तो सौंदर्यात नटलेला वृक्ष पाहिला, आणि क्षणात वसंताने सृष्टीला अजून काय काय भरभरून दिलेल आहे, याची संदुकच उघडली. म्हटल, “पाहू तरी, या गुलदस्त्यात त्या वनदेवीने कोणता कलश हाती घेत ऋतुराजाचे वर्णन करुन त्याचे स्तवन, गायन, आरती केली आहे. नववर्ष स्वागत करते आहे.
हा ऋतुराज सृष्टीच्या विविधतेला आपल्या बाहुपाशात घट्ट धरुन जणू, पुन्हा पुन्हा सांगतोय, काय हवे तुला काय मी देऊ आणि ही सृष्टी देखिल प्रेमाने चिंब चिंब होत नटतेय, शृंगारते आहे. या हिरवळीने, तांबूस लाल रंगाने निसर्गाच्या सप्तरंगात न्हाऊन निघत आहे. सळसळत्या नव तारुण्यात पदार्पण केलय. सौंदयाची ती राणी मंगल प्रभाती मंजुळ घोषात निनादत आहे. आणि तिचे सेवक, भाट, इत्यादी तृप्ततेने गोडवा गाण्यात मग्न आहेत.
आज हा बहावा फुललेला पाहून, एखाद्या नववधूच्या मनाच चित्र उभं राहिलं. जणू काही त्या तिच्या येणाऱ्या राजकुमारासाठीच ही पिवळी वस्त्र, स्फुट चढवली आहेत. सलज्ज होत लाजत शृंगारत “बहावा” नव्हे तर “बहाणाच” करतेय. आपल्या सारख्या रसिक अरसिकांना पुन्हा आकृष्ट करत म्हणतेय, “पहावा पहावा पहावा नटलेल्या शृंगारलेल्या या बहावा वृक्षाला पहावा.”
सुंदर सोडलेली पिवळी जर्द माला, हार जणू काही कोणता तरी भव्य सोहळा चाललाय, असं हे विलोभनीय दृश्य फक्त आणि फक्त नजरेत साठवाव त्या वसंताची वनदेवीची व बहाव्याची पुढील वर्षासाठी वाट पहावी व वसुंधरेच्या या लेकरांना मनोमन बिलगून जावं इतक सुंदर…..!!

– लेखन : सौ माधवी ढवळे राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800