Wednesday, July 2, 2025
Homeलेखलाल वस्तीवरचं बाळ....

लाल वस्तीवरचं बाळ….

“बाबू दिखाई नाही देता, कहां है ?” मी कजरीला विचारलं. पण सात वर्षाची कमली पटकन खाटेकडे बोट दाखवत म्हणाली, “अभी खाट के नीचेसे निकला नाही उसको माँ ने”. कजरीने आपले काजळ भरलेले मोठे डोळे अधिकच मोठे करत कमलीला गप्प राहण्यास खुणवले. कमली मान खाली करून चोरट्या नजरेनं माझ्याकडे बघत होती. कजरीने खाटेवरची चादर पुढे ओढली आणि उगाच काहीतरी अवरतेय असं दाखवत विषय बदलत म्हणाली, “दीदी, ये कमली को कहीं कोई कीलास लागवा दो. जरा भी पढाई ना करती ये”. कमली खाटेखाली आणि माझ्याकडे आळीपाळीने बघत होती, जणु कुठल्याही क्षणी काहीतरी गुपित बाहेर पडेल असे काहीसे भाव, तिचा चेहरा व्यापुन होता. मी कजरीला उत्तर देत म्हणाले,  “हां बात करती हूं टीउशन क्लास के लीए”. तेवढयात बारीक आवाज आला खाटेखालून. कमलीने माझ्याकडे बघितलं, त्याचवेळी काजरीने पटकन खाटेवर पडलेला छोटा ट्रांजिस्टर सुरु केला, त्याच्या आवाजात तिला खाटेखालुन येणारा आवाज नाहीसा करायचा होता. म्हणुन कदाचित, ती धडपडत होती. मी कळुन न कळ्ल्या सारखं केलं, तीला काय लपवायचं होतं, त्यात तीची मदत करावी असं वाटलं.

मी निघाले होते, कमली पण माझ्या मागे आली लगेच. आणि तेवढ्यात बाळ रडल्याचा जोरात आवाज आला. ट्रांजिस्टर च्या आवाजाला मागे टाकत स्पष्ट सगळीकडे बाळाचं रडणं ऐकू येत होतं. आता कजरीचा नाईलाज झाला होता, तिने पटकन खाटेखालुन बाळाला काढलं. पाच, सहा महिन्याचा बाबू शी, सु झालेल्या अवस्थेत किंचाळून रडत होता. मी काहीच बोलले नाही. कजरीला काहीच न विचारता म्हणाले, “बाबू के कपडे बदल के दुध पिला दो”. कजरीने होकार्थी मान हलवली. आणि मी निघाले कमलीला घेऊन.

जरा लांब आल्यावर, कमलीला, कधी सगळं एकदाच मला सांगते असं झालं होतं तिला, इकडचा तिकडचा आडोसा घेत ती म्हणाली, “दीदी बाबू को माँ ने कालू मामा की पुडीया पिलाई थी सुबह को”. मी विचारलं,  “बाबू बिमार है क्या ? कोई दवाई दी थी क्या माँ ने ?” कमली माझ्याकडे, मला अगदी काहीच कळत नाही अश्या आविर्भावात म्हणाली, “ना दीदी, ये पुडीया तो सभी छोटे बच्चे लोगोको देते है. जो सरकते नही, मतबल बाबू के जीतने छोटे”. मला काहीच कळलं नव्हतं असं नव्हतं. पण मी पुढे कमलीला विचारलं, “पुडीया देने से क्या होता है कमली ?” तिने परत माझ्याकडे हसुन बघितलं आणि म्हणाली, “दीदी, आपको तो कूछ भी मालूम नाही हैं, ऊससे, छोटे बच्चे लोग पांच, छह घंटे सो के रहते हैं, खाट के नीचे. माँ को परेशानी नही होती, फिर धंदे मे”. सात, आठ वर्षाची कमली ती, तिला जेवढं कळालं होतं ते तिने मला सांगितलं आणि उड्या मारत माझा हात धरून पुढे चालु लागलीं. मी खुप अस्वस्थ झाले.

अशी कुठली पुडीया दिली जाते या तान्ह्या लेकरांना ? ज्यामुळे ती सहा, सात तास शी, सु झालेल्या अवस्थेत झोपली असतात खाटेखाली, बेशुद्ध असल्यासारखी ? झोपेचं औषध ? की आणि काही ? त्यामुळे त्यांच्या शारींरिक, मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होईल ? असे अनेक प्रश्न मला हैराण करू लागले. कमलीला शाळेत सोडून थोडा वेळ तिथेच शिक्षकांशी बोलले, आणि वस्तीतुन परत जाताना कजरीच्या खोलीकडे लक्ष गेलं, बाबू खाली दुपट्यावर सुस्त पडला होता. तेवढ्यात, एक सोळा सतरा वर्षाचा बारीक, काळासा मुलगा तिथं आला, त्याच्या कपाळावर झापर्या केसांचा कोंबडा पसरला होता, खप्पड गालात भरलेला गुटखा चघळत तो हवं तिथं थुंकत होता. इथली मुलं कौमार्य अवस्थेत येई पर्यंत अशी अनेक प्रकारच्या व्यसनाच्या ताब्यात गेलेली असतात आणि त्यातच गुरफटत जातात. सोळा सतरा वर्षांच्या वयातच ही मुलं आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्याच्या अत्यंत खराब पातळीवर आलेली असतात.

