उधारीचे गोकुळ
कान्हाची आई अगदी प्रेमाने सगळी चित्र न्हाळत होती. सगळ्या चित्रात पेटणारी वस्तू, धगधगणारा वणवा, चुलीत जळणारी लाकडं, हे सगळं होतच. त्याच्या वडिलांनी त्याला दिलेले चटके यामुळे त्याच्या नाजूक मनावर फार गंभीर परिणाम झाला होता. त्याच्या मनावर त्या चटक्यांनी कायमस्वरूपी ठसा सोडला होता. पण कान्हा ला त्यातून बाहेर पडणं आवश्यक होतं. ते चटके बसायचे थांबले होते पण त्याची धग कान्हाला सतत जाणवत होती.
चित्र खूप छान काढली होती त्याने. पण आता त्याचे विषय बदलण्याची गरज होती. मग मी त्याला काही वेगळी चित्र दिली ज्यात कोणतीही पेरणारी वस्तू नव्हती. आणि त्याला ती चित्र काढून आणायला सांगितली. त्याने ती चित्र बघितली आणि मला हो सांगून ती चित्र आपल्या कडे ठेवून घेतली.
कान्हा ची आई म्हणाली, “ताई त्या मावशी शी तुम्ही बोलाल का ? ती कान्हाला तिच्याकडे ठेवेल का ?” ही मावशी म्हणजे कान्हा ची आई ची मानलेली मावशी होती. ती तिच्यावर फार जीव लावत असे. ही मावशी रोडच्या पलीकडे झोपडपट्टीत राहात असे. या वस्तीत येऊन ती या महिला कडून त्यांच्या जुन्या साड्या, कपडे गोळा करून नेत असे आणि त्या ऐवजी त्यांना प्लॅस्टिकच्या बादल्या डबे वगैरे देत असे. इतर भांड्यांची या महिलांना गरज नव्हती कारण त्या स्वयंपाक करत नसत. त्यांच्या खोलीत त्यासाठी जागा नव्हतीच. त्या रोज जेवण विकत घेत वा हॉटेल मधून कोणी त्यांना मागवून देत असे. म्हणून तिची या मावशी सोबत ओळख झाली आणि मावशीला गरज पडल्यास ती पैशाची मदत देखील करत असे. पण तिला कान्हा बद्दल विचारायला संकोच वाटत होता. आणि मनात भीती पण होती की, नाही म्हणाली तर काय करणार ?म्हणून कदाचित मावशी सोबत मी बोलावं असं तिला वाटत असावं. मी हो म्हणाले. कान्हा ची कुठेतरी सोय होणं खरंच गरजेचं होतं. या वस्तीत तो आतल्या आत कुढत राहणार हे निश्चित होतं.
मी त्या मावशी ला भेटायचं ठरवलं. पण माझ्या डोक्यात खूप विचार होते. हे सगळं कसं जुळवून आणता येईल या बाबत नीट मांडणी करावी लागणार होती. त्या मावशीला कान्हा ला तिच्याकडे ठेवून घेण्यात काय काय अडचणी येऊ शकतील या बाबतची उत्तरं माझ्याकडे आधीच तयार असायला हवी होती.
आज मी मावशीला भेटायला जाणार होते.
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ..☎️ 9869484800