बानो
दे नवी ओळख तुला तू
तुझा हक्क मिळवून घे तू
प्रश्न सारे सोड मागे
शोध तुझी नवी उत्तरे
जन्नत चे मार्क बघून माझ्या मनात मुलासाठी आणखी काय काय करता येईल या विचारांचा वेग वाढला होता. जन्नत ला खूप समजावलं होतं. अभ्यासात लक्ष लावायला हवं असं वारंवार सांगत होते. शिक्षण आणि शिक्षण हा एकमेव मार्ग होता या वस्तीतून बाहेर पडून आपलं भवितव्य घडवण्याचा.
जन्नत आपले वडिल कोण आहेत ते माहिती पण नव्हतं. त्यांना खूप पत्र लिहायची. आपल्या मनातील गोष्टी ती त्या पत्रात लिहायची आणि ते जपून ठेवायची. कधी तरी तिला तिचे वडील भेटतील, ते तिला स्वीकारतील आणि तेंव्हा ती त्यांना हे सगळे पत्र देणार असं तिने ठरवलं होतं.
तिची पत्र वाचली की मनाची घालमेल होत असे. एका पत्रात तिने लिहिलं होतं, “आप जो मेरे बाबा हैं आप रोज खाना खाते होंगे ना ? आपको मालुम भी हैं की, हमारे खोली मे तो रसोई भी नहीं है. सायकल वाला चाचा जो लेकर आता हैं वही हमको खाना पडता है”. त्या काल्पनिक बाबाला जन्नत आपल्या अडचणी लिहून सांगत असे पण हे देखील ठिक होतं एका अर्थाने त्या माध्यमातून ती व्यक्त तरी होतं होती. पण त्याच बरोबर एक वेडी आशा ती जोपासत होती. कागदावर तिनेच उमटवलेला बाबा या शब्दात आधार शोधत होती. त्याची वाट बघत होती.
आपलं मूळ जाणून घेण्याचा प्रत्येकाचा हक्क असतो. पण जन्नत ला कसे समजावयाचे की, तिचे बाबा हरवले नाहीय ते लपले आहेत ? ते जे कोणी आहेत तिचे बाबा असल्याची ओळख ते लपवत आहेत. आणि ते कधीही तिच्या पुढे येऊन ते स्वीकारणार नाहीत.
कालांतराने हे सत्य जन्नत स्वीकारेल देखील कदाचित पण आज तिला तिच्या विश्वातून ओढून काढणं तिच्यासाठी ठिक नव्हतं. कधी कधी जन्नत शाळेत वर्गातील मुलांसोबत खूप आक्रमक पण होत असे. तिच्या मनातील चीड कधी कागदावर, कधी ओरडून, कधी रडून ती व्यक्त करत असे.
मुलांचे असे वागण्याचे प्रश्न इथे सामान्य होते. प्रत्येक मुल कोणत्यातरी मानसिक, भावनिक समस्येशी दोन हात करून जगत होतं. रोज नवीन प्रश्न, नवीन आव्हान होतं. त्यांच्या जन्मावर, अस्तित्वावर रोज एक नवी शिवी त्यांच्या पदरात पडत असे. तरी ही मुलं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होती हा केवळ एक चमत्कार होता. त्यांच्या या प्रयत्नात त्यांची साथ देणं गरजेचं होतं.
बानोला पण तयार करावं लागणार होतं, जन्नत ला वस्ती पासून थोडं लांब ठेऊन तिला पुढील शिक्षण घेण्याची संधी देण्यासाठी. शिक्षणाची संधी मिळणं हा कान्हा, जन्नत आणि बऱ्याच मुलांचा हक्क होता.
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्षा, बाल कल्याण समिती. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800