वरवर चार चौघासारखे दिसणारे, पंच कोनी कुटुंब. अहो पण चार चौघासारखे सामान्य नाही. गावचा पाटील, पाटलीण बाई, मोठा मुलगा, मोठी सून आणि एक धाकटा मुलगा. एव्हढाच सामान्य भाग.
पाटील म्हटले की गावचा मोठा माणूस. भला मोठा पण जुनाट,मोडकळीस आलेला, अंधारलेला वाडा. किरकिरणारे दरवाजे, कुई कुई वाजणारा, रंग उडालेला, गंजलेल्या सळ्यांचा झोपाळा आणि हो –परसदारी खोल, जुनी, शेवाळलेली विहीर. अंगणात तुळशीवृंदावन तेही पडझड झालेलं, विटा ढासळलेलं, ना रंगवलेलं, ना सारवलेलं. जेमतेम तग धरून असलेली तुळस. संध्याकाळी मिणमिणता प्रकाश. असा पाटलाचा वाडा. कुठेही चैतन्याचा लवलेश नसलेला.
अर्धांगवायूचा झटका आल्यापासून कित्येक वर्षे पाटलीण बाई बिछान्याला खिळून होत्या. कोसळणाऱ्या वाड्याचा तोल संभाळण्याची धडपड व सासूबाईची देखभाल, स्वयंपाक व इतर गृहकृत्यात मोठ्या सुनेचा दिवस कुठल्याकुठे संपून जाई. स्वतःकडे लक्ष देण्यास तिला जराही वेळ मिळत नसे. त्यातून इतक्या वर्षात मूल बाळ न झाल्यामुळे नवऱ्याच्या दृष्टीने ती घरातील अडगळच होती. वांझपणाचा शिक्का तिच्या कपाळावर कायमचा कोरला गेला होता.
आपण असे कायम बिछान्यावर पडून असल्याने पाटलांची होणारी लैंगिक उपासमार ओळखून व मुख्य म्हणजे त्यानी बाहेरच्या बायकांकडे जाऊ नये म्हणून पाटलीण बाईंनी एक गरीब बाई पैशांची लालूच दाखवून वाड्यात आणली पण पाटलांची कामवासना आणि विचित्र लैंगिक मागण्या पाहून तिने दुसऱ्या दिवशी परसदारच्या विहिरीत उडी मारुन जीव दिला. गावात काही काळ कुजबुज झाली. पण पाटलांच्या घरचा मामला म्हणून लौकरच बंद पडली.
बिछान्यात पडून पाटलीणबाईंचे डोके कायम वेगवेगळे विचार करत होते. आता आपले फार दिवस राहिले नाही आणि वंशाला दिवा पाहिजेच या विचाराने तिने नवीन योजना केली. सून वांझ आहे तेव्हा गरीब घरातील मुकी मुलगी हेरली व तिच्या बापास घरी बोलवून “बघ, निदान मुक्या मुलीचे लग्न होईल व तुझी जन्माची काळजी मिळेल” असे पटवून तिचे मुलाशी लग्न लावून दिले. वांझ म्हणून शिक्का असलेली सून तर तशी पण मुकीच होती. रात्री तिने दुरूनच ह्या नव्या सवतीला स्वतःच्या नवऱ्याच्या खोलीकडे बोट दाखवून जायला सांगितले. ती खोलीकडे जात असतानाच मध्ये सासऱ्याची खोली ओलांडून जावे लागत होते. अंधारामुळे तिला काहीच कळले नाही आणि दाराआड लपून बसलेल्या सासऱ्याने तिला मध्येच आत खेचले. तो तर वखरखलेला, तिच्यावर तुटून पडला. रात्रभर तिच्यावर बलात्कार करत राहिला व शेवटी थकून आडवा झाला. हा सगळा प्रकार सहन न होऊन दुसऱ्या दिवशी पहाटेच मुक्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गावात खूप आरडा ओरडा झाला. बिचाऱ्या मुकीला यांनीच मारले असा आवाजही केला. ही बातमी सर्वतोमुखी झाली. पंचक्रो्शीत ज्याच्या त्याच्या तोंडी ही एकच बातमी होती. पाटलीण बाई हताश झाल्या तरी वंशाचा दिवा पाहिजे म्हणून हट्टाला पेटल्या होत्या. आता एकच मार्ग होता तो म्हणजे धाकट्या मुलाचे लग्न करून देणे.
धाकट्या मुलाच्या लग्नात अनेक समस्या होत्या. तो मतिमंद होता. शालेय शिक्षणात स्वारस्य नव्हते. दोन वर्ष नापास झाल्याने शाळेतून काढून टाकले होते. दिवसभर खिडकीतून बाहेर बघत बसायचा. पाटलांच्या मालकीचा छोटासा शेतीचा तुकडा होता. शेती यथातथाच होती. पाटलीण बाईंनी त्याला शेतावर पाठवणे सुरू केले. तेथे मोकळी हवा, झाडावरची फळे, गाजर, टोमॅटो इ.भाज्या खाऊन त्याची तब्येत चांगली सुधारली. घरी वहिनीकडून जेमतेम भाकर तुकडा मिळे तेव्हढेच जेवण.
वाड्यावर दोन स्त्रियांनी विहिरीत जीव दिल्याची बातमी सगळ्या गावाला आठवत होती. अशा ठिकाणी मुलगी कोण देणार ? कसायाला गाय विकण्यासारखेच !
