लाल दिव्याच्या वस्तीवर एक ‘आई’ भेटली मला….
गडद काजळी रेषे मागे
दाटली होती
अगतिक ममता
डोळ्यामधुनी लाजे संगे
वाहत होता
ओला ठिपका
लाली पांघरलेल्या ओठाखाली
जखमा होत्या हिरव्या
लाल दिव्याच्या वस्तीवर एक ‘आई’ भेटली मला
नजर विकून पहारा केला
जपले कुशीत बाळाला
दगडी झाले डोळे
बाळाच्या नयनीं
स्वप्नाचे काजळ भरताना
ती लपवून घेते बाळ कुशीत
पदर बाजारी जळताना
लाल दिव्याच्या वस्तीवर एक ‘आई’ भेटली मला
हसरा चेहरा
मनात हुंदका बदनामीचा
घाव सोसला
गाव हरवलं
अंगण सुटलं
परका झाला
नात्याचा धागा
बाळ तिचे आणि ती आई बाळाची
ही एकच ओळख
उरली आता
अखंड ताकदीची आई ही
तिला करू
मानाचा मुजरा
लाल दिव्याच्या वस्तीवर एक ‘आई’ भेटली मला
– रचना : डॉ. राणी दुष्यंत खेडीकर, बालमानस तज्ञा
आपल कार्य आणि कर्तृत्व या कवितेतून दिसून येते.
मानाचा मुजरा
खूप छान रचना