संसाराचा रथ चालविता
देह आता शिणला
नको अहंता माया ममता
नामजपी तव लळा लागला ॥१॥
रानोमाळी फिरले देवा
वादळे किती झेलली
कृपाप्रसादे तुझ्या ईश्वरा
भवसागरी नौका तरली ॥२॥
जीवनी माझ्या वसंत आला
फुलला मनी बहार
मारव्यासम उदास झाले
बरसला सूर~मल्हार ॥३॥
कृतार्थ वाटे हे भगवंता
भरली माझी झोळी
लळा लागला तव नामाचा
राम~कृष्ण मुखात घोळी ॥४॥
आसुसला जीव तुझ्या दर्शना
विठ्ठल विठ्ठल गजरी
प्रपंचाची नुरली गोडी
भवाब्धी हा पार करी ॥५॥

– रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

अप्रतिम ..
सुंदर कविता आहे, अरुणाताई…!
सुरेख भावपूर्ण आत्मानंद देणारी कविता अरुणाताई…