रूपाचे डोळे पण भिजले होते. ती चीमुच्या काळजीत होती. तिची तब्येत दिवस न दिवस खालावत चालली होती. काही पैसे चीमुसाठी ठेवले होते तिने. पण ती एवढीशी पोर कोणाजवळ राहणार या काळजीत ती आणखीच खचली होती. मी तिच्याशी बोलले होते चिमुला एका संस्थेत ठेऊ या. तिकडे ती सुरक्षित राहणार आणि शिक्षण पण करू शकणार त्यासाठी तिला तिकडे न्यायचं होतं.
रूपा बानोला म्हणाली, “दिदी जाऊ दे आपलं आयुष्य खराब झालं पण लेकरांच होऊ नये तेवढं बघू. मी किती कोशिश केली होती या गंदगी पासून लांब राहण्याचा. खूप शिक्षण घ्यायचं होतं मला पण नाही वाचवू शकली स्वतःला. आईला सोडून मामा कडे गेली होती निघून. आई देवदासी होती आजीने पण तेच काम केलं होतं. मला ते आवडत नव्हतं. सावकार, सरपंच आणि सगळे गावातील मोठे लोक आईला ओरबडत होते. मी नऊ वर्षाचे झाले तेव्हा गावच्या सरपंचांनी मला ओढत वरच्या माळ्यावर नेली होती पण तेंव्हा आईनी मला वाचवली होती. नंतर मी तेरा वर्षाची झाल्यावर आईने स्वतः मला सजवून वरती माळ्यावर सावकाराकडे पाठवले होते पण मी त्याच्या हाताला चावून मामाकडे पळून गेले होते. काही दिवस ठिक गेले. नंतर मामी खूप त्रास देऊ लागली. जेवायला देत नव्हती. बाहेर कामाला पण पाठवायची. शाळेत नाव घातलं होतं पण शाळेत जायला वेळ मिळत नव्हता. तीन तीन दिवस उपाशी ठेवायची मामी. पण मी अधे मधे शाळेत जात होते. शिकण्याचा प्रयत्न करत होते.
एक दिवस मामा आपल्या मित्रांना घेऊन आला सगळे दारू पिऊन होते. मला चिकन वगैरे बनवायला सांगितलं. मी स्वयपाक करत होती. मामाचे मित्र आत आले आणि मला ओढू लागले. मी खूप कल्ला केला पण कोणी आलं नाही. नंतर मामा दररोज कोणालातरी घेऊन यायचा. पुढे माझी तब्येत खराब झाली. एक दिवस अंगात खूप ताप असताना मी तिथून पळून गेली. गावाबाहेर एका ठिकाणी बेहोश झाली. तिथून ट्रक वाल्यांनी मला ट्रक मध्ये टाकून एका वस्तीत नेऊन विकली. मग काय या वस्तीतून त्या वस्तीत मला पाठवण्यात येत होते. इथे येऊन चार वर्ष झाले. आता हा आजार जडला आहे. सगळं आयुष्य आगीतून भाजून निघालं. माझ्या चीमु ला चांगल आयुष्य मिळावं ही एकच इच्छा आहे आता.”
अश्या अनेक पीडित माता आपल्या लेकरांच्या सुरक्षित भविष्यासाठी चिंतित आहेत. त्यांना समाजाने स्वीकारावं आणि त्यांचे सामान्य प्रवाहात येण्याचे मार्ग मोकळे व्हावे त्यासाठी या माता फिर्याद करत आहेत. आपल्या सगळ्यांनी या निष्पाप बालका विषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन त्यांना आपल्यात सामावून घ्यावं अशी या मातांची इच्छा आहे.
क्रमशः
– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ०9869484800