Monday, July 14, 2025
Homeपर्यटनवर्धा : परमधाम आश्रम

वर्धा : परमधाम आश्रम

वर्धा शहरापासून 8 किमी. अंतरावर असणाऱ्या धाम नदीच्या काठावर भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी वसवलेला परमधाम आश्रम आजही तितक्याच दिमाखात उभा आहे.हा आश्रम आजही आचार्य विनोबा भावे यांची मानवता व सर्वोदया ची शिकवण देत आहे.

पवनारला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पवनार ही प्रवरसेनाची राजधानी होती. त्यावेळी पवनार चे नाव प्रवरपुर असे होते. कालांतराने त्याचे पवनार हे नाव झाले. पवनार ला ओळख मिळाली ती विनोबाजींच्या या परमधाम आश्रमाने.

1937 ला पवनार येथे परमधाम आश्रमाची मुहूर्त मेढ रोवली गेली. 1940 मध्ये विनोबाजीनी परमधाम आश्रमातून आपल्या सत्याग्रहाला सुरुवात केली.आश्रमाच्या बांधकामाच्या वेळी येथे अनेक मूर्ती सापडल्या. त्यात भरत व राम भेटीवरील प्रसंगाची एक सुंदर मूर्तीही सापडली. या आश्रमाच्या परिसरात या मूर्तीचे सुंदर मंदिर ही उभारण्यात आले आहे. तसेच सापडलेल्या सगळ्या मूर्ती या आश्रमाच्या परिसरात काळजीपूर्वक ठेवल्या आहेत.

हा आश्रम दुपारी 12 ते 2 पर्यंत बंद असतो. आश्रमाला स्वयंशासनाची शिस्त आहे.कोणावरही अवलंबून न राहता इथे काम केले जाते. इथे राहणारी व्यक्ती ही ब्रह्मचारी असते. आपले काम आपण करायचे आणि आश्रमातील एखाद्या कामाची जबाबदारी घेऊन तीही पूर्ण करायची हा इथला नेम आहे.

आश्रमात बाजारमुक्त जीवन जगता यावे ही कल्पना आजही दिसते. दरदिवशी लागणारा भाजीपाला, अन्नधान्य आजही पिकवले जाते. तसेच मोठी गोशाळा इथे असल्याने दुधदुभते ही आहेच. विनोबाजीनी यास ऋषिशेती असे नाव दिले होते.

आजही या आश्रमात सर्वत्र शांत वातावरण, स्वच्छता पाहायला मिळते. या आश्रमात आलो की मनाला प्रसन्न आणि शांत वाटते. समोरून वाहणारे धाम नदीचे पात्र मनाला सुखद शांती देते.

या आश्रमात आचार्य विनोबा भावे यांची समाधी आहे. समोरच असलेल्या धाम नदीच्या पात्रात विनोबाजीना अग्नी देण्यात आला होता. त्याठिकाणी एक चबुतरा उभा केला आहे. बाजूला ज्याठिकाणी महात्मा गांधी यांच्या अस्ती विसर्जित केल्या होत्या त्याही ठिकाणी एक मनोरा उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो.

आजही या आश्रमात असणाऱ्या सर्व महिला देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन राहिलेल्या आहेत. आश्रमात शिस्तीचे वातावरण पाहायला मिळते.

विनोबाजी म्हणत, एक स्त्री शंकराचार्य झालेली मला पाहायचे आहे. समाजातील स्त्रियांचे उपेक्षित आणि अपमानित जिणे त्यांना माहीत होते.

आज हा आश्रम स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेला पाहायला मिळतो. येथे सगळी कामे आपसात वाटून घेऊन केली जातात. सरकारकडून कोणतीही मदत न घेता हा आश्रम चालविला जातो.
आपणही याठिकाणी आपले योगदान देऊ शकतो. 10 दिवस आपण तिथे जाऊन राहून तिथले काम करून एका शिस्तमय जीवनाची वाटचाल शिकून येऊ शकतो.

स्वतः स्वर्गीय इंदिराजी गांधी याही अनेक वेळा या ठिकाणी येऊन राहिल्या आहेत. अनेक नेते ही जाऊन राहिले आहेत. इथले नियम, शिस्त आपल्या जीवनात आमलाग्र बदल नक्कीच आणतील.

मानसी चेऊलकर

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments