जन्नत…
जन्नत ने तिला माहिती नसलेल्या तिच्या वडिंलासाठी अनेक संदेश, कागदाच्या अनेक तुकड्यावर लिहिले होते. ते ती कुठे पाठवणार होती माहिती नाही. पण तिच्या मनाची घालमेल आणि कोण आहे ती व्यक्ती जिच्या मुळे ती या वस्तीत आहे ? या सगळ्या प्रश्नांचे काहुरच होतं ज्याने तिच्या एकूणच वागणुकीवर ताबा घेतला होता.
जन्नतने त्या दिवशी शाळेत जे केलं ते फार वेगळं होतं. तिला आतून आतून पोखरत जाणारा न्यूनगंड तो यामुळे निर्माण झाला होता. बानो कागदावरचे शब्द अगदी निरखून बघत होती. भाषेची मर्यादा आता मोडून पडली होती. आता बानो त्या कागदावरच्या भावना वाचत होती तिच्या असहाय नजरेतून.
मधलाच एक कागद काढून तिने माझ्या हातात दिला आणि म्हणाली, “दिदी इस कागज पर देखो क्या लिखा हैं ? बार बार कलम घुमाई हैं”. मी तो कागद हातात घेतला. त्यावर जे लिहिलं होतं ते पेनाने परत परत गडद केलं होतं. मी ते वाचू लागले, “मेरी माँ बहोत अच्छी हैं. वो बुरी नहीं है”. या वाक्यावर परत परत पेन्सिल फिरवली होती. ते ऐकून बानोच्या अश्रूंचा बांध फुटला, मेरा बच्चा, मेरा बच्चा असं म्हणत, ती अगदी लहान बाळासारखी रडू लागली. काय ही अवस्था होती दोघींची ! कुणी रडावं कोणासाठी ? आणि कुणी पुसावे अश्रु ?
किती हा मानसिक आणि भावनिक आघात सहन करतात या माता आणि ही लेकरं. समाजाला दिसतं ते फक्त काटेरी पांघरुण जे त्यांनी केवळ वरवर पांघरलय आत रक्तबंबाळ झालेली ही आई आणि जखमा लपवत प्रत्येक क्षणाला अवहेलना, अपमान आणि अनौरस या नावपाटीचा सामना करत आयुष्य कंठनारी ही निष्पाप लेकरं. आणखी आहे काय इथे ? या विश्वाची निर्मिती समाजाने आपल्या अवास्तव गरजा पूर्ण करण्यासाठी केली जरूर पण त्यांचा स्वीकार कधी केला नाही. तरी त्यांच्यावर संसार उध्वस्त करण्याचा आरोप असतो. आणि त्यांचीच मुलं घर आणि वडील या महत्त्वाच्या अधिकारास मुकले असतात. कोणतं हे दुष्टचक्र आहे ज्याचा फेरा आईपर्यंत येऊन थांबत नाही तर त्यांचा मुलांना पण गुरफटून टाकते ? याच चक्रातून या लेकरांना बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे.
त्या दिवशी जन्नत ने शाळेत तिच्या वर्गातील काही मुलांना हातावर चावा घेतला. खूप खोल जखमा झाल्या होत्या सगळ्यांना आणि तसे करून ती घरी पळून आलेली. म्हणून बाईंनी तिचं दप्तर ठेऊन घेतलं होतं. हे मी बानो ला सांगितलं तेव्हां ती म्हणाली, “नोच खाने को तो मन करा ही होगा. न जाने क्या क्या कहते होंगे बच्चे”. बानो ने अचूक हेरलं होतं जन्नत का तशी वागली असणार ते. ती सगळी कागदं बानो ने देवीच्या पुध्टतल्या मातीत आत दाबून दिली. आणि माझ्याकडे बघत म्हणाली, “अब ये कागज संभालकर भी क्या करूंगी दिदी ? ये माता रानी ही देगी कोई जवाब.
ईसके पास भी क्या जवाब होगा. न जाने कौन बूनता हैं ये सारे जाल. दिदी हम भी पैदा तो कर देते हैं बच्चे लेकीन इनके मन में कितने सवाल आयेंगे उनके जवाब ये मासूम कैसे किधर से लयेंगे ये भी नहीं सोचते. लेकीन हमारे पास भी इन बच्चो के सिवाय कूछ भी नहीं है. बाकी दुनिया तो मरने तक जिने नहीं देती. कैसे हो गया होगा ये सब हमारे साथ और क्यू ? मेरा तो नीकाह होने वाला था……
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

जन्नत या कथेचा प्रत्येक भाग वाचताना मन पिळवटून जाते.
दुनिया तो मरनेतक जिने नही देती….किती विदारक सत्य आहे हे!
राणी ताई ,जीवनाचे हे अत्यंत करुण दर्शन तुमच्या लेखातून होते.तुमच्या संशोधनात्मक आणि मानवतेचा दृष्टीकोन बाळगून
केलेलं हे लेखन अनमोल आहे.