फर्शीच्या उदरात
मृत वेदना..
माझा प्रश्न ऐकून अष्पाक, मला काहीच कसं माहिती नाही अश्या सारखा माझ्याकडे बघू लागला.आणि म्हणाला, “आपको पता नहीं क्या ? जब कोई बच्चा मर जाता हैं तब उसको नानी की खोली मे ही तो दबा देते हैं. फर्शी निकाल के !”
माझी मैत्रीण पण माझ्या सोबत होती. आम्ही दोघी हे ऐकून सुन्न झालो. अष्पाक ला एका शिक्षिकेने बोलवले म्हणून तो मला सांगून निघून गेला. मैत्रीण म्हणाली, “किती ग वेगळं विश्व आहे हे. प्रत्येकच गोष्ट विचित्र आहे इथली. बाळांना खोलीतच पुरून टाकतात. किती हे भयानक आहे आणि त्याच जमिनीवर परत सामान्य जीवन सुरू असतं यांचं.” मी मान हलवून तिच्या बोलण्याचं समर्थन केलं आणि आम्ही दोघी शाळेतील कार्यक्रम बघायला पटांगणात गेलो.
डोळ्यासमोर सारखा रजियाचा चेहरा फिरत होता. मुलं छान छान नृत्य, गाणी वगैरे सादर करत होती पण कशात लक्ष लागेना.लहान मुलांचं मृत शरीर का ते खोलीत पुरत असावे ? रजिया ला कुठून आणले असेल ? ती इकडे आली काय आणि नाहीशी झाली काय. याचा कोणालाही काय फरक पडला नाही. ती इकडे आल्याची आणि नाहीशी झाल्याची पण नोंद नाही कुठं ?
माझ्या विचारांची तंद्री मोडत मैत्रीण म्हणाली,
“चल, पोलीस चौकीत जाऊन बघू या त्यांना काही माहिती आहे का या बद्दल.” मग आम्ही चौकीत गेलो. लेडीज पोलीस ओळखीच्या होत्या. त्यांनी बसायला सांगितलं आणि सवयी प्रमाणे नोंद रजिस्टर आमच्या हवाली केलं.
एक पोलिस हवालदार म्हणाली, “काय झालं मॅडम. कोणाची माहिती हवी आहे ? “मी विचारलं, “एवढ्यात दहा महिन्याची मुलगी आली का इकडे ? म्हणजे काही नोंद झाली का ?” ती म्हणाली, “नाही मॅडम कोणी काही सांगितलं तर नाही.आणि आली असेल तरी हे लोकं सांगणार आहेत का ? परवा रेड पडली तेव्हां पण कोणी नाही सापडली एवढी लहान मुलगी. कधी बघितली तुम्ही तिला ? ” मैत्रीण म्हणाली, “पंधरा वीस दिवसा पूर्वी.’ त्या पोलीस हवालदार महिलेने काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केला. मग नकारार्थी मान हलवून आमच्या पुढे आणखी एक रजिस्टर आणून ठेवलं. आम्ही सगळं नीट बघीतलं पण रजियाची कुठे ही नोंद नव्हती.
एक लेकरू कुठून कुठं येऊन पोहोचलं काही दिवस जगलं, मृत झालं आणि त्याच मृत शरीर फर्शी खाली दाबलं गेलं. तरीही त्याची एका जबाबदार यंत्रणे कडे कुठलीही नोंद नाही. हा सगळा प्रकार म्हणजे एक मोठा चिंतनाचा विषय होता.
दोन्ही रजिस्टर मधली उलगडलेली पानं अनेक कहाण्या सांगत होती. पण रजियाची चं असणं आणि नसणं ही त्यात नव्हतं. आम्ही दोन्हीही रजिस्टर त्यांच्या हवाली करून परतलो.
रजिया चा गुंता काही केल्या सुटत नव्हता. ज्या महिलेकडे रजिया तिची मुलगी म्हणून ठेवली गेली होती आम्ही तिच्याकडे गेलो. तिथं सगळं सामान्य होतं. कुठेही रजिया चा विषय नव्हता. मी तिला विचारलं, “रजिया बिमार थी ना, अभी कहां हैं ?” ती कुठलं तरी उत्तर तयार करतेय हे माझ्या लक्षात आलं. खाली मान घालून अष्पाकचे कपडे ओसरीवर ठेवत ती म्हणाली,
“मै नानी के पास दे आयी थी. फिर पता नहीं.”
आम्ही दोघी संताप कसाबसा गिळत होतो. मैत्रीण तिला म्हणाली, “बेटी थी ना आपकी ? आपको पता नहीं कहां हैं ?” ती पुढे काहीच बोलली नाही.
दुपारी रेड क्रॉस सोसायटीच्या हॉस्पिटल मध्ये काही महिला तपासणी साठी आल्या होत्या. त्यातील एक महिला अष्पाक ला ओळखत होती. मी बोलण्या बोलण्यात तिला विचारलं, “अष्पाक की छोटी बहन बिमार थी ना ? अब कैसी हैं ?” तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. आडोसा घेत ती हळू आवाजात म्हणाली, “अरे दीदी, काहे की बहन ? दोनो बच्चे उसके ना है. वो ठहरी बिहारन. अष्पाक तो मुसलमान का बच्चा है. कोई गाव से उठा लायी, आठ सौ रुपये बच्चे की दादी को पकडाके. उसको ना हो सकते बच्चे. बच्चेदानी तो निकाल दी थी जब छोटी सी थी वो. कच्ची उमर मे ही खराब हो जाती है यहां औरतो की बच्चेदानी. ये बिहरन नौ साल की थी इधर आयी थी जब, बारा तेरा साल की थी, तभी खूब बिमार पडी. पता नहीं क्या हूआ था. उसके बाद इसकी बच्चेदानी निकलवा दि थी नानी ने.”
अश्या अनेक कहाण्या आहेत. डोकं सुन्न करणाऱ्या.
माझ्या लेखातून आपणास भेटणार ही निष्पाप लेकरं आणि त्यांच्या मन पोखरून टाकणाऱ्या कहाण्या.

– लेखन : डॉ.राणी दुष्यंत खेडीकर
बाल मानस तज्ञ. मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
एक भयंकर वास्तव ….. ज्या कडे कोणीही मानवतेच्या दृष्टिकोनातून पहात नाही किंवा..एक क्षणभर कोणी दखल घेत नाहीत…
सर्व भयानक….
डॉ.खेडिकर मॅडम या अनामिक अंधकारमय अल्पायुषी जीवाचे वास्तव मांडत आहात
धन्यवाद मॅडम