आवडता वृक्ष….पलाश
अग्नीशिखा ह्या
तळपती रानी
तप्त झळांचे
ऊन साहुनी।।
ज्या वृक्षाचं हे वर्णन तो पळस वृक्ष मला अतिशय आवडतो. रानावनात उगवणारा, खडका, दगडातून स्वतःचं अस्तित्व शोधणारा, झुडुप असो की वृक्ष विपरीत परिस्थितीतही तरारून वाढणारा ….हा पळस फार मन मोहून घेतो…तो त्याच्यातील अंगभूत चिकाटीने. जगण्यातील उर्मीने…!
शिशिराची पानगळ .. रानं सगळी पानं गाळून खराटे झालेली.. पिवळ्या पाचोळ्याचे ढीग बुंध्याशी ढिगाने साचलेले..
हळूहळू वसंताची चाहूल अन् पळसाला तांबूस कोवळी पालवी फुटलेली दिसते. भरारा वाढत पानं दाट, जाड हिरवीगार होतात. तीनतीन पानांच्या नक्षीने फांदीला सजवतात. पळस वाऱ्यासंगे बांधावर, शेतावर, रानोमाळी बहरून येतो. दिसायला आकर्षक नसला तरी गुणांनी समृद्ध पळस मनात ठसतो. औषधी गुणधर्म, पत्रावळी, पानांवर आयाबाया कुरडया पापड्या घालत. पर्यावरण पूरक उपयोग असे पानांचा..!
उन्हं तापायला लागलं की पळस फुलू लागतो. लाल, केशरीजर्द रंगांची सुंदर दिव्याच्या ज्योतीगत आकाराची असंख्य फुले कळ्यांसह बहरू लागतात. निसर्गाने फुलवलेले हे अद्भुत वसंत रूप भर उन्हाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडते..
वसंतोत्सवाची रंगपंचमी या सुंदर केशरी रंगाशिवाय रंगतच नाही..
सगळं रान उजाड असतांना तप्त झळा सहन करत हा वृक्ष विपरीत परिस्थितीत बहरून जणू आनंदाने जगणं शिकवतो. परिस्थिती, संकटांवर मात करून बहरणं, इतरांना आनंद देणारा … अग्नी शिखा नाव सार्थ ठरणारा.. पलाशवृक्ष मग कां बरं आवडता होणार नाही ?
— लेखन : अरूणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आटोपशीर सुंदर लेख