नवा दिवस…….
“दीदी बहोत दिनो बाद आये हो आज ? “वस्तीत शिरताच, अंजुम बानो आपली सोनेरी गीटा किनार असलेली, चमकी टिकल्यांनी नटलेली मातीत लोळणारी ओढणी परत खांद्यावरून डोक्याकडे सावरत म्हणाली. मी तिच्याकडे बघितलं तेव्हा ती ओढणीच्या कोपऱ्याला चीटकलेली घाण झटकण्यात दंग होती.मी म्हणाले, ‘हां पढाई बहोत बाकी है इसलिये नहीं आ पायी. क्या लग गया हैं दुप्पटे मे ?” मी तिला विचारलं. तिने ओढणी बाजूला टाकत एक नजर माझ्याकडे बघितलं आणि हसत म्हणाली, “दिदी अब क्या करें इस मिट्टी के दाग का ? कीचड मे ही तो आ कर बस गये है”.
डोळ्यात दाटलेलं तळं आतल्याआत कोरडं करत तिचं ते दिलखुलास हसणं मला आवडत होतं. वस्तीत शिरल्यावर संशोधिका म्हणून मी कोणाचं दुःख आणि भूतकाळ कधीच कोरत नसे पण एक व्यक्ती म्हणून त्यांना मोकळं व्हावंसं वाटलं तर थांबवत पण नसे. अंजुम बानो ने ओढणीचा स्वच्छ कोपरा हाताशी घेऊन खुर्चीवर फिरवला आणि मला खुर्चीवर बसायची खुण केली. मग चहावाल्या पोऱ्याला आवाज दिला आणि म्हणाली, “चरस खा खा के मर जाना किसी दिन. हड्डी की दुकान बन गया है. देखो तो जरा. अब दात क्या दिखाता हैं जा चाय बिस्कुट ले के आ.” तो चहावाला पोऱ्या अंजुम बानोच्या गावाकडचा होता म्हणून त्या त्याला हक्काने रागावत असे. त्याच्या डोक्यावर केसांचा झुपका पसरलेला होता. तोंडात सतत पान चघळल्यामुळे दात पिवळट, नारंगी झाले होते. त्याचं वय फारसं नव्हतं वीस, बावीस असणार. उंची जास्त होती पण पाठीतून वाकलेला होता. वाऱ्यानेही उडून जाईल असा अशक्त देहभार कसा बसा सांभाळत मान खाली घालून तो चहाच्या टपरी कडे वळला.
अंजुम बानो आज जरा मलूल वाटत होत्या. बोलता बोलता कुठेतरी शून्यात हरवून जायच्या. आज त्यांच्या बोलण्यात पण ताळमेळ नव्हता. मला शाळेत जायचं होतं पण त्या काहीतरी सांगून मला थांबवून घेत होत्या हे माझ्या स्पष्ट लक्षात येत होतं. दहा अकरा वर्षांचा कुडा नावाचा लहान मुलगा त्यांच्या साठी चहा घेऊन आला. कुडा चहाच्या टपरीवर काम करायचा. तो वस्ती जवळच रहायला होता. कुडा कधीच शाळेत गेला नव्हता पण गणित अगदी बोटावर असायचं त्याच्या. आणि कोणत्याही वाहित मांडणी न करता तो सगळ्यांचा हिशोब चोख ठेवत असे. त्यामुळे
चहावाल्याचा तो अगदी लाडका होता. कुडा शिवाय त्याचं काम चालत नसे. मी त्याला शाळेत जाण्याबाबत खूपदा सांगितलं पण त्याची आई आणि दोन भावंडं त्याच्यावर अवलंबून होती. त्याची पण एक निराळी कहाणी होती.
अंजुम बानो ने कटिंग चहाचा काचेचा प्याला ओढणी ने धरून बाजूला ठेवला. कुडा चहा देऊन निघून गेला. बानो मला म्हणाल्या, “ये चाय के बिना कैसे चलता हैं आपको. दिदी सिर नहीं दुखता आपका ?” मी हसून नकारार्थी मान हलवली. त्या पुढे म्हणाल्या, “इतनी पढाई करती आप. चाय तो पिना चाहिए ना”…एक क्षण थांबून त्या म्हणाल्या. “दिदी हमारे गाव मे चौथी के बाद स्कूल नहीं था पहले. हमारे अब्बू हमको वापिस चौथी मे भेजते थे”. असं म्हणत त्या जोरात हसल्या आणि प्यालातला चहा संपवून ओढणीचा बारीक कोपरा ओठाभवताल फिरवला आणि तोच कोपरा ओठावर घासून मागे टाकला. त्यांचे वडील त्यांना परत चौथीत पाठवत असत. हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं. म्हणून मी त्यांना विचारलं, “फिरसे चौथी मे क्यू ?” त्या आज माझ्याशी मोकळं होण्याच्या तयारीतच होत्या. त्या परत जोरात हसल्या आणि म्हणाल्या, “अरे दिदी फिरसे नहीं फिर फिर से हम लडकिया चौथी क्लास मे जाकर बैठते थे, जब तक हमारा निकाह न हो जाता था. “मी तिचा शेवटचा शब्द परत उच्चरला. “निकाह ?” आता अंजुम बानो भूतकाळात हरवत चालली होती. तिने डोक्यावरची ओढणी सावरली. ती लाल रंगाची टिकल्या, चमकी ची ओढणी आणि त्याच्या भोवतालचा तो जरीचा गीटा आता जास्तीच चमकू लागला होता. चाळिशी जवळची बानो भूतकाळातील आठवणीत शिरली. तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावर पडणारं कोवळ ऊन ती ओढणीने झाकण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, “हां निकाह होने तक दो तीन साल लडकिया चौथी कीलास मे ही बैठती थी. आगे पढने की जो जिद करती थी उसको वापस चौथी मे भेज देते थे. दुसरे गाव मे तो भेजने से रहे, फिर क्या करते. लडकिया भी क्या करती घर के काम से छुटकारा पाने को जाकर बैठ जाती थी बार बार चौथी मे. “चौथितली अंजुम आता पाठीवर दप्तर घेऊन अंजुम बनोच्या अवती भवती फिरू लागली होती.
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
बाल मानस तज्ञ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खूपच छान लेखन 🌹🌹
अभिनंदन.
True to the fact
अशोक बी साबळे पाटील
महाड