उधारीचे गोकुळ २
कान्हा ची आई त्याच्या पासून काय आणि कसं लपवून ठेवणार होती माहिती नव्हतं. पण ती तसा प्रयत्न करत होती एवढं नक्की. तो वस्तीतच राहत होता आता आई बरोबर. त्यामुळे त्याला ते विश्व नवीन होतं. तो खूप शांत आणि तरी अस्वस्थ असायचा. नवीन असल्यामुळे वस्तीतील इतर मुले त्याला खूप दम दाटी करायची, मारायची, दारू सिगरेट, गांजा, मिसरी याची सवय लावण्याचा प्रयत्न करायची. जबरदस्ती करायची. त्यामुळे त्याचं मानसिक, भावनिक स्तरावर खच्चिकरण सुरू होतं. कान्हा आधीच आपल्या वडिलांनी केलेल्या अत्याचारामुळे त्रासला होताच. आणि या वस्तीत आल्या नंतर त्याच्या आणखी एक भयानक प्रवासाची सुरुवात झाली होती.
कान्हा ची आई त्याची लवकरात लवकर कुठेतरी सुरक्षित सोय करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला कोणत्याही संस्थेत त्याला ठेवायचं नव्हतं. तिला तो तिच्या आसपास हवा होता. कोणीतरी तिच्या ओळखितील व्यक्ती हवी होती जी कान्हाला ठेवण्यास तयार होईल. परंतु असं कोण असणार याचा ती शोध घेत होती. शाळेत कान्हा खूप अस्वस्थ होता. तो त्याच्या आईचा पदर घट्ट धरून होता. त्याच्या हाताला कंप होता. त्याची आई माझ्याशी बोलत असताना त्याचं लक्ष मात्र बाहेर मुलं खेळत होते त्यांच्या कडे होतं.
मी त्याला काहीही विचारलं तरी तो आपल्या आईकडे बघत असे. मी त्याच्या आईला त्याचं कारण विचारल्यास ती म्हणाली, “ताई तो खूप घाबरुन असतो. थोड्या थोड्या गोष्टीला रडतो. आणि श्वास भरून येतो याचा आणि खूप कमी बोलतो.आपण काय बोलतो याकडे पण त्याच लक्ष नसते बघा. “इतकं बोलून तिने कान्हाच्या डोक्यावरून हात फिरवला. कान्हा अधिकच आईला चिटकला. मी तिला विचारलं, “तुमच्या गावाकडचं कोणी ओळखीचे आहे जवळ पास, जे कान्हा ला ठेऊ शकतील ?” तिने क्षणभर थांबून उत्तर दिलं, “नाही ताई, गावाकडचं तर कोणी नाही. आणि मी हा धंदा करते म्हणून कोणी असेल तरी ठेऊन घेणार नाही याला.
पण एक भाजीवाली मावशी आहे पलीकडच्या झोपडपट्टीत. ती मला कधी कधी उधार पैसे मागते. भाजी पोळीचा डबा पण देते कधी बिमार पडले तर. तिला विचारू का मी ? ताई तुम्ही पण बोलाल का तिच्याशी ?” मला नीटस कळलं नाही ती काय सांगतेय ते. आणि ती भाजीवाली मावशी कान्हाला का ठेऊन घेईल ? ते ही स्पष्ट होत नव्हते. मी परत तिला विचारलं, “तुमची तिची इतकी ओळख आहे का, की ती कान्हा ला तिच्या घरी ठेऊन घेऊन घेईल”? कान्हा माझ्याकडे आणि त्याच्या आईकडे बघू लागला. त्याची आई पुढे म्हणाली, “ताई आहे ओळख माझी. मावशी म्हणते मी तिला. तिचा म्हातारा दारू पितो. पण चांगला आहे. मी तिला गरज लागते तेव्हा काही पैसे देते. कधी ती परत करते तर कधी नाही करत. पण मी बिमार झाले तर पोळी भाजी आणि काहीतरी खायला आणते. आमच्यावर एवढा तरी जीव कोण लावणार ताई ?”
कान्हा ची आई बोलत असताना एक वेगळा विचार माझ्या डोक्यात सुरू झाला. त्याचा फायदा या मुलांना होऊ शकेल का ?……
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडिकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जीव पिळवटून जातयं ताई त्या बालपणासाठी त्यांची सुरक्षित शैक्षणिक सोय लावावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन