बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणा-या आणि तब्बल ३४७ वर्षापूर्वी, सन १६७५ मध्ये बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याचे निर्देश पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्धार कामांचे भूमिपूजन आमदार श्री. सुनिल शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, माजी मंत्री श्री. सचिन अहिर, माजी नगरसेवक श्री. आशिष चेंबूरकर व श्रीमती हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे व मोठ्या संख्येने मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
जिर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणा-या बाबींची मुद्देनिहाय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे.
• वरळी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावरील पोर्तुगीजकालीन बांधकाम वैशिष्ट्ये आजही दिमाखात उभे आहेत. याच वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण करणे.
• या कामाकरिता महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, नागरी नियोजन सल्लागार मे. GSA तसेच पुरातन वास्तू जतन सल्लागार श्री. विकास दिलावरी यांचे सहकार्य लाभले आहे.
• वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार, सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण आणि परिसरामध्ये आकर्षक प्रकाशझोत प्रणाली बसविणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वास्तु संचालनालयाच्या मा. संचालक यांचे ‘ना हरकत’ पत्र यापूर्वीच प्राप्त झाले आहे.
• वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागाडुजी देखील करण्यात येणार आहे.
• वरळी किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरु, समुद्रफुल इत्यादी झाडांची आकर्षक लागवड करण्यात येणार आहे.
• किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा देखील तयार करण्यात येणार आहेत.
• वरळी किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी देखील परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.
• वरळी किल्ल्यालगत विद्युतीकरण व प्रकाशझोत योजना तात्पुरती कार्यान्वित करण्यात आलेली असून, ही प्रकाशझोत व्यवस्था कायमस्वरुपी कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.
– मूळ स्त्रोत : जनसंपर्क विभाग
बृहन्मुंबई महानगरपालिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.