कजारीला पुडीया दाखवतं तो म्हणाला, “पिछले पैसे बाकी है अभी, और फिर से पुडीया मांगी क्या ? बाई, कच्ची अफू क्या फिरी(free) मे मिलती है ?” ते ऐकून माझे हातपाय गारठले.

चार ते पाच महिन्याच्या बाळांनां कच्ची अफू दिली जाते. याचा त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत असेल याचा विचार देखील सुन्न करून जाणारा होता. आणि कुठल्या प्रमाणात हे त्यांना दिलं जात असावं ? कोणी हे प्रमाण ठरवलं असावं ? असे अनेक प्रश्न आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी अस्वस्थ करणारे होते. पण त्या आईकडे दुसरा पर्याय तरी आहे का ? हे देखील तितकच महत्वाचं होतं. हा प्रसंग बघून, आई म्हणून ती आपल्याला निष्ठुर वाटेल कदाचित पण, तिला ते मुल हवं असतं आणि त्यासाठी त्याला ती कोणा ही जवळ देऊ शकत नाही आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ती स्वतः आपल्या बाळाला थेंब थेंब जहराची घुटी पाजण्यासाठी विवश असते. किती ही असह्ययता ?

एक आई आपलं बाळ आपल्या जवळ ठेऊ इच्छिते. मांजर देखील तिच्या पिल्लाला काही धोका आहे असं जाणवल्यास आपल्या दातात धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते त्यावेळी तिच्याच दातांनी ते पिल्लू जखमी होत असतं आणि ती मांजर आपल्या लाळेने त्याची जखम बरी करत असते. पण इथे तर ही आई इतकी असमर्थ आहे की तिला आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे मानसिक, शारीरिक आरोग्य धोक्यात टाकावं लागत आहे….  ही किती मोठी विटंबना आहे !

कजरीला आता लक्षात आलं होतं की मी त्या मुलाचं बोलणं ऐकलं आहे. तिने माझ्या डोळ्यातील प्रश्न सहज वाचले आणि मी काही विचारण्या आधीच, मला म्हणाली, “दीदी आप ही बोलो क्या करें बच्चे को किसके पास दे ? इधर तो अपने खुद के दात का भी भरोसा नहीं है. तो गैर का क्या ?  इतने छोटे बच्चे तो बडे दामो मे बिकते हैं.”

आपल्या सारख्या सामान्य माणसाला इतकी किचकट प्रश्न असू शकतात याचा देखील अंदाज बांधणं अवघड आहे. तर या प्रश्नांची उत्तरं कशी शोधणार आपण ?
मी केवळ बघत राहिले तिच्या काजळी डोळ्या मागची लाचार आई. आणि तिच्या लाल ओठाखालची ती हिरवी जखम.

बाबूचे कोरडे डोळे मात्र जणू वाट बघत होते सुरक्षित ओलाव्याची आणि एक हक्काच्या पाळण्याची …………

पीएचडीचा अभ्यास करताना रेड झोन मधील माता आणि त्यांच्या मुलांचं जगणं अभ्यासताना अनेक घटना, प्रसंग जवळून बघितले. समाजाने अनौरस ठरवलेल्या व्यावसायिक विश्वात रेड झोन मधील मातांची मूलं देखील अनौरस ठरतात आणि ती निष्पाप लेकरं होरपळून निघतात या भयानक आगीत.
जन्माच्या आधी पासुनच त्यांचा खड़तर प्रवास सुरु होतो. असुरक्षितता पाचविला पूजलेली असते. आईच्या व्यवसायाच्या वेळी त्यांना सांभाळायची कुठलीच निश्चीत व्यवस्था नसते. अश्या परिस्थितीत मुलांचा सांभाळ करणं मातेसाठी एक मोठं आव्हान असतं.

New Delhi, the 26th April 2013 RESOLUTION 1.3 The National Policy for Children, 1974 recognised that programmes for children should find prominent place in national plans for the development of human resources, so that children grow up to become robust citizens, physically fit, mentally alert and morally healthy. या अंतर्गत बालकांचे हक्क त्यांची सुरक्षा यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण तरी ही रेड झोन मधील ही निष्पाप बालकं अश्या असुरक्षित परिस्थितीत असाहाय अवस्थेत प्रत्येक ‌क्षणी नवीन जोखीमेस तोंड देत आहेत, हे यंत्रणे समोर एक मोठं आव्हान आहे.

डॉ राणी खेडीकर

– लेखिका : डॉ. राणी खेडीकर, बाल मानस तज्ञा, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. या लेखाने खरोखर निःशब्द केले.
    आपले कार्य खूप महान आहे. लेख वाचून सगळा प्रसंग समोर उभा राहिला.
    आपल्या कार्याचे खूप कौतुक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४