परिस्थिती मनुष्याला कठोर बनवते. जणू डोळ्यातील अश्रूही गोठून टाकते. जेव्हा आभाळच फाटते तेव्हा त्याला ठिगळ तरी कोठे व किती लावायचे ,नाही का ? तेव्हा मनुष्यामध्ये जी अदृश्य अफाट शक्ती असते, याची जणू नव्याने जाणीव होते. ही शक्ती बळ देते, लढण्याचे सामर्थ्य ठरते.
अशीच ही लढाई होती त्या आईची, त्या स्त्री शक्तीची जी त्या बलाढ्य रौद्र रूप धारण करून समोर उभे राहिलेल्या परिस्थितीशी झुंज देऊ लागली. ती एकटी होती. पण खंबीर होती. कारण तिच्यात आत्मविश्वास होता की, आपण यशस्वी होणारच.
तर जाणून घेऊ आज अशाच रणरागिणीची लढाई, जी निश्चितच प्रेरणा देईल त्या प्रत्येक स्त्रीला, व्यक्तीला जिच्या जीवनात कोणी सोबत असो वा नसो तिच्यात आत्मविश्वास निर्माण करेल की, समोर कितीही मोठा शत्रू असला तरीही अंतिम विजय हा माझाच होईल !
ही यश कथा आहे, विदर्भातील खामगाव हे माहेर लाभलेल्या धाडसी, धडाडीच्या, हरहुन्नरी, प्रतिभावंत, संभाजीनगर येथील माजी नगसेविका आणि भाजप पक्षाच्या विद्यमान शहर उपाध्यक्षा जयश्रीताई किवळेकर यांची…..
नावातच ज्यांच्या जय आहे, अशा जयश्रीताई यांचा जन्म २५, डिसेंबर १९५५ रोजी झाला.
श्री शामराव हरपाळे व मथुराबाई यांच्या त्या कन्या होत.
जयश्रीताई यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण खामगाव येथेच झाले. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना नेतृत्व करण्याची आवड होती. विद्यार्थी जीवनात जयश्रीताईंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत हिरीरीने काम केले.
जयश्रीताईंना सामाजिक कार्याचे बाळकडू लाभले होते. आईवडील नेहमीच गरजू व्यक्तींना मदत करीत. गरजुंचे लग्न जमवणे, त्यांना आर्थिक साह्य देणे, शिक्षणासाठी गरीब मुलांना सहकार्य करणे अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. माहेरी एकत्र कुटुंब होते. घरातील वातावरण धार्मिक, सामाजिक असल्याने सर्वांशी जोडून राहण्याची कला त्यांच्यात बालवयातच रुजली.
पुढे १२ फेब्रुवारी, १९७७ रोजी जयश्रीताई सौ जयश्री सारंग किवळेकर होऊन औरंगाबाद येथे आल्या. त्यावेळी त्या अवघ्या २१ वर्षाच्या होत्या .तर त्यांचे पती २२ वर्षाचे होते. ते डिव्हिजनल ट्रॅफिक सुप्रीटेंड होते. तर सासरे असिस्टंट कमिशनर होते. सासरी अतिशय सुशिक्षित पण कडक वातावरण होते. उच्च राहणीमान असल्याने सुरवातीला जयश्रीताईंना जुळवून घ्यायला थोडे जड गेले. हळूहळू या सर्व गोष्टींची सवय होत गेली.
एकदा जयश्रीताईंच्या सासूबाई आजारी होत्या. त्यांच्या हृदयाची झडप काम करत नव्हती. ऑपरेशन करणे रिस्की होते. त्यावेळी सासूबाईंची काळजी जयश्रीताईनी मनापासून घेतली. दरम्यान, लग्नाला जेमतेम दीड वर्षे झाले आणि अचानक सासऱ्यांची तब्येत बिघडली. कावीळ झाली आणि ते सर्वांना सोडून गेले.
सासऱ्यांचे अचानक जाणे हा या सर्व कुटुंबासाठी खूप मोठा आघात होता. चालती बोलती व्यक्ती, घरचा मोठा आधारस्तंभ कायमचा सोडून जाणे हे पचवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत हिम्मत करून सर्व एकमेकांना सावरत होते.
पुढे जयश्रीताईंच्या संसाराला पालवी फुटली. दोन गोंडस मुली झाल्या. नोकरी निमित्ताने पतीची बदली होत असे. पण मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून त्या पुन्हा औरंगाबाद येथे आल्या. मुली थोड्या मोठ्या झाल्यावर जयश्रीताईंनी ब्युटी पार्लरचा कोर्स केला. ८४ ते ९७ स्वतःचे पार्लर चालवले. त्या वेळी पार्लर मध्ये केवळ उच्चभ्रू महिला येत. पार्लरला जाणे म्हणजे सामान्यांचे काम नव्हे असा तो त्यावेळेचा समज होता !
जयश्रीताईंची पार्लरच्या निमित्ताने अतिशय श्रीमंत, उच्चशिक्षित महिला, उद्योजिका व राजकीय क्षेत्रातील महिलांची ओळख होत गेली.
लग्न झाल्यावर देखील मुलींच्या शाळेच्या माध्यमातून जयश्रीताई सामाजिक कार्य करत होत्याच. त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून देखील त्यांनी एक वेगळी ओळख समाजात निर्माण केली होती.
पार्लर मध्ये येणाऱ्या सर्व ग्राहक महिलांना जयश्रीताईंच्या सामाजिक कार्याची माहिती होती. तसेच त्यांच्या आनंदी, हसतमुख, मनमिळाऊ, स्वभावाची देखील जाणीव झाली होती. योगायोग असा की, जयश्रीताईंच्या कामाची पावती म्हणून त्यांची १९९५ साली भाजप पक्षाच्या शहर महिला सरचिटणीस म्हणून निवड झाली.
पुढे त्यांनी वाढता व्याप लक्षात घेऊन पार्लर पूर्णपणे बंद करून आपले सर्व लक्ष केवळ सामाजिक कार्यावर केंद्रित केले. आपल्या सामाजिक कार्याला न्याय देणे हेच त्यांचे प्रथम कर्तव्य असे जयश्रीताईंना वाटे आणि दिलेली जबाबदारी त्यांनी कायम चोख बजावली.
जयश्रीताईंना आपल्या वॉर्डात एकच गणपती
बसविण्यात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, नियोजनात पुढाकार घेऊन ते उत्तमरित्या यशस्वी केले. पाण्याची योग्य सोय, रस्त्यावरील दिवे, स्वच्छता, मुलांसाठी खेळण्याचा बगीचा, मैदान, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा अशी अनेक लहान मोठी कामे त्यांनी केली. अडीअडचणींमध्ये कोणी न बोलवता त्या धावून जात. त्यांना सर्वतोपरी मदत करत. महिलांना त्यांचा आधार वाटत होता. जणू आपलीच मैत्रीण आपल्यासोबत आहे इतक्या सहजतेने त्यांनी सर्व महिलांशी जुळवून घेतले होते. महिलांना देखील त्यांचा समस्या सांगताना कोणतेही दडपण जाणवत नव्हते हीच त्यांचा स्वभावाची किमया होती. जणू त्यांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत! त्यामुळेच त्यांच्या अश्रूंना मोकळी वाट मिळत असे.
असाच अनुभव मला देखील त्यांच्याशी बोलताना आला. न कोणता गर्व, न कोणता अहंकार. एक मोठी बहीण अथवा एक मैत्रीण समजून त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाचे सुख दुःखही सांगितले.
जयश्रीताईंनी नेहमीच अतिशय सक्रिय काम करत आपल्या पक्षाचे नाव मोठे केले. त्यांचे काम तसेच जनतेचे त्यांच्यावरील प्रेम व विश्वास पाहून त्यांना
२००० सालच्या महानगर पालिका निवडणुकीत भाजप पक्षातर्फे नगरसेविकेचे तिकीट देण्यात आले. त्या निवडूनच येतील अशी सर्वाना खात्री होती. त्यामुळे आता तुम्ही निवडणूकीच्या तयारीला लागा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे असे त्यांना सांगण्यात आले.
आणि त्याचवेळी काळाने घात केला ! जयश्रीताईंच्या पतीना थोडा त्रास होऊन त्यांचे पोट दुखू लागले. त्यामुळे त्यांना डॉक्टरांना दाखविले. त्यांच्या सल्ल्याने अधिक तपासण्या केल्या असता लक्षात आले की, त्यांना आतड्यांच्या कॅन्सर झाला असून तो आता दुसऱ्या स्टेजला आहे.
सुखाला अचानक दुःखाची किनार लागली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. जयश्रीताई पूर्णपणे खचून गेल्या. आता त्यांना कोणत्याही पदाची अजिबात इच्छा नव्हती. असणारच कशी ? प्रत्येक पत्नीला आपल्या पतीच्या सुखापेक्षा मोठे काहीही नसते. आपल्या कुटुंबालाच ती प्रथम प्राधान्य देत असते. त्यामुळे जयश्रीताईंची देखील मानसिक स्थिती खालावली होती. त्यांना काहीही सुचत नव्हते.
अशा परिस्थितीत पतीने जयश्रीताईंना मुलींची शपथ घातली की, माझ्या आजारपणामुळे तू नगर सेविका होण्याची ही संधी सोडू नको. ही तुझ्या प्रामाणिक कार्याची पावती आहे.
तू केलेल्या कष्टाचे गोड फळ आहे. मला तुला मोठे होताना पहायचे आहे. तू लढ, मी तुझ्या सोबत आहे. तुझी ही समाजसेवा अखंड चालू राहिली पाहिजे हीच माझी इच्छा आहे.
जयश्रीताईंचे पती स्वतः त्यांच्या प्रचारासाठी फिरायचे .त्यांची भक्कम साथ होती. पतीने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. १० एप्रिल २००० रोजी त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. हा अतिशय आनंदाचा क्षण, स्वतः पतीने पुढाकार घेऊन साजरा केला. ते जयश्रीताईंबरोबर मिरवणुकीत सहभागी झाले. नागरिकांकडून रस्त्यावर फुलांच्या रांगोळ्या काढल्या गेल्या. पतीने स्वतः हार घालून जयश्रीताईंचे कौतुक केले. दृष्ट लागावी असे ते क्षण होते !
पण नियतीला त्यांचे हे सुख पहावले गेले नाही.
पतीचा कॅन्सर बरे होणे शक्य नव्हते म्हणून रिपोर्ट आले. जयश्रीताईंनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. शेवटी काळाने घात केला.
३० एप्रिल २००० हा दिवस जणू त्यांच्या साठी काळा दिवस होता. त्यांचा सर्वात मोठा आधार, त्यांच्या सुख दुःखाचा हक्काचा जोडीदार त्यांना सोडून गेला. आजही या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवतात.
कोमात जाण्याच्या आधी पतीचे शेवटचे शब्द होते की, तू मतदान कर. ते तुझे प्रथम कर्तव्य आहे. त्या वेळी त्यांनी केवळ पत्नीधर्म निभावत पतीचे ते शेवटचे शब्द खोटे ठरू दिले नाही व काळजावर दगड ठेवून मतदान केले.
आता जयश्रीताई एकट्या पडल्या. सासूबाई देखील ९२ साली गेल्या होत्या. घराचे जणू छत्र हरपले. एकटी बाई व पदरी दोन मुली. एकच गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे त्यांच्या हक्काची जागा.
जयश्री ताईंनी हिम्मत न हारता त्या जागेवर घर बांधले. अनेक लोकांनी सल्ले दिले की जागा विकून टाक, तुला ते शक्य नाही वगैरे वगैरे. साथ देणारे थोडे असतात मात्र सल्ले देणारे अनेक याची प्रचिती त्यांना त्यावेळी आली.
त्या कठीण परिस्थितीत जयश्रीताईना जगण्याचे बळ मिळाले त्यांच्या पक्षाकडून. मा.नितीन गडकरी साहेब, मा. गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांच्या घरी आले आणि
त्यांना म्हणाले, तुम्हाला या दुःखातून तुमच्या मुलींसाठी व सामाजिक सेवेसाठी बाहेर यावे लागेल. तुमचे कर्तव्यच तुम्हाला जगण्याचे बळ देईल. वेळ व काळ हेच सगळ्या अडचणींवर रामबाण औषध असते. आपल्याला मिळालेले पद, आपली जबाबदारी, आपले कर्तव्य हे प्रथम असते असे त्यांना समजावून सांगितले. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असा धीर दिला. महापौरांनी त्यांना महानगर पालिकेत आणण्यासाठी गाडी पाठवली व पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली आपल्या कुटुंबासाठी! त्या मुलींकडे कोण पाहणार ? आज आपल्या मुलीच आपले जग आहे याची जाणीव त्या मुलींकडे पाहून होत त्यांना होती. त्यांच्या डोळ्यात आईवरील विश्वास स्पष्ट दिसत होता.
जयश्रीताईंची ताकत ठरल्या त्या त्यांच्या दोन मुली होत्या. आईचे कर्तव्य चोख निभावण्यासाठी त्या सर्वस्व पणाला लावून परिस्थितीशी लढल्या आणि त्यांनी जिंकुनही दाखविले. त्या मुलींसमोर कधीही रडल्या नाही. कधीही अश्रू काढले नाही. मुलींना योग्य शिक्षण दिले.कणखर बनविले.
स्वतःच्या पायावर उभे केले. इंजिनिअर केले. वडिलांची झळ त्यांना कधी लागू दिली नाही. उत्तम संस्कारांना शिक्षणाची जोड होती त्यामुळे मुलीही टॉपर ठरल्या. त्यांनी आईच्या कष्ठाचे चीज केले.
जयश्रीताई एकट्याच सगळं दुःख गिळून आपले कुटुंब सावरत होत्या. तसेच एक नगरसेविका म्हणून आपले कर्तव्य चोख निभावत होत्या. या सामाजिक कामाने त्यांना दुःखात बळ दिले होते पुन्हा उभे राहण्याचे. या कामाच्या व्यापामुळे त्यांना कधी एकटेपणा जाणवला नाही. आपले कुटुंब व समाजाची सेवा हेच त्यांचे अंतिम ध्येय ठरले. ही दुहेरी हसरत पार पाडत होत्या न दमता न थकता.
ज्यावेळी त्या पूर्णपणे खचल्या होत्या त्या वेळी त्यांची गुरुमाऊली परमपुज्य कलावतीआई, बेळगाव यांनी
जयश्रीताईंचे मनोबल ढळू दिले नाही. ही अदृश्य हिम्मत, ही शक्ती मिळाली त्यांना त्या गुरुमाऊलीकडून मिळाली, जी आजही जयश्रीताईंच्या सर्व सुख दुःखात सोबत करते आहे.
जयश्रीताईंनी त्यांच्या नगरसेविका या पदाचा उपयोग केवळ आणि केवळ समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी केला. सामाजिक काम म्हणजे लोकांची सेवा करणे असे त्यांचे सर्वस्वी मत आहे. ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला मत देऊन निवडून दिले त्या पदाचा त्यांनी कधीही गैरवापर केला नाही अथवा कोणता गर्व देखील बाळगला. त्या रात्री अपरात्री देखील लोकांना मदत करत असत.
आपल्या वॉर्ड मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व स्वच्छ अभियानात त्यांच्या वार्डाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते जयश्रीताईंचा भव्य सत्कार करण्यात आला. ही त्यांच्या प्रामाणिक कामाची पावतीच होती.
जयश्री ताईंचे काम पाहून पक्षाने त्यांना पुन्हा २००५ साली तिकीट दिले. स्वतः मुंडे साहेबांनी विचारले या आधी येथे कोण काम करत होते. जयश्रीताईंचे नाव समजताच स्वतः गोपीनाथजी मुंडे साहेबांनी घरी गाडी पाठवून जयश्रीताईना पक्ष कार्यालयात बोलवून घेतले व नगरसेविका पदासाठी पुन्हा फॉर्म भरायला लावला. हे थोडे अनपेक्षित होते .मात्र म्हणतात ना कर भला तो हो भला ! सिडको N3 / N4 येथून नगरसेविका म्हणून त्या पुन्हा बहुमताने निवडून आल्या.
पहिल्यांदा जनता भावनेच्या भरात निवडून देते. पण दुसऱ्यांदा निवडून देताना मात्र केवळ तुमचे काम पाहिले जाते. दुसऱ्या वेळी जयश्रीताई या ओपन वॉर्ड मधून निवडून आल्या ही खूप मोठी गोष्ठ होती.
त्या पहिल्या महिला नगरसेविका होत्या ज्या ओपन मधून निवडल्या आल्या ! हिऱ्याची पारख केवळ जोहरी करू शकतो त्याच प्रमाणे योग्य, खऱ्या नगरसेविकेची पारख जनतेने केली होती.
जयश्रीताई अध्यात्मिक शक्तीने वेळोवेळी सावरले. त्यांचे प्रांजळ मत आहे की, समाजसेवा हे व्रत आहे. जे स्वतः भगवंताने आपल्याला दिले. त्यामुळे मी कायम त्याचा आदर केला, सन्मान केला.
जयश्री ताईंच्या वार्डातील बागेचे अतिशय दयनीय अवस्था झाली होती ती सुधारली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बांधले, ज्यात बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केट बॉल तसेच सुसज्ज ट्रेकिंग ट्रॅक बांधण्यात आला. दोन समाज मंदिरे तसेच सांस्कृतिक हॉल बांधल्या गेले. या वास्तू मुळे मुलांना खेळायला हक्काचे ठिकाण मिळाले. ज्येष्ठाना, महिलांना स्वच्छ आकाश मिळाले. मोकळी जागा मिळाली. मुलांना बागडायला, त्यांचे छंद जोपायसाला आनंदी वातावरण मिळाले.
जयश्रीताई नगरसेविका असतानाच्या काळात त्यांनी अनेक सक्रिय कामे केली. या कामातूनच त्यांची आज वेगळी ओळख आहे. एक महिला देखील राजकीय क्षेत्रात उत्कृष्ठ काम करू शकते याचे उदाहरण म्हणजे
जयश्रीताई किवळेकर होत, असे अनेकांचे मत आहे.
याच काळात माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या हस्ते खूप मोठे काम झाले ते म्हणजे वसंतराव नाईक यांचा पुतळा आणि पुतळ्याच्या सोबत झालेलं सुशोभिकरण. आज तो वसंतराव नाईक चौक म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे एक मोठा ब्रिज देखील झाला आहे. त्यामुळे आज या परिसराला खूप मोठी किंमत आहे.
तसेच देशभक्त व मातृसेवक स्वर्गीय राजगुरू सभागृह याचे उद्घाटन मा. प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जयश्रीताईंच्या विभागात अनेक मोठ्या राजकीय मंडळींनी कामानिमित्त भेट दिली, जसे की
मा. प्रमोदजी महाजन, मा. हरिभाऊ बागडे, मा. विजयाताई रहाटकर मा. जावडेकर साहेब, मा.नितीनजी गडकरी, मा. अतुलजी सावे, तसेच मा.श्रीकांतजी जोशी. या सर्वांनी जयश्रीताईंच्या कामाचे मुक्त कंठाने कौतुक केले.
जयश्रीताई आजही स्वतःहून लोकांच्या घरी अडीअडचणीना जात असतात. त्यांना मदत करत असतात. आजही मुलांना त्यांच्या यशस्वी वाटचालीत प्रेरणा मिळावी म्हणून त्या त्यांचा सत्कार करतात. त्यांच्या यशात कौतुकाची, प्रेमळ थाप देतात. त्यामुळेच लहान, थोर तसेच महिला अशा सर्वांच्या मनात त्यांच्या विषयी आदराचे, सन्मानाचे स्थान आहे. त्यामुळेच आपली हक्काची व्यक्ती आपल्या सोबत असल्याची अनेकांना जाणीव होते.
जयश्रीताईंनी आपल्या प्रामाणिक कामामुळे अनेकांची मने जिंकली. ज्येष्ठांचे आशिर्वाद मिळवले. लहान मुलांमुलींच्या त्या आदर्श आहेत. आज समाजात जयश्रीताईंनी त्यांच्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली आणि दाखवून दिले की महिला देखील उत्तम कार्य करू शकतात मग ते क्षेत्र राजकीय का असेना ! जयश्रीताईंनी नेहमी माणुसकी जपली. त्यांच्या जीवनास अध्यात्माची जोड मिळाल्याने त्या वेळोवेळी सावरू शकल्या असे त्या आवर्जून सांगतात.
जयश्रीताईंच्या विभागात अनेक संस्कारवर्ग चालवले जातात. जिथे आज १००० हुन अधिक मुलंमुली मोफत शिक्षण घेत आहेत.संस्कारवर्ग ही आजच्या काळाची नितांत गरज आहे कारण आज मुलं भरकटत चालले आहेत. त्यामुळेच त्यांना योग्य वेळी सावरायला पाहिजे, योग्य दिशा दाखवली पाहिजे. ही मुलं अतिशय निरागस आहेत. या बालवयात जर त्यांच्यावर योग्य संस्कार झाले तर ते नक्कीच आदर्श नागरिक बनतील व आपल्या देशाचे नाव मोठे करतील. यासाठी थोर संतांची शिकवण बालमनावर योग्य बीज पेरेल, असा त्यांना विश्वास आहे.
जयश्रीताईना स्वामी केंद्रात सेवा करायला, अध्यात्मिक वाचन करायला तसेच ऐतिहासिक गोष्टी वाचायला आवडतात. त्यांच्या दोन्ही मुली, सौ अश्विनी योगेश सातपुते व सौ अमृता अभिषेक जैन या सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.
जयश्रीताई सध्या संभाजीनगर भाजप शहराच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच देवगिरी नागरी संघाच्या बँकेत डायरेक्टर आहेत.
अशा या राष्ट्रनिष्ठ, सत्यनिष्ठ, सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या मोलाच्या कार्यासाठी मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.