Saturday, November 1, 2025
Homeयशकथालोह पुरुष : सरदार वल्लभभाई पटेल

लोह पुरुष : सरदार वल्लभभाई पटेल

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री; लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन.
— संपादन

देशाच्या राजकीय अन् सामाजिक जीवनात “पोलादी पुरुष” म्हणून ओळख असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात राज्याच्या खेडा जिल्ह्यातील करमसद येथे झाला अन् ब्रिटिश राजवटीला तगडं आव्हान देणारा जणू लोह पुरुषच देशात उदयास आला.

वल्लभभाई यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर, आईचे लाडबाबेन होते. वयाच्या १८ व्या वर्षी वल्लभभाईंचा विवाह झवेरबा यांच्याशी झाला. त्यांना डाह्याभाई अन् मनिबेन ही दोन अपत्ये होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याग्रह या तत्वांवर देशात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जो लढा उभारला गेला, त्यात वल्लभभाई अग्रस्थानी होते. या लढ्यादरम्यान त्यांना गांधीजीसह अनेक वेळा कारावास भोगावा लागला. त्यापूर्वी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. परंतु भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी वकिली सोडून थेट स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात मोठा दबदबा होता. राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.

वल्लभभाई पटेल यांनी पारतंत्र्याच्या काळात शेतकऱ्यांवर जुलमी कर लादणाऱ्या ब्रिटिश सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले. “मिठाचा सत्याग्रह” केल्याबद्दल इंग्रज पोलिसांकडून अटक झालेले ते प्रमुख नेते होते. महात्मा गांधी यांच्या “छोडो भारत” आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर,विदेशी मालाची होळी करून त्यांनी खादीचे कपडे व स्वदेशी साहित्य वापरण्याचे देश वासियांना जाहीर आवाहन केल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ते महान देशभक्त ,लढवैये स्वातंत्र्यसेनानी आणि कणखर व्यक्तिमत्वाचे होते. त्यामुळेच त्यांना जनमानसाकडून “पोलादी पुरुष” ही उपाधी मिळाली.

विविध राज्यातील राष्ट्रप्रेमी नेते, देशभक्त सत्याग्रही अन् क्रांतिकारकांच्या समर्पित बलिदानातून अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले अन् इंग्रजांची राजवट संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल यांची गृहमंत्री म्हणून निवड झाली. तसेच त्यांना “उप पंतप्रधान” होण्याचा देखील मान मिळाला. त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कारकीर्दीत भारतातील ५६५ संस्थानांचे देशामध्ये विलिनीकरण करण्यात आले. या कामी त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांची प्रतिमा जनमानसात अधिकच उजळली. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भरीव योगदानाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांच्या नावाने विविध शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्या. तसेच सरदार सरोवर धरण,सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे जगातील सर्वात उंच ठरलेला सरदार वल्लभभाई यांचा “Statue of Unity of India” हा भव्यदिव्य पुतळा गुजरात राज्यात उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. महत्वाचे म्हणजे ३१ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणूनही साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. याशिवाय त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्रदीपक कामगिरीसाठी त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताबही बहाल करण्यात आला.

मुंबई येथे १५ डिसेंबर १९५० रोजी हा इहलोक सोडून गेलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांना आपला देश अधिक शक्तिशाली होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे हीच खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

रणवीर राजपूत

— लेखन : रणवीर राजपूत. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on गझल
Priyanka Shinde Jagtap on पुस्तक परिचय
मोहन आरोटे on निवृत्तीचे तोटे !
Meera Rajesh Khutale on बदललेली ती….
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप