“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याचे
स्फुल्लिंग पेटविणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही आदरांजली.
लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
धगधगता अंगारच होता
शब्दांनाही धार
पाया रचला टिळकांनी अन
झाली नौका पार
स्वराज्य हा तर हक्कच माझा
लढेन मी त्यासाठी
कोटी जनता सामील झाली
तेव्हा टिळकांपाठी
चेतवीला जनतेच्या हृदयी
स्वाभिमान जहाल
‘ग्रेट ब्रिटन’ला धक्का बसला
हादरला राणीमहाल
केसरीतूनी आसूड ओढले
ब्रिटीश सत्तेवरती
‘स्वराज्य ‘ हे तर ध्येय आमचे
सोडा आमची धरती
हसत भोगले तुरुंग जीवन
राष्ट्र कार्य मानून
नव्या पिढीने नक्की घ्यावे
‘लोकमान्य’ जाणून
थोर गणिती, फर्डा वक्ता
कुशल संघटक मोठा
गीतेमधले रहस्य सांगे
जणू धरूनी बोटा!
लोकमान्यता देशभरातून
अपार खूप लाभली
नर केसरी ही उपमा देखील
स्वभावास शोभली!
शिकवून गेले भारतीयांना
ताठ असावा कणा
अजरामर टिळकांची कीर्ती
जय जय टिळक म्हणा
जन्माला येवोत अजूनही
टिळक नव्याने पुन्हा
विचार त्यांचे देशहिताचे
उज्ज्वल पाऊलखुणा !
— रचना : मुरारी देशपांडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800