‘वृक्षवल्ली अम्हां सोयरी वनचरे’ असं जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलं आहे. गेल्या जवळपास 75 वर्षांपासून या सिद्धेश्वरनगरीशी असं ‘सोयरपण‘ जपणाऱ्या एका हिरव्याकंच 50-60 फूट उंचीच्या एका अतिदुर्गम वृक्षराजानं तमाम लातूरकरांचं सतत लक्ष वेधून घेतलं आहे.
फुलं जरी लालसर, जांभळट, जराशी काही छटा पांघरुन या सदाबहार वृक्षराजावर बहरलेली असली, तरी फळं मात्र ओबडधोबड, दोरीला लोंबकळणाऱ्या महाकठीण कवचाच्या वरवंट्यासारखी असल्याने ‘हेचि फल काय मम तपाला !’ असंच ह्या जुन्यापुराण्या वृक्षराजी नि लातूरवासियांनाही कदाचित् वाटत असावं.
लातूरच्या दयाराम रोडवरील जैन कुटुंबीय कांबळे यांच्या दारी भर मेन रोडवर गेल्या सुमारे 75 वर्षांपासून झुलत असलेला हा वृक्ष ‘परदेशी पाहुणा‘ असून, केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात लातूर व्यतिरिक्त अन्यत्र तो कोठेही नसावा, असं जाणकार म्हणतात.
हा वृक्ष कोणता, त्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव काय, त्याच्या फळांचा उपयोग कशासाठी, आदी प्रश्न अनेक वर्षांपासून लातूरकरांना छळत होते. पण अशा सगळ्याच प्रश्नांचा उलगडा झाला. आमचे वृक्षप्रेमी अभ्यासक दिवंगत स्नेही ( आणि कवीही) विजयकुमार भोयरेकर यांना मारुती चितमपल्ली यांच्या ‘शब्दांचं धन‘ नामक पुस्तकात हा सगळाच संदर्भ आढळला, आणि डोक्यावर पडणारा प्रश्नांचा ‘वरवंटा’ चुकवून आल्यासारखे भोयरेकर ते पुस्तक घेऊन रात्री उशिरा ‘युरेका.. युरेका ..’ म्हणत बाहेती हाॅस्पिटलच्या वरच्या मजल्यावर रंगणाऱ्या आमच्या नेहमीच्या दोस्तांच्या मैफलीत आले.
‘शब्दांचं धन’ मध्ये चितमपल्लींनी दोरीला लोंबकळणारा वरवंटा असल्याप्रमाणं ज्या झाडाला अनेक फळं लटकतात (लगडतात नव्हे), ते झाड आपल्या देशातील नाही, त्याला ‘कॅझेलिया पिनेटा‘ म्हणतात, असा संदर्भ दिला आहे. भोयरेकरांनी नंतर चितमपल्लींशी पत्रव्यवहारही केला. ‘या झाडांच्या फुलांचं परागीकरण रात्री वटवाघळांकडून होतं‘, असं चितमपल्लींनी त्यांच्या पत्रोत्तरात म्हटलंय्. हे झाड बहुधा आफ्रिकेतील असावं, असंही चितमपल्लींनी आपल्या 21 मार्च 1986 च्या एका पत्रात म्हटलं होतं.
या विचित्र दिसणार्या ‘कॅझेलिया पिनेटा‘ ला पाच पाकळ्यांची तांबडसर, जांभळट, काळी छटा असलेली आकर्षक फुलं मात्र येतात. अत्यंत दुर्मिळ असा हा परदेशी वृक्ष सहसा कुठेही आढळत नाही. लातूरमध्ये तो कोणी आणला, येथे तो कसा रुजला हा कुतूहलाचा विषय ठरावा. बरं, ह्या फळांचा उपयोग काय, तेही कुणाला माहित नाही. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षा :’ असं संस्कृत सुभाषितात म्हटलेलं असलं, तरी हे फळ कसला परोपकार करतं, हे कवणाला ज्ञातच नाही.
भोयरेकरांनी त्यावेळी वयोवृद्ध श्रीमती कौसल्याबाई कांबळे यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपले दीर भालचंद्र कांबळे यांनी बर्याच वर्षांपूर्वी लातूरचे कै. किशनराव बागायतमास्तर यांच्याकडून हे रोपटं आणून लावलं, असं सांगितलं होतं. वरवंट्यासारख्या दिसणार्या या एका फळाचं वजन अदमासे 5 ते 6 किलो असून, शिवरात्रीच्या पुढं दरवर्षी ही फुलं रस्त्यावर गळून पडतात. (रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांना हेल्मेटच घालून जायची पाळी !☺️ ) मात्र, नागाच्या फण्यासारखी दिसणारी फुलं अन् लोंबणारा वरवंटा हे लातूरकरांचं खास आकर्षण आहे.
1947 साली झालेल्या पोलीस ॲक्शननंतर 1948 साली आपल्या दिरानं हे झाड लावलं, अशी आठवणही कौसल्याबाईंनी सांगितली. डोंगरदऱ्या येथे राहणारी लोकं ही फळं घेऊन जातात, परंतु त्यांचा उपयोग कशासाठी, हे मात्र अजून समजलेलं नाही. फळं बारमाही लटकलेली असतात. सव्वा ते दीड फूट लांब व साडेचार इंच घेर असलेली आणि अवजड वजनाची ही फळं गेल्या 73-75 वर्षांत कोणाच्या डोक्यावर पडली नाहीत, हे नशीब ! अन्यथा, कपाळमोक्ष ठरलेलाच !!
अर्थात् हा परदेशी पाहुणा गेल्या तब्बल साडे सात दशकांपासून लातुरात रमला असल्यानं त्याला ‘परदेशी‘ तरी कसं म्हणावं, हा सवाल आहेच. फार तर, ‘एनआरआय‘ (नाॅन इंडियन रेसिडेन्ट- अनिवासी भारतीय) म्हणून वृक्ष चळवळीत ‘परदेशी’ योगदान म्हणता येईल !!

– लेखन : जयप्रकाश दगडे, जेष्ठ पत्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Madam,its so nice of you to contribute such a valuable information,inputs. It’s surprising that you know this much about this tree. Thanks a lot for your contribution. Regards.
About the tree and fruits mentioned by Shri Jaiprakash Dagade,
Its name is kIngelia but commonly is called a Sausage tree. refer to Sausage like fruits,
Family : Bignoniaceae consist of species Kigelia africana , which is surprisingly only one species.
Tree: evergreen in rainy season and leaves falls in autumn and grows new ones in spring.
Flowers: bell shaped , orange to maroon in colour
Fruit: about 7kg in weight ,but some times 10 to 12 kg too. 60 cm ie 2 feet long and poisonous and purgative but are eaten by giraffes , elephants, baboons , monkeys, hippopotamus, bushpigs etc.
though poisonous, useful for skin diseases and can use for consumption after drying, roasting etc.
In Africa, the hard shell of fruit is hollowed out and is used as diff shapes of containers. by fermenting the fruits they make sweet beer.
अत्यंत दुर्मिळ अशा फुलांचा शोध… आणि त्यावरील सविस्तर लेखन… खुपच छान….