उधारीचे गोकुळ ३
कान्हा आणि अशा कितीतरी मुलांचे बालपण इथे ,या रेड झोन मध्ये अत्यंत असुरक्षित वातावरणात उध्वस्त होत आहे.यांना देखील सुरक्षित कुटुंब मिळणं आवश्यक आहे. नाहीतर ही मुलं उद्या परत हीच वस्ती जिवंत ठेवण्याच्या मार्गी लागलेली आपल्याला दिसून येईल. पण हे कसं शक्य होऊ शकेल ? याचा विचार माझ्या मनात घोळत होता. कान्हा ची आई त्याच्यासाठी चिंतित होती. पण एखाद्या संस्थेत ठेवायला पण ती तयार नव्हती.
आज पासून गणपती बाप्पाचे आगमन होणार होते. शाळेत देखील बाप्पा ची मूर्ती स्थापन होणार होती. मुलं खूप उत्साही होती. प्रत्येक विद्यार्थी काही ना काही तयारीत गुंग होते.मी शाळेत गेले तेंव्हा कान्हा एका कोपऱ्यात फुलांची माळ करत एकटाच बसला होता. खूप काळजीने तो एक एक फुल गुंफत होता. त्याचे छोटे छोटे नाजूक हात आणि बारीक बोटं फुला सारखीच दिसत होती. मध्येच तो आपल्या हातांचा सुगंध घ्यायचा. आणि परत माळ करायला लागायचा. मी लांबून त्याला बघतेय हे त्याला माहिती नव्हत. तो अस्वस्थ होईल म्हणून मी मुद्दाम त्याच्या जवळ गेले नाही. काही वेळाने कान्हा माझ्या कडे एक माळ घेऊन आला आणि आपला हात पुढे केला. पण काहीच बोलला नाही. मी ती माळ हातात घेतली. माळ खूप सुंदर दिसत होती. फुलं ओवताना कान्हाने त्याचा आकार, रंग याची विशेष काळजी घेतली होती. मध्ये मध्ये पान ओवल्यामुळे ती माळ अधिक मोहक दिसत होती. मी खाली बसले आणि कान्हा ला जवळ घेऊन, त्याने खूप सुंदर माळ केली आहे असं सांगितलं. त्याच्या डार्क चॉकलेटी डोळ्यात एक चमक आली. मग तो म्हणाला, “दिदी आणखी माळ करू का मी ?” कांन्हाचं बोलणं अगदी शुद्ध आणि गोड होतं. आज इतक्या दिवसांनी तो माझ्याशी हे एक वाक्य बोलला होता. मी त्याला आणखी माळा करून आणायला सांगितलं. कान्हा खुश झाला. लगेच पळत जाऊन त्या कोपऱ्यात बसला आणि माळ करू लागला. त्याच्या चिमुकल्या हातावर चटक्यांचे डाग आणि जखमेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. फुलांच्या स्पर्शाने कदाचित त्या सुखावत असतील म्हणून कान्हा खुश होता.
त्याच्या बाल मनाने, शरीराने जे आघात सोसले होते त्या कडवट आठवणी अशाच वेगवेगळ्या रंगानी पुसल्या जायला हवे असं मनोमन वाटलं. जखामांची तर्हा फार वेगळी असते. त्या वरवर बऱ्या झाल्या तरी त्याच्या खुणा, आणखी आणखी गडद होत जातात. असं कांन्हाच्या बाबतीत होऊ नये.
कान्हा एकटाच माळा गुंफत होता. रमला होता त्या फुलांच्या दुनियेत. एक एक फुल न्हाळत होता. फुलांचा सुगंध घेत नव्हता पण आपल्या बोटांचा, हाताचा सुगंध घेत होता. बाप्पाला अर्पण करण्यासाठी तो माळा करतोय म्हणून त्या फुलांचा सुगंध घेऊ नये याची जाणीव त्याला होती. बाल भावना इतक्या तरल आणि नाजूक असतात !
बाप्पाची स्थापना झाली. आरतीच्या वेळी सगळी मुलं पुढे आली पण कान्हा हळूहळू आणखी आणखी मागे जाऊ लागला.
पण का ?……
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
राणी खेडकर यांचा कान्हा खूप खोलवर प्रभाव करून गेला.