Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यलालबत्ती ( २३ )

लालबत्ती ( २३ )

अबोध गरज…
मी बानो ची वाट बघत तिथेच थांबले. त्या पिंपळाच्या मुळाशी कोरलेलं देवघर मी आज इतक्या जवळून बघत होते.पिंपळाचं हिरवं शरीर कोरून त्यात एक देवीची मूर्ती बसवली होती. मला नाही ओळखता आली ती मूर्ती. केस मोकळे सोडलेले आणि काहीशी रागात अशी मुद्रा असलेली ती देवी होती. पीपल वाली मां असं तिचं नाव होतं. ही देवी अशी रागात का होती माहिती नाही. आणि येता जाता या माता देवीला नमस्कार करत होत्या. आणि काहीतरी मनातील इच्छा तिच्या पुढे बोलत होत्या.

तिथेच एक वयोवृद्ध आजी बसल्या होत्या. मी त्यांना देवीची काय कहाणी आहे असं विचारलं त्या माझ्याकडे बघून हसल्या आणि डोक्यावरचा नव्वार साडीचा पदर नीट करत म्हणाल्या, “अग ताई कसली कहाणी आणि कसलं काय. मनाचा खेळ आहे सारा. या बायकांच्या मनातलं कोण समजून घेणार ? मग दिली बसवून हिला बिचारीला. आणि मन मोकळं करून घेतात हिच्या समोर. ही तरी काय करणार घेते ऐकून”. एवढं बोलून आजी पुढे निघून गेल्या.

किती सहज ओळखली होती आजीनी, या माताच्या एकाकीपणाची व्यथा. मी या विचारात असतानाच बानो माझ्या दिशेने धावत येत असताना दिसली, तिच्या हातात एक पिशवी होती कसली तरी. माझ्या जवळ येऊन तिने त्या पिशवीत हात घालून कसला तरी कागद काढला आणि माझ्या हातात दिला. बानो उर्दू भाषेतून चौथी पर्यंत शिकली होती. तिला इतर भाषा लिहिता वाचता येत नव्हत्या. बानो मला आतुरतेने म्हणाली, “दिदी पढो तो जरा क्या लीखा हैं जन्नत ने इस कागज मे.” आणि परत पिशवीत हात घालून तिने तसेच खूप सारे कागद काढले. ते सगळे माझ्या हातात देताना ती म्हणाली, “ये सारे भी पढ दो. देखो तो क्या क्या लिखती हैं रोज और छुपा देती हैं कपडो मे, तो, कभी ये कागज दबा देती है खाट के नीचे”.

आम्ही दोघी पिंपळा जवळ बसलो आणि एक एक कागदाचा तुकडा नीट लावला. मग मी वाचायला सुरुवात केली. जन्नत ने त्या कागदाच्या तुकड्यावर लिहिलेली पहिली ओळ वाचतानाच मन अस्वस्थ झालं. कसलं हे होरपळलेलं आणि तहानलेलं बालपण, किती ही निरागस मनाची घालमेल. माझ्या मनाची अस्वस्थता चेहऱ्यावर इतकी स्पष्ट दिसत होती की, बानो ने ती क्षणात वाचली आणि म्हणाली, “दिदी क्या हुआ. क्या लीखा हैं बाताओ तो.”

एक एक कागद वाचताना मला प्रत्येक कागद उलगडू लागला. त्या तोडक्या मोडक्या अपुऱ्या शब्दात जन्नत ने तिच्या बाल गरजांना दिलेली भावनिक हाक मन खिन्न करून गेली. बानो ला काय सांगावं तेच मला कळेना. कागदावर काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची तिची आतुरता वाढतच होती. तिने माझ्या हातातले कागदाचे काही तुकडे नीट केले आणि उलट – सुलट करून बघू लागली. मी मात्र कागदावरची एक एक ओळ वाचताना आतल्या आत खचत होते. आता या अगतिक आणि मजबूर मातेला मी काय सांगणार तिच्या अबोध लेकराची गरज…..?
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. फार तरलतेने टिपता सारे काही. मीही अस्वस्थ झाले हे वाचून. अशा कितीजणी घुसमटत असतील नाही? खूप वाईट वाटतं आणि आपण काहीच करू शकत नाही याचं दुःख होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं