Thursday, July 3, 2025
Homeलेखवंचित तृतीयपंथी

वंचित तृतीयपंथी

हिजडा/ हिजडे शारीरिक पुरुष असून त्याची लैंगिक ओळख, वेशभूषा आणि लैंगिक भूमिका ही स्त्रीप्रमाणे असते, त्यांना तृतीयपंथी किंवा छक्का असेही म्हटले जाते.

तृतीयपंथीय म्हणजे काय ? हे नेमके कोण आहेत ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचे शरीर पुरुषाचे, मात्र मानसिकता, हावभाव, वर्तणूक, बोलणे -चालणे पूर्णपणे स्त्रीचे आहे अशा व्यक्तीला “तृतीयपंथ” म्हणतात. हिजडा, फातडा, मंगलमुखी, छक्का, बंदे, खोजे, फालक्या, देवडा अशा अनेक नावांनी यांना ओळखले जाते. आपल्याला फक्त यातील काही नावे माहिती आहे तर काही नावे ही प्रथम ऐकत आहोत.

सर्वसाधारणपणे जन्मतःच ज्यांच्या शरीरात/ लिंगात विकृती निर्माण झालेली असते किंवा ज्यांच्या शरीरात संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन निर्माण झालेले असते किंवा ज्यांची वाढच पूर्णपणे मुली आणि स्त्रियांच्या प्रभावाखाली झाली असल्याने वर्तणूक स्त्रियांसारखी होते अशा सर्व व्यक्तींचा समावेश तृतीयपंथीयांमध्ये होतो.

हिंदू पुराणानुसार किन्नर हे हिमालय पर्वतरांगात वास्तव्य करत आणि ते देवतांचे गायक आणि भक्त मानले जात. किन्नरांच्या या वर्तनाशी तृतीयपंथ लोकांचा मेळ खात असल्याने त्यांना “किन्नर” असेही संबोधले जाते.

एखादा किन्नर जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या मूत्यूनंतर त्याचे भोग संपतात असे मानले जाते. एखाद्या किन्नराचा मूत्यू जेव्हा होतो तेव्हा त्याचा चेहरा पांढरा कपडयाने झाकला जातो. कुणालाही त्याच्या चेहरा दाखवला जात नाही. त्याच्या अंत्ययात्रेस किन्नर वगळता कुणालाही सामील करून घेतले जात नाही. त्याची अंत्ययात्रा ही संध्याकाळी काढली जाते. या संदर्भात कोणालाही सांगितले जात नाही. या अंत्ययात्रेत शोक अजिबात केला जात नाही. वाजत -गाजत, नाचगाणी आणि रंग उधळून अंत्ययात्रा काढली जाते.

किन्नर कोणत्याही जातीधर्मात जन्माला आला असला तरी त्याचे दफन केले जाते. दफन करण्याआधी त्याला सर्व किन्नर चप्पलेने मारतात, यामागील कारण असे की “तुझा जन्म या लायकीचा होता आणि मूत्यूही ही काही वेगळा नाही. तू आयुष्यभर अवहेलना झेलल्यास, आता अखेरच्या अपमानाची ही वेळ आहे. तेवढं तर तुला सोसावे लागणार, पुन्हा या जन्माला येऊ नको”.

दफनविधी केल्यानंतर सर्व किन्नर त्या ठिकाणी चहापान करुन घरी येतात. त्यानंतर त्यामधील जीवस्च कंठस्थ, जिवाभावाचा तो असा काही विलाप करतो की पाहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सर्व किन्नर त्यानंतर सात दिवस कडकडीत उपवास करतात, ही जणू त्या किन्नरसाठी श्रद्धांजली असते. विशेष म्हणजे मरण पावलेल्या किन्नरची संपत्ती दान केली जाते.

जेव्हा लहानपणी पुरुष असूनसुद्धा ती व्यक्ती स्त्रीसारखी वागू लागते, तेव्हा तिची चेष्टा, मस्करी कोणी करु नये म्हणून तिला यल्लमा, शांतादुर्गा आदी देवदेवतांना सोडले जाते. त्यांना जोगते, वाघ्या, लुगडवाल्या जोग्या, देवमामा व देवमावशी या नावाने संबोधले जाते.

