Friday, October 18, 2024
Homeसंस्कृतीवचन-सूत्र

वचन-सूत्र

आषाढ संपता संपता चाहूल लागते श्रावणाची…श्रावण, मनभावन श्रावण, ओला-हिरवा श्रावण, इंद्रधनुच्या सप्तरंगातील श्रावण, कविवर्य बा.भ बोरकर यांनी वर्णन केलेल्या कवितेतील स्रृष्टीला पाचवा महिना लागलेला श्रावण…

श्रावण महिन्यात सर्वात लगबग असते महिलांची…महिनाभर चालू असलेली व्रतवैकल्यं, नागपंचमी, मंगळागौर, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा, सोमवार, शुक्रवार एक ना दोन…शिवाय प्रत्येकाची वेगळी रीत…

आला आला श्रावण
आला मनभावन
घेऊनीया संगतीला
उत्सव आणि सण

पण जुन्या जाणत्या स्त्रियांना जरी या सगळ्यात जास्त रस असला तरी तरुणींना मात्र वेध असतात राखी पौर्णिमेचे…

नागपंचमीला झोके बांधायला झाडं दिसत नाहीत आणि पोळ्याला पूजा करायला बैलं सापडत नाहीत. शिवाय तेवढा वेळ तरी कुठं असतो कोणाकडे आजकाल…राखी पौर्णिमेचं मात्र तसं नाही हं…प्रत्यक्ष जाता आलं नाही तरी राखी कुरिअरने पाठवता येते. त्यासाठी बाजारात जाऊन निवडून निवडून राखी आणली जाते. आणि व्हिडिओ कॉलवर भावाने ती बांधलेलीही पाहिली जाते.

खरंच, आजकाल तर खूप महत्त्व आलंय या राखीला…उत्तर हिंदुस्थानातील ही रीत आपण भाऊबीजेइतकीच उत्साहाने स्वीकारलीय. राणी कर्णावतीने हूमायूंला राखी पाठवून रक्षण करण्याची विनंती केली. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया अबला होत्या (अर्थात अजूनही अपवादात्मक आहेतच) आणि पुरुषप्रधान संस्कृतीत बलवान पुरुषांचाच त्यांना आसरा घ्यावा लागत होता. त्याचे प्रतिक म्हणून राखीचा धागा बांधण्याची पद्धत रूढ झाली.

पण आता स्त्रिया शिकत आहेत. मानसिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. मग केवळ उपचार म्हणून भावाला राखी बांधायची एवढाच त्याचा अर्थ उरतो. त्या राखीची ओवाळणी म्हणून काय मिळणार आहे याचीच उत्सुकता जास्त असते. कधी कधी एखाद्या कुटुंबात दोन-तीन बहिणी मिळून एकच भाऊ असतो, तोही वयाने लहान, अशावेळी त्याच्याकडुन बहिणींनी ओवाळणीची आणि रक्षणाची अपेक्षा तरी कशी ठेवायची ! किंबहुना कधी कधी त्याचेच रक्षण करण्याची आणि त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारी बहिणींना घ्यावी लागते.

आणि शिवाय एखाद्या कुटुंबात फक्त मुलीच असल्या तर त्यांनी काय करायचं ? अशावेळी त्या बहिणींनीच एकमेकींना राखी बांधली तर काय हरकत आहे ?

नसे बंधू म्हणून आम्ही करीत नाही खंत
पाठोपाठच्या आम्ही बहिणी असुच भाग्यवंत
एकमेकींना राखी बांधून करू रक्षण परस्परांचे
हवाच पुत्र मग हट्ट कशाला ? करू सार्थक स्त्री जन्माचे
कर्तृत्ववान स्त्रियांची चालवू परंपरा ही पुढे
राखीच्या नाजूक धाग्यात शक्ती अशी सापडे

शिवाय पूर्वीच्या खेड्यात असल्याप्रमाणे आता आपापल्या धर्माच्या, जातीच्या वस्त्या वेगवेगळ्या राहिलेल्या नाहीत.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सर्वांनाच भिन्नधर्मीय शेजारी लाभत आहेत. आणि एखाद्या संकटात दूर राहणाऱ्या आपल्या नातलगांपेक्षाही शेजारीच शेजारधर्म निभावतांना दिसतात. मग अशावेळी म्हणावसं वाटतं…

सण रक्षाबंधनाचा, स्नेहल नात्याचा
न राहो फक्त भावा-बहिणींचा
परंपरेच्या चौकटीतून जरासा बाहेर पडून तो व्हावा…
बहिणी-बहिणींचा, मित्रा-मित्रांचा,
सख्ख्या शेजाऱ्यांचा…
काय हरकत आहे ?
आपल्या भिन्न धर्मीय स्नेह्यालासुद्धा राखी बांधून पाहायला…
मनातील आपुलकीचे दृश्य रूप साकारायला
या रेशीम धाग्याचे नाजूक बंधन नक्कीच दृढ करील
नाते आपले स्नेहाचे, प्रेमाचे, संवादाचे…

कधी एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषात सख्ख्या बंधुप्रेमाचा इतका ओलावा सापडतो की ते मानलेलं नातं आहे हे सांगूनही खरं वाटत नाही. कारण त्याला राखी बांधतांना…

द्रौपदी मी आणि कृष्ण सखा तू
नाते तरल मनाचे
हाक मारता येशील धावून
खात्री मजला वाटे
राखीचे हे नाजूक बंधन
नकोस मानू बेडी
रक्षण करण्या आज समर्थ जरी
ही बहीण तुझी रे वेडी
पाठीवरती फक्त हात ठेवुनी मनाला
दे जरा आधार
हळुवार भावनांच्या मध्ये पण
नच आणूया व्यवहार.

ही अशीच निरपेक्ष भावना दोघांच्याही मनात असते.

आणि शेवटी अशा कित्येक वेगवेगळ्या नात्यांनी रक्षाबंधन साजरे केले तरीही आपल्या भावाला सूत्र बांधताना बहिण वचन मागतेच…

राखी सांगे बंधुराया
मज बांधून घे हाताशी
आहेच तुझे नाते माझ्या
रेशीम धाग्यांशी
या धाग्यामध्ये गुंफिली
भाऊ बहिणीची माया
सत्वर धावून येशील ना
मज संकटात ताराया
नारी जरी ही सबला झाली
आधार हवा भावाचा
राखी बांधून दे विश्वास
सण रक्षाबंधनाचा.

या शिवाय समाजात कितीतरी व्यक्ती अशा असतात ज्या आपलं निरपेक्षपणे रक्षण करत असतात. मग ते थंडी वाऱ्याची पर्वा न करता सीमेचे रक्षण करणारे सैनिक असोत किंवा सण उत्सवात एकही सुट्टी न घेता अधिक काम करून कार्य सुरळीत पार पडण्यास मदत करणारे पोलीस असोत.
समाजातील अनाथ बालकांना, प्रौढांना, महिलांना सहारा देणारे खरेखुरे समाजसेवक असोत किंवा आपल्या प्राणांचे रक्षण करणारे देवदूतांसमान सेवाभावी डॉक्टर असोत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांचीही आठवण ठेवायलाच हवी, नाही का ?

हे झालं रक्ताच्या किंवा मानलेल्या मानवी नात्यांना वचन सूत्रात बांधणं…

आपला धर्म…जन्माने आपल्याला कुठलाही धर्म मिळाला असो…त्या धर्म तत्त्वांचा उद्देश जाणून घेऊन, त्याला विकृत उन्मादी स्वरूप न देता, मानवतेची जोड देऊन त्याचे रक्षण करण्यासाठी धर्माचरणरूपी वचनसूत्र बांधणे…हेही एक प्रकारे रक्षाबंधनच…

आणि आपला निसर्ग…ज्याचे आपल्यावर अगणित उपकार आहेत…त्याला विसरून कसं बरं चालेल ! खरं म्हणजे आपण ज्या पद्धतीने त्याचा ऱ्हास करतो आहोत ते बघता निसर्गानेच आता त्याचं रक्षण करण्यासाठी मानवालाच राखी बांधण्याची वेळ आलेली आहे. पण तो तर बिचारा मुका…हं…कधीमधी अगदीच असह्य झालं तर त्याच्या पद्धतीने तो आपल्याला इशारा देत असतो. आपण थोडा काळ सावध झाल्यासारखं दाखवतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या…तेव्हा यापुढे भविष्यात जर निसर्गाने आपलं रक्षण करावं असं वाटत असेल तर आपल्या संयमित वर्तनरूपी राखीचं वचन सूत्र आपल्याला निसर्गाला बांधावंच लागेल…बघा पटतंय का ?

भारती महाजन-रायबागकर

— लेखन : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन