Home साहित्य लालबत्ती ( ४७ )

लालबत्ती ( ४७ )

0

बानो
एक सपना….. असं शीर्षक देऊन जन्नत ने तिची छोटी छोटी स्वप्न तुकड्या तुकड्यात लिहिली होती.आपल्या आई ने कधीही तयार होऊन दारा समोर उभे राहू नये,हे वाक्य जन्नत ने वेगवेगळ्या प्रकारे कितीतरी वेळा लिहिलं होतं. एक जादूची छडी फिरावी आणि या वस्तीचं रूपांतर एका घनदाट जंगलात होऊन जावं आणि इथे जे कोणी येतील त्यांना जंगलातील प्राण्यांनी संपवून टाकावं असं पण तिने लिहिलं होतं.

जन्नत ला खेळ भांडी हवी होती. निदान खोटा खोटा स्वयंपाक करताना तिला तिच्या आईला बघायचं होतं. कधी केला नव्हता तो खेळ तिला तिच्या आई सोबत खेळायचा होता. कहे स्वप्न पण तिने लिहिलं होतं. आणि सगळी स्वप्न निदान चार चार वेळा तरी लिहिली होतीच. म्हणजे किती उत्कटतेने ही स्वप्न जपत होतं ते लेकरू !

कोणी कोणाला का असं बळजबरीने इथे डांबून ठेवतात ? का इतर मुलासारखे त्यांना जिवंत किंव्हा मेलेले असे एकच बाबा नाहीय ? असे अनेक अनेक प्रश्न जन्नत ने लिहिले होते.ते ती कोणाला विचारात होती, माहिती नाही. वरवर शांत वाटणारी जन्नत आत किती किती मोठं वादळ कसतरी सांभाळत होती.

जन्नत सारखी इथली सगळीच लेकरं आपल्या आत असे वादळ सामावून होती. कोण जाणे कधी कोणत्या रूपात ही वादळे बाहेर पडतील आणि कोणाला उध्वस्त करतीलकी स्वतःच आयुष्य धोक्यात टाकतील काहीच सांगता येत नाही.दररोज नवीन बदल, नवीन आव्हानं, नवीन प्रश्न, नवीन संकटे आहेत यांच्या वाट्याला दमत असतील ना ही मुलं या सगळ्यांना तोंड देऊन देऊन ? मग या भयानक विश्वात टिकून राहण्यासाठी हे विषाचे घोट गिळायची सवय करून घेत असतील.हे दुष्ट चक्र कुठेतरी थांबावं.

जन्नत चे एक छोटे से स्वप्न आज मी पूर्ण करणार होते. खेळ भांड्यांची एक फळी घेऊन जाणार होते
जन्नत साठी…..
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्ष बाल कल्याण समिती पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version