“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा स्वराज्याचा जाज्वल्य मूलमंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज ,२३ जुलै २०२० रोजी १६४ वी जयंती आहे. यानिमित्ताने त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि आजच्या कोरोनातील बिकट परिस्थितीत तो साधेपणाने साजरा करण्याची गरज याविषयीचा हा विचारप्रवर्तक लेख….
इतिहासाची पाने नीट उलगडून पाहिल्यास प्रत्येक घोषणा ही आपल्याबरोबर नवा इतिहास घेऊन येते. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या `मेरी झाँसी नहीं दूँगी’ नंतर १८५७चा पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम पेटला होता. त्याचप्रमाणे स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या महावाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि ती मशाल पुढे सतत पेटत राहिली, प्रखर होत गेली.
लोकमान्य टिळक यांचा इतिहास आपल्या परिचयाचा आहे. परंतु आज या लेखात टिळकांच्या संबंधित काही महत्त्वाच्या आणि आजच्या परिस्थितीशी संबंधित अशा गोष्टींचा आढावा घेऊ.
१८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची साथ आली होती. पुढे पुण्यात १९०२-३ साली प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलत भाऊ, भाचा, लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. आपल्या जिवलगांच्या मृत्यूमुळे खचून न जाता त्यांनी या प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली.
उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्ल्स रँड याने लष्कराची मदत घेतली. त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करु लागले. साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले . यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.
टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?” हा टिळकांचा अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :”रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात-माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे”. त्याकाळात साथीच्या रोगासाठी फवारणी मागचा इंग्रजांचा मनसुबा वेगळा होता. त्यामुळे टिळकांनी त्या गोष्टीला विरोध दर्शवीला होता.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन १८९३ मध्ये त्यांनी पारंपरिक गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. घराघरांत साजरा होणाऱ्या गणपती उत्सवाला टिळकांनी दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने जनता एकवटेल, लोक एकत्र येतील, त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होईल, एकत्र आल्याने सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपाने त्यांच्यात जनजागृती निर्माण करता येईल अशी भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती . सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे , ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती.
अलीकडच्या काळात “लोकमान्यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाला हे कसले स्वरूप प्रप्त झाले आहे?” असे निराशेचे उद्गार अनेक वेळा ऐकावे लागतात. आजच्या परिस्थितीत लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेशोत्सोवात किती जणांना टिळकांची आठवण येत असेल ? जनजागृतीसाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाज प्रबोधन व्हावे हा लोकमान्यांचा उद्देश होता. पुर्वी त्या अनुषंगाने १० दिवस काही सांस्कृतिक , प्रबोधनपर कार्यक्रम होत असत. कलाकारांच्याच नव्हे तर सर्व सामान्यातील मुलांच्या, युवकांच्या कलागुणांना वाव देतील, सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर घालतील असे उपक्रम राबविले जात. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असत. आजही ही प्रथा निरंतरपणे चालू ठेवणारी अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत; परंतु त्यामधे वाढ झाली पाहिजे. वक्तृत्व स्पर्धा, लेखक, साहित्यिक, कवी, नाटककार यांच्या भाषणांचे किवा कलागुणांचे मार्गदर्शन पर कार्यक्रम या काळात सादर केले पाहिजेत. त्यांच्या अनुभवपर मार्गदर्शनातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळू शकते. गणेशोत्सवातील देखाव्यांवर कमीत कमी खर्च करावा. देखावे हे सामाजिक जाणीव जागृती या विषयांवर असावेत. गणेशोत्सवातील वर्गणी हा एक मोठा मुद्दा आहे. वर्गणी ही ऐच्छिक असावी. ती जबरदस्तीने लोकांकडून वसूल करू नये. लोकांनी स्व-इच्छेने दिलेल्या वर्गणीचा स्वीकार केला पाहिजे. मंडळाला मिळालेल्या वर्गणीतून एक हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा. मिळालेल्या व खर्च केलेल्या सर्व पैशाचा हिशोब जाहीर करायला हवा. गावातील सामाजिक कार्यामध्ये सर्व गणेश मंडळाचा सहभाग असायला हवा.
कोरोनाच्या भीषण संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. मुंबई, पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली आहे,ही खूप दिलासादायक बाब आहे. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही. मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल.
महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे सावधपणे टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. अशा पद्धतीने सावधगिरीने व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला तरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
Inputs- प्रविण डोंगरदिवे,नवी मुंबई.