Tuesday, December 24, 2024
Homeबातम्यालेखकांमध्ये विश्व बदलण्याची ताकद !-डॉ. रवींद्र शोभणे

लेखकांमध्ये विश्व बदलण्याची ताकद !-डॉ. रवींद्र शोभणे

“सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे. माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी – लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात.” असा आशावाद अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला.
शारदा प्रकाशन, ठाणे आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन, मुंबई (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रकाशन सोहोळ्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा.अरुणा शोभणे,लेखिका प्रज्ञा पंडित, लेखिका माधुरी वैद्य, लेखिका उषा राव, चित्रकार सतीश खोत, मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील, लेखक संदेश लाळगे, सहलेखिका स्वाती राणे, प्रकाशक डॉ.संतोष राणे, मनीष पंडित, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.शोभणे म्हणाले की, “मोबाईलमुळे माणूस जवळ आला असे वाटत असले तरी मनाने तो दूर गेलेला आहे. त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडायचे असेल तर सर्व भाषेतील लेखकांना महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. नव्या पिढीला वाचनाच्या, पुस्तकांच्या, साहित्याच्या जवळ न्यावे लागेल. साक्षर समाजापेक्षा सुसंस्कृत समाजच उद्याचा नवा भारत अधिक प्रगतीशील करतील. शाळा – महाविद्यालयांमध्ये पुस्तकाची प्रदर्शने भरवली पाहिजेत. जसे जमेल तसे कवी – लेखकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. विध्यार्थ्यांमध्ये आपण वाचनाची आवड निर्माण करू शकलो तरच साहित्यनिर्मितीला अर्थ राहील.”

यावेळी माधुरी वैद्य यांच्या नर्मदा परिक्रमा, मनमित, डायनाच्या बांगड्या, गीताचे लग्न, हादसा, युरेका, कवयित्री प्रा. प्रज्ञा पंडीत यांच्या बहावा, कथानक, १५० वेज टू थिंक पॉझीटिव्ह, कॉन्फीडन्ट पब्लीक स्पीकिंग, १५० टिप्स टू ओव्हरकम एनझाइटी अँड फियर, हाऊ टू वीन इंटरव्हूज आणि चित्रकार सतीश खोत यांच्या “अर्करेषा”, मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील यांच्या “मी कुणबी बोलतोय” तसेच प्रा. संदेश लाळगे यांच्या “स्व – यशाची गुरुकिल्ली” या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

“प्रा.प्रज्ञा पंडित यांच्यामध्ये कादंबरी आणि कथालेखनाची क्षमता असल्याचे सांगून डॉ.शोभणे यांनी लेखिका पंडित यांच्या सर्वच पुस्तकांचे कौतुक केले. माधुरी वैद्य या अनुभवी लेखिका असून त्यांनी सतत लिहित राहावे, असेही सांगितले. चित्रकार सतीश खोत शब्दांतून बोलतात.
चित्रकार खोत यांनी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची अर्कचित्रे रेखाटलेली आहे. ही अर्कचित्रे अतिशय बोलकी आहेत.लेखक लक्ष्मण पाटील यांच्या ‘मी कुणबी बोलतोय’ या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या अनेक चालिरिती, प्रथा समजण्यास मोलाची मदत होईल असे सांगून डॉ.शोभणे यांनी कविता वाचून दाखवली. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणाऱ्या संदेश लाळगे यांचे पुस्तक प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी प्रकाशनाला केले.”

यावेळी ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन मुंबई (रजि.) यांच्या वतीने अध्यक्षांच्या हस्ते पाच पुरस्कार विजेत्याना शाल, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. उषा राव, डॉ. प्रकाश जंगले, सौ.मानसी सूर्यवंशी, पोलीस कवी नारायण गाडेकर आणि कवयित्री मनिषा गोडबोले इत्यादी मान्यवरांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रज्ञा पंडित, माधुरी वैद्य, सतीश खोत, लक्ष्मण पाटील, संदेश लाळगे, डॉ.उषा राव, डॉ.संतोष राणे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन प्रा.रुपेश महाडिक यांनी केले.
या प्रकाशन सोहोळ्यास विष्णू यादव, प्रज्ञा पावगी, पुरुषोत्तम लोखंडे, श्रीकांत भिडे, आप्पा महाशब्दे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments