-चार तास प्रयत्न करीत होतो. पण तंबोरा अजून बदसुरच वाजत होता. मीही हट्टाला पेटलो. सँडपेपर घेतला. जव्हारी घासली. परत सर्व तारा मिळवल्या. जव्हारीत नवीन धागा अडकविला आणि तंबोरा सुरात मिळवू लागलो. आणि अचानक भास झाला की, तंबोरा जरा सुरात बोलतोय्. परत प्रयत्न केला आणि थोड्या वेळाने तंबोरा छान बोलू लागला. खर्जाच्या तारेतून स्वच्छ गंधार ऐकू येऊ लागला. आणि थोड्या वेळात षड्ज लुप्त होऊन खोली नुसती गंधाराने भरून गेली.
ज्यावेळी तंबोरा चांगल्यापैकी सुरात मिळतो, त्यावेळी खर्जाच्या तारेतून गंधार उमटतो. हाच ‘सही गंधार’. मला पट्कन बाबांचे शब्द आठवले, “लता, गळ्यातला गंधार सांभाळ.” याचा अर्थ एवढाच की , “सही षड्जा” मधून गंधार उमटतो. असे सर्व “सही सुर” लागू दे की षड्जामधून गंधार , पंचमातून रिखब असे हे सर्व “सही सुर” एकत्र होऊ देत.
सकाळी मी दीदीला विचारलं, “दीदी, गंधाराची काय भानगड आहे ? बाबा तुला काय म्हणाले होते ?” दीदी हसून म्हणाली, “गळ्यातला गंधार” या शब्दाचा अर्थ लोकांना कळलाच नाही. अरे, बाबा रियाजाला बसले की मी त्यांच्या शेजारी बसायची. अचानक बाबा म्हणायचे, “लता गंधार जप.” मी पट्दिशी गंधार लावायचे. बाबा म्हणायचे, वा ! हा सही गंधार, अगदी खर्जातून आल्यासारखा.”
माझे शंकानिरसन झाले. गंधार हा षड्जाचा पडसाद ! ज्याचा गंधार तंबोरीत मिसळतो, त्याचा षड्ज सही लागलाच पाहिजे व ज्याचा षड्ज सही त्याचे सप्तस्वरही “सही”. बाबांना दीदीच्या सुरेलपणाबद्दल आत्मविश्वास होता. म्हणून ते शेवटी म्हणाले की, लता, गळ्यातला गंधार जप हो !”
हा गंधार, हा सुरेलपणा टिकविण्यासाठी दीदीने खूप परिश्रम घेतले. चांगल्या चांगल्या गवयांकडून गाण्याचे शिक्षण घेतले. तासन् तास सुरेल गवय्यांचे गाणे ऐकले. नॅट किंग कोल, सुब्बुलक्ष्मी, सैगल, पैरुझ, उस्ताद अमीरखाँ, बडे गुलाम अली, नूरजहाँ, अब्दुल वहाब या सारख्यांच्या रेकॉर्डस् तासन् तास घासल्या. तेव्हा कुठे हा गंधार टिकला, फुलला. त्याच्या सुगंधाने सार्या विश्वाला मोहित केले आणि अजूनही ती विश्व झुलवित आहे. इतका प्रदीर्घ काळ एका जागेवर राहणे अशक्य आहे, असाध्य आहे. दीदीने हेच काम अत्यंत सोपे करून दाखविले आहे. एका अत्यंत उंच अशा ठिकाणी ती उभी आहे. आजूबाजूला खोल खोल दर्या आहेत. भोवताली स्थितप्रज्ञाप्रमाणे पहाड उभे ठाकले आहेत.
दीदी, कला आणि प्रसिद्धी याचा तोल सांभाळीत गेली साठ वर्षे उभी आहे.
1942 साली दीदी पहिलं गीत गायिली. त्याला आज पाच तपे उलटून गेली. ते अजूनपर्यंत ती गातच आहे, गातेच, गातच राहणार. कारण, “कलेसाठी कला ” हे तिचं जीवनतत्त्व आहे.
1967 सालच्या एप्रिल महिन्यात तिच्या कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून आम्ही काही मंडळी तिच्या कलाजीवनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त कार्यक्रम आखीत बसलो होतो. तेवढ्यात दीदी आली. मी तिला म्हणालो , “तुला चित्रजगतात प्रवेश करून 25 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत, तुझा सत्कार करणार आहोत. या सिल्व्हर ज्युबिलीबद्दल तू काय देणार ? ज्या रसिकांनी आज 25 वर्षे अखंड तुझे कौतुक केले, त्यांच्यासाठी तू काय करणार ?” दीदीनं थोडा वेळ विचार केला. मग तिला अचानक काही सुचलं. ती म्हणाली, “मी गाण्याशिवाय काय देणार ? माझ्या महाराष्ट्रासाठी गाईन ज्ञानेश्वरी, भारतासाठी भगवद्गीता ! बाळ, या दोन लाँग प्लेइंग ध्वनिमुद्रिका काढायच्या.” मी बुचकळ्यात पडून म्हणालो, “दीदी, ज्ञानेश्वरी एवढी प्रचंड, ती रेकॉर्डमधे कशी बसणार ? तसेच, गीतेमधला कुठला भाग घेणार ? गीतेमधले सगळेच योग उत्तम. मग कुठला घेणार नि कुठला गाळणार ?” पट्कन ती म्हणाली, “अरे ज्ञानेश्वरीचे ‘पसायदान’ घ्यायचे आणि गीतेमधला ‘पुरुषोत्तम योग’. आम्ही लगेच कामाला लागलो.
दीदी गात होती… ओम् नमोजी आद्या… गंधारात गंधार मिसळत होता. सर्व वातावरण पवित्र झाले होते. मंदिराच्या गाभार्यात मंत्र घुमतात तसे सुर घुमत होते… ओम् नमोजी आद्या …. ओम् नमोजी आद्या…!!!

– लेखन : शशांक दंडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800