उधारीचे गोकुळ……
कान्हा खूप घाबरलेला होता. बाई त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या. पण, तो वर्गात बसायला तयार नव्हता. आई जवळच थांबून होता. बाईंनी त्यांना माझ्याशी बोलण्यास सांगितलं. आम्ही ऑफिस मध्ये गेलो आणि कान्हाची आई माझ्या पुढे येऊन बसल्या कान्हा आईच्या शेजारीच बसला होता.
त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं. मी त्यांना मन मोकळं बोलायला सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला कान्हा ला शिकवायच आहे. मोठं करायचं आहे. पण या वस्तीत कुठे ठेवणार. इथ पोरं चांगली नाहीत. हा इथं आल्या पासून खूप घाबरला आहे. त्याला काहीच माहिती नव्हतं मी काय करते ते. आता खूप प्रश्न विचारतो.”
त्या बोलायच्या थांबल्या. मी त्यांना विचारलं, “या वस्तीत येण्या पूर्वी तुमचं लग्न झालं होतं का ? “त्या म्हणाल्या, “हो झालं होतं कान्हा झाल्या नंतर नवरा दारू पिऊ लागला जास्त. रोज आम्हाला मारायचा. कान्हा आणि मला सुरीने बारीक बारीक जखमा करायचा. मी शेतात मजुरी करू लागली. तर तिथे येऊन पण मारायचा मग माहेरी गेले निघून. पण तिकडे पण बाप नाही आईच्या जीवावर कधी पर्यंत बसले असते. कंपनीत कामाला लावतात आणि पैसे पण चांगले मिळतात असं एका बाईने सांगितलं ती गावातल्या मुलींना गोळा करून घेऊन जायची आणि नोकरी लावायची.
कान्हा ला आईकडे सोडून मी पण गेले. तेंव्हा आम्ही चार मुली होतो. रेल्वेतून आम्ही निघालो होतो. रात्री इकडे पोहोचल्यावर आम्हाला ती बाई झोपडपट्टीत दोन खोल्या होत्या तिकडे घेऊन गेली आणि बाहेरून कुलूप लावून निघुन गेली. आम्ही दार वाजवलं पण कोणी आलं नाही. दोन दिवस होऊन गेले. आम्ही उपाशी तिकडेच थांबून होतो.
नंतर कोणी दोन माणसं आली आणि आम्हाला एका लॉज वर घेऊन गेले. मला कान्हा ला मारून टाकू असं सांगितलं. मी आणि बाकीच्या पोरी पण खूप घाबरल्या. लॉज वर खूप माणसं यायची. आम्ही पळून जायची खूप कोशिश केली. पण ते खूप मारायचे, चटके द्यायचे उपाशी ठेवायचे. मग काही दिवसांनी आम्हाला या वस्तीत आणून ठेवलं. तेंव्हा पासून इथेच आहे. याला काहीच माहिती नाही”.
त्या हे सगळं सांगत होत्या तेव्हां कान्हा आपल्यातच होता. त्याच्या समोर त्या सगळं बोलल्या तरी म्हणाल्या की कान्हा ला काहीही माहिती नाही आणि कान्हाचं पण त्या जे काही बोलत होत्या त्याच्याकडे लक्ष नव्हत. की त्याला ते कळत नव्हतं माहिती नाही.
नंतर मी कान्हा ला विचारलं, “इथे शाळेत शिकणार ना बाळा ?”. तर तो फक्त माझ्याकडे बघत होता त्याने काहीच उत्तर दिलं नाही…..
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800