कोरोना या अदृश्य विषाणूच्या वावराने दृष्य स्वरूपातील मानवी हालचालींवर अनेक बंधने आली. पृथ्वीवरील विशाल देशसुध्दा ‘लॉक’ झाले. विविध दैनंदिन व्यवहार ‘डाऊन’ झाले. याकाळात घरकोंबडा बनलेला माणूस समाज माध्यमातून नव्या प्रयोगांचा अविष्कार करू लागला. नव-नव्या समाज माध्यमांच्या जंजाळात लिखित वाचन चळवळ हरवली हा आरोप खोडून काढण्यासाठी याच समाज माध्यमाचा अभिनव वापर करत, ‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ हा प्रातिनिधिक कथासंग्रह निर्माण झाला. अर्थात हे घडलं ते ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्यामुळे !
लॉकडाऊनच्या काळात व्हॉटस्ॲप गटाच्या माध्यमातून वाचन आणि वाचक चळवळ सर्वदूर करण्यासाठी श्री. पोतदार सरांनी पुढाकार घेतला. या गटामध्ये दिग्गज साहित्यिकांसोबतच माझ्यासारख्या नव लेखकालाही प्राधान्य मिळाले. या गटावर दररोज एका लेखकाची कसदार कथा पोतदार सर पाठवत असत. ती पाठवताना कथेसोबत लेखकाचा परिचय आणि कथेमागील बीज याचाही आवर्जून समावेश असायचा. या कथेवर पुढे आठवडाभर चर्चा व्हायची. एका लेखकाच्या लेखनावर कसलेल्या साहित्यिक सदस्यांकडूनच परीक्षण होत होते.
या गटामध्ये देशातील विशेषत: महाराष्ट्रातील आणि बेळगाव सीमा भागातील विविध भागात नोकरी, उद्योग करणाऱ्या लेखकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक लेखनात त्या भागातील प्रादेशिकता, वेगळ्या चालीरिती, तेथील परंपरा, भाषेचा लहेजा उतरलेला असायचा. हा साहित्यिक गोडवा वाचायला, प्रसंगी अनुभवायला मिळाल्याने वाचकाची अनुभव संपन्नता अधिक रूंदावत गेली. पुढे २००हून अधिक सदस्य असणाऱ्या याच गट सदस्यांमधून निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्याची संकल्पना पुढे आली आणि तिने मूर्त स्वरूपही धारण केले.
‘सर्वस्पर्शी प्रतिभांचा कथाविष्कार’ या प्रातिनिधिक कथा संग्रहाचे प्रकाशन पुणे येथील वेदान्तश्री प्रकाशनाने केले आहे. या कथासंग्रहाला पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी १६ पानांची प्रस्तावना लिहिली आहे. ही प्रस्तावना म्हणजे या लेखनाची समीक्षाच ठरते. त्यामधून वाचकांना आणि लेखकांना उभारी देण्याचा उद्देश दिसून येतो.
या कथासंग्रहात बबन पोतदार, लक्ष्मीकमल गेडाम, संध्या धर्माधिकारी, राजेंद्र भोसले, मंगला बक्षी, वंदना धर्माधिकारी, अजित काटकर, सुवर्णा मस्कर, प्रशांत सातपुते, पौलस वाघमारे, राजेंद्र अत्रे, सुनील वेदपाठक, डॉ. राजश्री पाटील, हरिश्चंद्र पाटील, शंकर पाटील, दीपक लोंढाळ, प्रकाश महामुनी, गुणवंत पाटील, बबन कदम आणि आशा पाटील या २० लेखकांच्या कथांचा समावेश आहे. या मधील कोणी न्यायाधीश आहे. कोणी शासकीय अधिकारी आहे. कोणी वकील, कोणी पत्रकार, कोणी डॉक्टर तर कोणी साहित्यिक, कोणी शेतकरी देखील आहे. लवकरच या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा अपेक्षित असून तो यथायोग्य ऑनलाईन पार पडेल. तोपर्यंत वाचकांनी या कथासंग्रहाची मागणी नोंदवून वाचन चळवळीला आपलं पाठबळ द्यावे. शिवाय मनोरंजनातून अनुभव विश्व व्यापक करावे. या निमित्ताने एवढचं.
संपर्क: संपादन बबन पोतदार,५८३ घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण बिल्डिंग, स्वारगेट, पुणे 411042, भ्रमणध्वनी : 9860609021
वेदान्तश्री प्रकाशन, 1675/1, कृष्णलिला चेंबर्स, सदाशिव पेठ, टिळक रोड, एसपी कॉलेजसमोर, पुणे 411030. दूरध्वनी : 020-24478080,
भ्रमणध्वनी : 9764157035.
लेखन : प्रशांत सातपुते, कोल्हापूर
9403464101
संपादक : देवेंद्र भुजबळ, मुंबई
9869484800