रुढी -परंपरांनुसार जे जे धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये त्यांचे महत्त्व असून तेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असते. उदा.एखाद्याच्या लग्नात जागरण व गोंधळ, परडया भरणे, कराचे लिंब नेसणे, कौल लावणे, देव आणणे आणि घालणे, दसरा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने जोगवा मागणे, शिवकळा (अंगात येणे) येऊन भक्तांच्या विविध प्रश्नांना उत्तर देणे, धार्मिक विधी, देवदासीची पूजाअर्चा, तेलाची आणि काकणाची फेरी यातून रोख पैसे, कपडे, सुका आणि ओला शिधा मिळतो पण कायमस्वरूपी त्यांना उत्पन्न मिळत नाही.

मुंबई , पुणे आणि इतर मोठ्या शहरात तृतीयपंथीय शरीर विक्रीचा व्यवसाय करतात. तर लोकल ट्रेन, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, रस्त्यावरील सिग्नल्स येथे लोकांना अडवून अश्लील हावभाव करून भीक मागतात.

काही धार्मिक कार्यक्रमांत म्हणजेच बालकांच्या जन्मानंतर त्याला हातात घेऊन गाऊन, नाचून पैसा आशीर्वाद देऊन तर विवाहप्रसंगी नव वधूवरांना आशीर्वाद देऊन पैशाची मागणी केली जाते.

समाजात तृतीयपंथाविषयी तिरस्कार, चेष्टेची व भीतीची भावना प्रचलित असल्याने व निरक्षरतेमुळे त्यांच्या रोजगार आणि नोकरीची शाश्वती नसते. समाजात यांना अतिशय दुय्यम वागणूक दिली जाते. काही वेळा जर त्यांनी छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला तर समाजातील इतर लोक त्यांना फार त्रास देतात.

शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, व्यवसायिक कौशल्य यांचा अभाव व त्यांच्या कडे बघण्याचा समाजाचा दूषित दृष्टिकोन व भेदभाव यामुळे या लोकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. यांना लहान मुलांबद्दल प्रेम आणि आपुलकी असते, त्यांच्या मनात मातृत्वाची भावना असते तरीही त्यांना कोणीही मूल दत्तक किंवा प्रतिपालकत्वासाठी देत नाही आणि कायदयामध्ये तसा उल्लेख नाही.

तृतीयपंथाना लग्न करावेसे वाटते पण नेमके कोणाशी लग्न करावे याबाबत संभ्रम आहे, कारण कायदयानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये विवाह होतो. समलैंगिकता हा, भा. द. वि ३७७ नुसार गुन्हा होतो. परंतु या कायद्यात सुधारणा आलेली आहे, आता त्यांना ही विवाह करता येतो. सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीचे कलम ३७७ रद्द केल्यानंतर मुंबईत पहिला समलैंगिक विवाह एका पंचतारंकित हाँटेलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाह सोहळयात एलजीबीटी समूहातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

आता तृतीयपंथीय लोक पण विविध क्षेत्रांत नावारुपास येत आहेत. एकेकाळी जोयिता माँडय या तृतीयपंथी महिला, ज्या न्यायालयासमोर भीक मागत, त्याच न्यायालयात त्या न्यायाधीश झाल्या.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे ज्ञानदेव कांबळे या तृतीयपंथी उमेदवाराला गावाने भरभरून मते देऊन सरपंचपदी विजयी केले.

२०११च्या शिरगणतीनुसार देशभरात किन्नर आणि तृतीयपंथी यांची संख्या ५ लाखाच्या घरात आहे. या उपेक्षित समूहाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आणि त्यासाठी केंद्राने सादर केलेले तृतीयपंथी व्यक्ती हक्क विधेयक २०१९ मध्ये लोकसभेत १९ जुलै २०१९ ला चर्चेसाठी सभागृहात मांडले.ते बहुमताने मंजूर झाले.

नव्या विधेयकात तृतीयपंथी यांनी भीक मागणे हा गुन्हा ठरवण्याची तरतूद करण्यात आली. नव्या विधेयकानुसार किन्नर, हिजडा अथवा जोगता या श्रेणीत येणाऱ्या तूतीयपंथी यांना, आता त्यांच्या इच्छेनुसार समाजात स्त्री, पुरुष किंवा किन्नर म्हणून वावरण्याचा अधिकार कायदयाने मिळणार आहे. त्यासाठी तूतीयपंथीय व्यक्तीला जिल्हा दंडाधिकारी अथवा जिल्हा पडताळणी समितीकडून ती  “ट्रान्सपर्सन” असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागेल. या अशा व्यक्तीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा आणि दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.

आज अनेक संस्था, व्यक्ती आणि चळवळीच्या माध्यमातून व सर्वोच्च न्यायालयानेही समाधानकारक व पुरोगामी भूमिका घेतलेली आहे.आता कोणत्याही शासकीय अर्जात लवकरच मेल / फिमेल /ट्रान्सजेंडर असे रकाने येत्या काळात दिसून येतील. त्यांना लवकरच आरक्षण मिळू शकेल. त्यांना समाजाने स्वीकारायला किती काळ जावा लागेल हे मानसिकतेमधील लवचिकतेवर, औदार्यावर अवलंबून आहे. परंतु बदलत्या काळात हे शक्य होईल.

ही मुले सुद्धा पुढील काळात सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शाळेत शिकतील. इतर पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेने अशा मुलांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. अनेकवेळा यांच्यावर प्राणघातक हल्ला होतो तरीही पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला जात नाही आणि केला तरी तपासकार्य पुढे सरकत नाही यासाठी राज्यातील सर्व पोलिस ट्रेनिंग सेंटरमध्ये तृतीयपंथी समुदायाचे प्रश्न आणि हक्काविषयी प्रशिक्षण समाविष्ट केले जावे.

गुन्हे न्याय यंत्रणेत तृतीयपंथी यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व स्तरावर जाणीवजागृती प्रशिक्षण शिबिरे सातत्याने होणे आवश्यक आहे. तसेच तृतीयपंथीयावरील हिंसाचाराचे मुद्दे राज्य महिला आयोग, मानवी हक्क आयोग एकत्रितपणे कसे सोडवू शकेल यावर काम करणे आवश्यक आहे.

शाळा, महाविद्यालयातील अभ्यासक्रमात तृतीयपंथी म्हणजे काय ? किंवा एलजीबीटी समुदायातील व्यक्तीचे हक्क असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे. छत्तीसगड राज्य सरकारने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात “तिसरा लिंग” म्हणून नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात एक धडा म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम संपूर्ण देशात लागू करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केलेल्या अभ्यासानुसार ९०% तृतीयपंथीयांना त्यांच्या घरातील लोक स्वीकारत नाही म्हणून त्यांना घराच्या बाहेर पडावे लागते.

जागतिक स्तरावर सुद्धा या लोकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. १२ आँगस्ट हा युवादिन साजरा केला जातो. परंतु एलजीबीटीक्यू समुदायातील युवा म्हणून पाहिले तर ९०% तृतीयपंथी यांना किशोरवयात घर सोडून जावे लागते, कारण त्यांच्यात होणारे बदल कुटुंबात कधीच स्वीकारले जात नाही हे त्यांच्यासाठी दुदैवी आहे.

सध्या कोरोना आणि लाँकडाऊनमुळे या लोकांची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. यांना आजही समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. राज्यात सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या साठी मंडळ स्थापन होणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. या सगळ्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एलजीबीटीक्यू सेल स्थापन करण्याची माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नुकतीच दिली आहे. राजकीय पक्षात एलजीबीटीक्यू सेल स्थापन करणारा राष्ट्रवादी हा देशातील पहिला पक्ष असावा. एलजीबीटीक्यू समुदायाचा राजकीय पक्षात सहभाग ही कोविड नंतरच्या न्यू नाँर्मल लाईफची खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात म्हणावी लागेल.

बदलत्या काळानुसार तृतीयपंथीयांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी सरकारने वेगवेगळे कायदे करणे आवश्यक आहे आणि त्याची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. स्वतः च्या हक्कासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागते हे खरोखर दुर्दैवी आहे. तृतीयपंथी हा समाजातील एक दुर्लक्षित घटक जरी असला तरी त्यांना समाज प्रवाहात आणणे आवश्यक आहे त्यासाठी आपली मानसिकता बदलणे हेही तेवढेच गरजेचे आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने तूतीयपंथी यांना न्याय मिळेल.

– लेखन : प्रा.अमिता कदम
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments