तो एक पुरषी अहंकार रोमारोमात भरलेला. .. केसांचा कोंबडा, इस्त्रीच्या कडक कपड्यातला, पर्फ्युम्स मनसोक्त वापरणारा, चकचकित बूट .. असा स्वत:ला देखणा समजणारा घरचा धाकटा मुलगा.
घरात मोठे दोन जबाबदारी समजणारे भाऊ, प्रेमळ कौतुकाच्या वहिन्या व स्वत: आई, वडिल आणि तीन पुतणे अशा पुरषी वर्चस्वाच्या कुटूंबाचा एक कोपरा.
सतत मित्र, भेटण्याचा नाका, अरेरावी, मुलींना तुच्छ समजत टिका करायचा, अशा बेफिकीरीत वावरत असणारा ..
असा होता. जबाबदारी म्हणुन काही माहित नाही. शिक्षण नोकरी यांची फारशी पर्वा करत नसे.
यथावकाश लग्न झालं. मोठ्या तोरा रूबाबात मिरवला.बायको समजुतदार सगळं छान चाललं. ‘गोड बातमी’ आली व नंतरच्या सोहाळ्यात आठ महिने निघुन गेले. आई वहिन्या काळजी घेत. नवव्या महिन्यात ती माहेरी गेली.
आता त्याला तिचे ‘असणे’ कळायला लागले. तिच्याशिवाय आपण जगू शकणार नाही हे समजताच त्याचा अहंकाराचा मीटर खाली ऊतरला.एक दिवस आईने मी दवाखान्यात जाते. तुला कळवते. मग तू ये. तो ऑफिसला निघुनही गेला.
चार वाजता आईने खुप आनंदात कळवले .. “अरे ! तुला मुलगी झालीय!..घरी लक्ष्मीचे सोन्याचे पाऊल पडलंय”! मुलगा हवा असल्याने त्याला फारसा आनंद झाला नाही.
चार वाजता निघुन तो दवाखान्यात पोंचला. तिची चौकशी करताना अत्यंत आनंदात असणार्या आईने त्याच्या हातात ती दुपट्यात गुंडाळलेली, गोरीपान, गोबऱ्या गालाची काळेभोर डोळे व घनदाट जावळ असणारी मुलगी हातावर ठेवली.
“ही बघ तुझी लेक ! भाग्यवान आहेस”. म्हणत कौतुकही केले. ती हातावर ठेवल्या क्षणी तो तिच्या स्पर्षाने अंतर्बाह्य थरारून गेला. तिला जवळ घेऊन कवटाळत खुप खुशीत आला.ही माझी आहे ही एक भावना मनावर स्वार झाली. तो पुरा बदलूनच गेला. पुरषी अहंकार सारा गळून पडला. तिला घट्ट धरूनच ठेवली. शेवटी आई म्हणाली, अरे.. शेवटी परक्याचे धन. हिला शिकवायची मोठी करायची व चांगले बघुन दुसऱ्याच्या हाती सोपवायची. असं घट्ट धरून कशाला ठेवतोस ?
हे ऐकून तो आतुन तुटलाच. आताच नाही सोडवत मग तेव्हा कायमची कशी सोडणार याचा ?…..आणि एक ‘मुलीचा. बाप”… जन्माला आला. औक्षण, रोषणाई, रांगोळ्या गुलाबाच्या पायघड्या असं कौतुक करत लेक धनाची पेटी बनुन घरात आली. सारे घरदार तिच्या कोतुकात हौसे मौजेत गुंतून गेले. कामावर नीट लक्ष देऊ लागला. ऊरलेले शिक्षण पूरे करू म्हणाला. घरी आल्यावर लेकीला घेऊन अंगणात फिरू लागला. मित्र नाका भेटी सहली ट्रेकींग सारे विसरून फक्त लेकीबरोबरच वेळ काढू लागला.
लेकही एकीकडे मोठी होत केवळ बाबाचीच होऊन राहिली. वर्षभरात त्याचे बोट पकडुन चालायला शिकली .. बोलायला शिकली.. त्याच्याच हातुन खाऊ पिऊ लागली.
दुसऱ्या वाढदिवसाला परकर पोलके पैंजण आजीने आणले व ते घालून लेक घरभर नाचली आणि बाबाच्या मांडीवर झोपून गेली. त्याला ती ऊगाचच खूप मोठी वाटली.
पांचव्या वर्षी त्याचेच बोट पकडून ती शाळेत गेली. जाताना रडली तेव्हा आपल्याशिवाय ही आत गेली नाही. रडली याचे फार कौतुक वाटले. तो लवकरच आणायला गेला तर ही इतर मुलींबरोबर छान हंसत खेळत बाहेर आली. त्याच्या काळजातून एक मोठी कळ ऊठली. “आपल्या शिवाय”.. ही खुशीत असलेली.. डबा संपवलेली लेक त्याला बघवेना. हे दु:ख सोसवेना. पण हे रोजचंच झालं. संवय झाली.
एक दिवस त्याने हौसेने भाड्याची सायकल आणली. तिला शिकवण्यासाठी पंधरा दिवस धाप लागेपर्यंत धावत होता. ती पडणार नाही, रडणार नाही याची काळजी घेत होता. एक दिवस त्याच्या हातातुन सायकल सुटली आणि लेक सायकली बरोबर मस्त चालवत खूप दूर गेली. डोळे भरून आले.. सारे धुसर झाले. आता आपली गरज संपली हे समजुन आत आक्रंदत राहिला. मग रोजच मैत्रीणी, सायकली व एकट्या फिरणे ही मजा चालू झाली. नाही म्हंटले तरी बाबा दुरावलाच.तिचा अभ्यास घेताना थोडा कठोर झाला. शिस्तीवर भिस्त ठेऊ लागला. हळूहळू ती मैत्रीणींबरोबर अभ्यास संपवू लागली. एकेक दु:ख तो अगतिकतेने गिळत राहिला.
अचानक एक दिवस घरात काही बायका जमल्या. रांगोळी तोरण लटकले होते. गोडाधोडाचे वास दरवळले होते. लेक नटुन थटुन आली. आणि ती ‘मोठी’ झाल्याचा सोहळा रंगला.त्यादिवशी बाबा हबकलाच. अरे, इतकी मोठी कधी झाली ही !… इतकी घाई कशाला ? रहा ना अजुन लहान ! असं पुटपुटत राहिला.
तिला आता वेगळंच सांभाळायची जाणिव बाबांना झाली. तिला आता कितीही कौतुक माया वाटली तरी थोडे दुरूनच वागवायचे हे त्याला आपोआप समजले. मोठी झालेली लेक शाळा, अभ्यास, छंदवर्ग, स्पर्धा, बक्षिसे, पुरस्कार यात गुंततच गेली व बाबा थोडा थोडा दुरावत गेला. दुरून बघायची, काही बोलायचे, होसमौज लाडकोड करायचे इतकंच हातात ऊरले. आतुन कासावीस होत राहिला.
ती ही बाबांची काळजी घे… चहा पाणी कर. कामात मदत कर अशी दुरून बाबाची लेक होऊन रहात होती. मन काळीज व भावना गुंतलेल्या होत्या, पण दुरावा वाढत होता. चिंता, काळजी व माया वाढत होती.
शिक्षण कधी संपत आले समजलेच नाही. घरात आजी आई काकू लग्नाच्या गप्पा करू लागल्या. हा बाबा तर हादरूनच गेला. हिला लग्नात दुसऱ्याच्या हातात सोपवायची, या नुसत्या कल्पनेनेच तो मनात दुभंगून गेला होता.
आणि एक दिवस लेक तिच्या मित्राला घेऊन घरी आली. मुलगा घरंदाज, देखणा, तगडा, सुस्थितला होता. पोलिसमधे नोकरीत होता. मैत्रिणीचा भाऊ हिला पसंत पडला व ती त्याला घरी घेऊन आली. मुलगा बघुन सारे आनंदले. कौतुक झाले. हा बाबा बेचैन झाला. माझ्याशिवाय हिने इतका मोठा निर्णय घेतला ? माझं बोट सोडुन याच्या हातात कसा हात दिला ? इतका विश्वास त्याच्यावर ?
तो ऊन्मळुन पडला. समोरचे काही दिसेना, समजेना, कळेना. इतके सर्व अचानक घडले की तो स्वत:ला सावरूच शकला नाही.
नंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या आईवडीलांना घेऊन आला. लेकीने त्यांची आई बाबा म्हणुन ओळख करून दिली. त्यांने आई बाबा म्हणुन नमस्कार केला. खरंच आता हृदय बंद पडणार असंच त्याला वाटलं. माझी लेक .. आणि .. मी तिचा बाबा .. , या भावनेला न सोसणारा धक्का बसला.
ते गेल्यावर आई आजी व काकूंनी समजुत काढली तरी तो मनातुन ढेपाळलाच होता. कशातही मन लागेना. हे सगळं त्याला अनोखे, नकोसे होते.
साखरपूडा झाला. त्याचीच लेक नक्षत्रासारखी दिसत होती. ती खुप आनंदात होती. मित्राशी खुप सारखी हंसत बोलत होती आणि हा इकडे रडायला येईल का या अवस्थेत पोचला होता. तिच्या बोटातली अंगठी हातावरची मेंदी सगळंच त्याचे मन अस्वस्थ करत होते.
महिन्याभरात अंगण सजले. रोषणाई झाली, पाहुणे जमले. पक्वान्ने बनू लागली. दागदागिने कापड खरेदी झाली. आता याला जाणिव झाली. जे काय घडत आहे ते तिच्या मनासारखे व्हायला पाहिजे. उसनं अवसान गोळा केले. मनी धीर धरला. खंबीरपणा अंगी आणला व वधूपिता म्हणुन कुटूंबात ऊभा राहिला. थाटामाटात लग्न लागलं. कूठे म्हणजे कूठे काही ऊणे पडू दिले नाही. दु:ख, भावनांचा कोंडमारा लपवता येईल तितका कोंडला.
पाठवणी सुरू झाली. आई प्रथम कोलमडून पडली. मग घरातील मायेच्या स्त्रीया. शेवटी त्याने मनात असलेला त्यांच्याविषयीची असुया बाजू सारत हात जोडले… अहंकार गिळत “माझ्या लेकीला सांभाळा… चुक भूल माफ करा..” म्हणत गहिवरत निरोप दिला.
वरात गेली. लेक परत परत वळुन त्याच्याकडे बघत डोळे पुसत राहिली इतकंच त्याला समाधान मिळालं. कालपर्यंत या घरची ती सर्वात लाडकी होती आता त्या मोठ्या घराची मोठी जबाबदार सुन झाली आहे. ही जाणिव त्याला अधिक मोठी करून गेली. तिला शोभेसं आता आपण वागायचं. तिला कुठेही कमीपणा आणायचा नाही हे त्याला ऊमगलं व तो दहा पंधरा वर्षांनी मोठ्ठा झाला.
घर एकदम शांत झालं. तिचा आरडाओरडा, सर्वांशी ममतेचे वागणं, घरातली ऋजूता, सारेच हरवले. ऊरल्या फक्त तिच्या आठवणी. असंख्य फोटो. तिचा एक कोपरा रिकामा होऊन टोचत राहिला.
ती सुखात आहे… आनंदात आहे. हे फारच मोठे समाधान प्रथमच जाणवले. बंद असलेली तिची खोली आवरायला आईने उघडली. तो ही आत शिरला. तिचे फोटो, पुस्तके, कपडे, पर्सेस, प्रसाधने काही त्यांच्या अशा ओळखीच्या खुणा, हे सारे बघुन त्याचे अवसान गळले…. धीर सुटला. क्षणात तो कोसळला व हमसुन हमसुन रडू लागला. इतकी ‘आपली’.., माझ्या रक्तामासाची, माझी जीव की प्राण असणारी लेक आज अनोळखी अशा परक्या घरी गेली. मला सोडून ती जाऊच कशी शकली ? म्हणत रडू लागला. त्याला सावरतांना आई, बायकोला खुप कठीण झाले. आई म्हणाली… “दु:ख का करतोस ? देवाने तुला ती जबाबदारी दिली होती. तू तिला लाडाकोडात हौसेने वाढवलेस. इतके शिकवलेस. थाटामाटात लग्न करून दिलेस. आता ती तिच्या घरी गेली. जायचीच होती. ती जन्मली तेव्हाच हे ठरलेलं होतं.” एक लक्षात ठेव ती तिथे असली तरी तिचा एक डोळा व अर्ध काळिज इथेच आहे, ती इथे लक्ष ठेऊन असेल. तिच्या श्वासात, ध्यासात तू व आई असालच. अडीअडचणीला धावत येईल. माझ्या मागे या घरादारावर मायेची बरसात करेल. घरपण जपेल. दु:खी होऊं नकोस.
म्हणुन तर लेक मागायची असते. पण ती फक्त भाग्यवंतांच्याच घरी जन्म घेते. हे असंच असतं लेकीचं नाते. पहिलं बोट पकडायचे व मग हळुवार दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचे.

— लेखन : अनुराधा जोशी. अंधेरी, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800