पण पाटलीणबाई हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी चंग बांधला. दूरच्या नात्यात एक दरिद्री नातेवाईक होते. पदरी चार मुली, रूपाने सुमार, शिक्षण बेताचे. फक्त धाकटी मुलगी हट्टाने १२ वी पर्यंत शिकली होती.आणखी शिकण्याची इच्छा होती पण दारिद्र्य.
पाटलीण बाईंनी नेमक्या ह्या मुलीसाठी मागणी घातली. चार पैकी एक तरी खाणारे तोंड कमी होईल म्हणून बापाने होकार दिला. नाहीतरी गरिबांच्या मुलींना मन, भावना, बुद्धी नसते असे गृहीत धरले जाते. तिला फक्त शरीर असते ते काबाडकष्ट करण्यासाठी आणि पुरुषांची कामवासना तृप्त करण्यासाठी. निदान लग्न करून दिले तर विवाहिता म्हणून आधार मिळेल व आणखी हाल होणार नाहीत असा विचार करून अगतिक बाप हो म्हणाला.
वंशाला दिवा मिळण्याची सोय केली या आनंदात पाटलीण बाईंनी बऱ्या पैकी थाटात मुलाचे लग्न लाऊन दिले. कुतूहलाने बरेच गावकरी गोळा झाले होते. (तिसऱ्या आत्महत्येची गाव वाट बघत होता).
मागील प्रकाराची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी घेणे जरुरीचे होते. घरच्या प्रथेनुसार रात्री नवीन सुनेस दुधाचा पेला घेऊन सासऱ्याच्या खोलीकडे पाठवले. नराधम, वासनांध पाटील, आता सावज जाळ्यात येणार म्हणून अंधारात लपूनच बसला होता. सुनेने दारात पाऊल टाकताच त्याने तिचा हात धरुन आत खेचले, तोंडावर बोळा दाबून पलंगावर पाडले. सुनेने लाथा झाडून प्रतिकार करताच, जवळच्या चाकूने अंगावर चरे पाडले, बिडीने चटके दिले. तरीही निकराने त्याला ढकलून ती दाराबाहेर पडली व मोठ्याने ओरडू लागली. ज्याच्याशी आपले लग्न लावले तो हा नराधम नाही हे तिला कळून चुकले होते. सासू उठू शकत नव्हती. दीर, जाऊ धावत आले. दिराने मान खाली घातली होती. सहृदय जावेने हात धरून तिला तिच्या नवऱ्याकडे पोचवले.
तिला वाटले आता हा देखील आपल्याला ओरबडणार, बलात्कार करणार ! पण झाले अगदी उलट. त्याने तिच्याकडे पाहून सौम्य स्मित केले आणि बाहू पसरून स्वागत केले. तिचा स्वतःवर विश्वास बसेना. त्याने पुढे होऊन हळुवारपणे तिचे हात धरले आणि जवळ बसवले. तिच्याकडे पाहत तो तिच्या शरीरावरील सुरीचे चरे आणि बिडीचे चटके न्याहाळत होता. तिची ही दशा पाहून तो हुंदके देत रडू लागला. मतीमंद म्हणून जगाने धिक्करलेला, दूर लोटलेला तो एकटाच ह्या वाड्यातील “माणूस” आहे हे तिच्या चटकन लक्षात आले. ती त्याला जवळ घेऊन सांत्वन करू लागली. तो तिच्या जखमांवर हळुवारपणे खोबरेल तेल लावू लागला. हीच त्यांची “सुहागरात”.
प्रथम भेटीत मनोमीलन झाले. ती थोडी शिकलेली होती, बुद्धिमान होती, विचार करू शकत होती. तिने त्याचक्षणी निर्णय घेतला. दिवस उजाडताच त्याचा हात धरून दोघे घराबाहेर पडले. हळू हळू चालत दोघे जवळच्या शहरात पोचले. देवळात रात्रीचा सहारा घ्यावा, दिवसा देवळात येणाऱ्या लोकांकडे काम देण्याची विनंती करावी. पडेल ते कष्ट करावे. कष्टांची सवय होतीच. गाठीला थोडे पैसे जमा होताच भाड्याने खोली घेऊन संसार सुरू केला. वेळात वेळ काढून तिने डी.एड. चा कोर्स पूर्ण केला. जात्याच हुशार व शिक्षणाची ओढ त्यामुळे उत्तम मार्क मिळवले. लगेच नोकरी मिळाली. उत्पन्नाचे कायम स्वरूप हाती आले. कामे करता करता काही डॉक्टरांशी ओळख झाली. शहरातील मोठ्या डॉक्टरांकडे तिने नवऱ्याला नेले.
“हा जन्मतः मतिमंद नसून लहानपणी मानसिक धक्का बसल्यामुळे अभ्यासातून लक्ष उडाले आणि मतिमंद समजून सगळ्यांनी त्याला दूर ठेवले. तो एकलकोंडा बनत गेला, निसर्ग सान्निध्यात रमू लागला.
थोडी मानसोपचार ट्रीटमेंट दिल्यावर पूर्ण बरा होईल,” असे डॉक्टरांनी आश्वासन दिले. दोघांना हुरूप आला. लवकरच तो पूर्ण बरा होऊन एक वर्षात त्यांना एक गोंडस मुलगा झाला. दीपक नाव ठेवले. कुठून तरी ही बातमी सासरी पोचली.
सासरची माणसे आमच्या वंशाचा दिवा आम्हाला दे म्हणून मुलगा मागायला आली.
तिने ठणकावून सांगीतले, मुलगा देणार तर नाहीच पण तुमचे नावही लावणार नाही. आमचे दोघांचे नाव लावेल. माझ्या गुणी नवऱ्यापासून नवीन वंश सुरू झाला”.
— लेखन : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800