Wednesday, February 5, 2025
Homeलेख"वंदनीय व्यक्तिमत्त्व कै. वि सी सरवटे" - १

“वंदनीय व्यक्तिमत्त्व कै. वि सी सरवटे” – १

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काही व्यक्तिंची चरित्रं वाचून मी भारावून गेले. त्यांनी जणू देश सेवेचे कंकण हाती घातले आणि स्वतः ला त्या धगधगत्या अग्निकुंडात झोकून दिले. देशसेवेचे हे व्रत असेच अखंडित, अबाधितपणे तहहयात सुरू ठेवले. त्यातील एक वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे कै. विनायक सीताराम सरवटे हे होत.

कै. विनायक सीताराम सरवटे यांचे पूर्वज मूळचे कोकणातील संगमेश्वर तालुक्यांत मुरबाड गांवचे. हे गांव चिपळूण हून बसने रत्नागिरी ला जातांना अर्ध्या रस्त्यावर लागते. पण श्री विनायरावांचे बालपण, शैशव आणि अधिकांश जीवन मध्य प्रदेशात इंदूर येथे गेले. त्यांचा जन्म दि 2 एप्रिल 1884 रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला.
लॉर्ड कर्झन यांनी त्या वेळच्या ज्या शिवाजी महाराजांसाठी streak of madness अशी संभावना केली आहे त्या राजांनी, त्या काळात विनायक रावांच्या आजोबांना नियम नसतानाही शुद्ध चारित्र्याचे म्हणून 50 रु. पेन्शन केले होते आणि रयतेच्या काळजी पोटी धान्याचा तुटवडा पडला तेव्हा सरकारी कोठारातील गहू वाटला. अशा शीलसंपन्न घरातील वारसा घेऊन विनायरावांवर संस्कार होत होते.

“मी वासुदेव नामे नित्य फोडीतो टाहो
देखिले पाय आता मागतो दान द्या हो
सांवळे रूप माझ्या मानसी नित्य राहो
पावन संत वृंदे सादरे दृष्टि पहा हो”
हे एकनाथ महाराजांचे पद त्यांना बालपणीच पहाटे येणाऱ्या .. वासुदेवामुळे तोंड पाठ झाले होते असे ते सांगत. त्यांचे आजोबा एज्युकेशन इन्स्पेक्टर असताना त्यांनी वर्णबोध, मुलींच्या खेळांची माहिती देणारी पुस्तके आणि बोधसुधा नावाचे पुस्तक छापले होते. मुले ती पुस्तके मुखोद्गत करीत असत. त्यांनी रचलेले पद होळकर राज्याचे व राजवंशाचे राज्यगीत झाले होते. विष्णू सोमनाथ सरवटे .. या त्यांच्या नावाची आद्य अक्षरे ..वि .सो.स ..यांची प्रतिकात्मक .. विख्यात सोत्कर्ष: सन्मार्गे: ..अशी त्यांची मुद्रा होती. त्यांचे वडील पुण्यास डेक्कन कॉलेजात शिकवित असत. आजी, आजोबा विनायकला नाटक, प्रवचन, मैफली इतर ठिकाणी नेत असत. नंतर त्यांचे वडील इंदूर ला आले. सरकारी नोकरी धरली. चांगला पगार होता. होळकरांची मर्जी होती. असा बालपणीचा काळ विनायक यांचा सुखात गेला.

शैशव

पूर्वीच्या काळी एक दोन इयत्ता नेहमीच घरी शिकवून मुलांना शाळेत पाठवित असत (सध्या चित्र अगदीच वेगळे दिसते. असो.. ) त्या प्रमाणेच 7 वर्षांचे असताना त्यांना आजोबांनी तिसऱ्या इयत्तेत सरकारी मराठी शाळेत भरती केले. त्यांचे चौथीचे शिक्षक जरी मारकुटे होते तरी पाचवीचे शिक्षक, आजोबांनी विशेष पगारावर पुण्याहून बोलाविले होते.

असे आजोबा, सकाळचे स्नानसंध्या आटोपल्यावर श्लोक म्हणत…

सुसंगति सदा घडो। सुजन वाक्य कर्णी पडो।
कलंक मतिचा झडो । विषय सर्वथा नावडो ।।

असेच अनेक श्लोक म्हणत असत

सतत विनायक च्या मनावर सुसंगतिचा महिमा त्या मुळे बिंबत गेला. त्यांच्या आजीचे गांव कोंकणात. डुगवे.. नावाचे .. तेथील रम्य परिसर त्यांना भावत असे.

माळव्यात कधी दुष्काळ पडत नाही असे म्हणत. पण 1897 वर्षी मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी त्यांच्या घरातील संस्कार इतर चा चांगलाच प्रभाव पडला. त्यांच्या वडिलांनी अनेक पुस्तके लिहिलीत. इंदूर मध्ये त्यांनी विकत घेतलेली जागा महाराष्ट्र ब्राह्मण सभेस दान दिली. तेथे सभेने ..सरवटे सभागृह. असे नाव मध्यवर्ती हॉल ला दिले आहे. अश्या घरात विनायकरावांचे जीवन घडत होते.

युवावस्था – विवाह

त्यांच्या आजीच्या इच्छेप्रमाणे तिच्यासमोर तर लग्न झाले नाही पण तिच्या वर्षश्राद्धा पूर्वी त्यांचे लग्न करण्याचे आजोबांनी ठरवले. त्या काळात आश्चर्य वाटले असेल असे आजोबा म्हणालेत.
”मुलीने तीन दिवस आमच्याकडे राहावे. तिचा स्वभाव, वागणूक बघूनच उत्तर देऊ“ तांब्यांनी ते कबूल केले आणि 14 वर्षाच्या विनायकाचे लग्न 9 वर्षाच्या सरस्वती शी संपन्न झाले.

नववीत असलेले विनायक मन लावून अभ्यास करू लागले. संबंध ’रॅमसॅन ची हिस्टरी‘ हे पुस्तक त्यांना तोंडपाठ झाले. त्यांचा वर्गात प्रथम किंवा दुसरा क्रमांक येत असे. त्यावेळेस च्या एंटरेन्स परीक्षेत ते दुसरे आले. कॉलेज प्रमुख मिशनरी बिलकी यांनी त्यांना बायबल बक्षीस दिले होते .

होळकर कॉलेज इंदूर मधून ते बी ए झाले. तेथे 6 रु. महिना स्कॉलरशिप मिळवून ते हॉस्टेल मध्ये राहत असत. अभ्यासा बरोबरच शरीर कमविण्याचा त्यांचा संकल्प ही त्यांनी इतका तडीस नेला की All round body development मध्ये त्यांनी प्रथम बक्षिसाचे पदक मिळविले. संस्कृत ऑनर्स हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

एल एल बी त्यांनी एम ए ओ कॉलेज अलिगढ येथून केले.

1904 मध्ये त्यांना 50 रु. पगारावर सरकारी दफ्तरात नोकरी लागली आणि नवीन चरण सुरू झाले .तोवर ते एका मुलाचे वडील ही झाले होते.ती नोकरी त्यांनी 1920 पर्यंत केली नंतर 20 ते 42 वकिली व्यवसाय करीत होते.

शासकीय सेवा आणि इतर कार्य

सेवेत असतानाच त्यांनी मराठी भाषा सेवक एक संस्था स्थापन केली होती. 25 मंडळी बैठकीला येत. प्रो. आठवले, श्री बा.ना.देव येत. .मार्मिक टीकात्मक लेख, विविध ज्ञान विस्तार, इतिहास संशोधन त्यात असे. पुढे देवी श्री अहिल्याबाईची पत्रे मेजर साहेबांनी इंग्रजीत भाषांतर करायला सांगितली ती ही करत असत.

तसेच तुकोजीरावांनी मल्हारी मार्तंड विजय पत्र सुरू केले होते. तेव्हा यांना प्रतिनिधी निवडण्यात आले होते. मराठी कमिटी चे नाव “महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळ” असे होते. प्रकाशित झालेले ग्रंथ यांच्या कडे येत. इतर सभासदांसह वाचून बैठकीत कोणत्या ग्रंथाला काय किती बक्षीस द्यावयाचे हे ठरत असे. त्या काळी रु 1000 पर्यंत देखील बक्षीस देण्यात येत असत. केतकरांच्या ज्ञानकोशास ही त्यात रु 1000 बक्षीस मिळाले होते. या कार्यामुळे तात्यांचे (विनायक सरवटे) वाचन प्रचंड वाढले. असंख्य ग्रंथ वाचनात आलेत. खूप मोठा आवाका होता. पुण्यास जाऊन, पानिपत च्या युद्धानंतर चंद्रचूड यांनी पेशव्यांना पाठविलेली पत्रे यांचा ही त्यांनी अभ्यास केला .

1917, 18 साली सोशियलीजम वर तात्यांनी ग्रंथ लिहिला. आता आपण ज्याला कम्युनिज्म म्हणतो तेव्हा त्याला बोल्शेविज्म म्हणत असत. तो ग्रंथ इतका गाजला की पुढे 1970 मध्ये ‘कम्युनिज्म‘ वरील सर्व भारतीय भाषांतील प्रथम ग्रंथ म्हणून “सामाजिक वाद“ या त्यांच्या ग्रंथाला “सोव्हिएटलँड“ चा लेनिन पुरस्कार मिळाला.

त्याच काळात पॅट्रिक गेडीज या बहुश्रुत विद्वान, नगर रचना शास्त्रज्ञाने दार्जिलिंग ला एका व्याख्यानमालेची योजना केली होती. त्यात हे हजर होते आणि किबे मंत्र्यांनी यांच्यावर काम सोपविले होते की तेथे येणाऱ्या रवींद्रनाथ टागोर, जगदीश चंद्र बसु, यदुनाथ सरकार यांना इंदूर ला ही व्याख्यान देण्यास बोलवावे. महाराज सरकार त्यांना योग्य तो मोबदला देतील. हे काम त्यांनी अगदी चोख, उत्तम रित्या पार पाडले. त्यामुळे त्यांना टागोर, बोस यांच्याशी अगदी जवळून बघता, बसता, बोलता आले त्यांच्याशी झालेल्या गप्पा वाचताना मी रंगून गेले. बोस नी स्वतः केलेले प्रयोग बघून ते थक्क झाले.

त्याच सुमारास इंदूर ला मराठी साहित्य संमेलन झाले. पुण्याच्या “मराठी साहित्य परिषद“ ते संमेलन आयोजित होते. त्यात अनेक थोर लेखक तर होतेच पण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना निमंत्रण देण्याचे कार्य तात्यांवर होते. तात्यांना आश्चर्य वाटले की महाराजांनी तात्यांचे “आई बापास चार शब्द“ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी त्यांचे कौतुक तर केलेच पण ते गुजरातीत भाषांतर व प्रकाशन करण्याचा आधीच हुकूम दिला होता. या वेळी तरुण तात्यांना भरपूर ज्ञान मिळविण्याची आणि ओळखी करण्याची संधी मिळाली.

त्या नंतर लगेचच महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली हिंदी साहित्य संमेलन साजरे झाले. तेव्हा त्यांनी हिंदी ही राष्ट्र भाषा असावी हे प्रतिपादन केले . त्यात इंदूरचे निवृत्त न्यायाधीश कोंडोपंत दाते यांची महती सांगणे गरजेचे आहे कारण एक दीड वर्षांपूर्वी या थोर विचारवंताने हिंदी राष्ट्रभाषा असावी हे सांगितले होते. त्याच दातेंबरोबर तात्यांनी पुढे खूप कार्य केले. महाराष्ट्र ब्राह्मण सभा स्थापन केली. त्यासाठी 5000 रुपये किमतीचा भाग यांच्या वडिलांनी दान दिला हे आधीच आलेय.

1918 च्या इंदूर ला पसरलेल्या भयंकर साथी च्या वेळेस तात्यांनी मित्रांसोबत एक पथक तयार केले. त्यासाठी तुकोजीराव महाराजांनी स्वतः कौतुक करून त्या पथकाला आर्थिक मदत केली.

गांधीजींच्या व्याख्यानांचा त्यांच्यावर इतका पगडा होता की त्यांचा वकिलीचा काळ 1920 ते 1939 खूप गाजला. त्यांच्या सडेतोड, स्पष्ट, सत्य वक्तव्यांमुळे काही जण दुखावले गेले. चीफ मिनिस्टर गोविंदराव मैसूर यांनी तर त्यांची सनद काढून घेण्याचा ही हुकूम दिला. पण इंदूर चे वकील, जज, चीफ जस्टीस सर्व तात्यांच्या बाजूने होते त्यामुळे डिस्ट्रिक्ट जज एन आर जोशी यांनी त्यांची उदर निर्वाहाची काळजी दुसरे काम देऊन दूर केली.

महात्मा गांधींच्या “भारत छोड़ो” आंदोलनाच्यावेळी 1942 मध्ये त्यांनी वकिली पूर्णपणे सोडली. दोन वर्षे कारागृहात राहिले.
क्रमशः
(त्यांची विधायक कार्ये, सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय जीवन, पद्म भूषण सम्मान इतर ..उद्याच्या भागात)

स्वाती वर्तक

— लेखन : सौ.स्वाती वर्तक. खार (प), मुंबई.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी