वर्धा येथील सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर जगातील सर्वात मोठ्या चरख्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या सुवर्ण जयंती निमित्ताने 2018 साली जगातील सर्वात मोठा चरखा येथील नव्या सभागृहासमोर उभारण्यात आला आहे.
हा चरखा मेटल शिक्षण महाविद्यालयात बनविण्यात आला असून गिनीज आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.

हा चरखा तब्बल साडेपाच टन लोखंड वापरून बनविण्यात आला आहे. त्याची उंची 18.6 फूट असून रुंदी 11.4 आहे. तर लांबी 31 फूट आहे. हा चरखा जरी लोखंडापासून बनवला असला तरी तो पर्यटकांना लाकडाचा असल्याचा भासतो कारण त्याला तसा रंग देण्यात आला आहे.
मुंबईतील सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट येथील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी अवघ्या 22 दिवसात हा चरखा तयार केला आहे. महाविद्यालयाच्या 3 शाखेतील तब्बल 17 विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा चरखा बनविण्यात आला आहे.
हा चरखा मोटारीच्या सहाय्याने फिरतो. त्यावर गांधीजींचे आवडते भजन “वैष्णव जन तो ……” हे ऐकायला मिळते.
या चरख्याच्या सभोवतालचा परिसर विविध रंगाच्या फुलझाडांनी सुशोभित करण्यात आले आहे. अतिशय शांत आणि आल्हाददायक असा हा परिसर आहे, त्यामुळे आपले मन ही इथे रमते.

याच परिसरात महात्मा गांधीजी आणि परमपूज्य विनोबा भावे यांची शिल्पे ही साकारण्यात आली आहेत. ही शिल्पे तयार करण्यासाठी स्क्रॅप मटेरियल वापरण्यात आले आहे.

8 डिसेंबर 2019 ला ही शिल्पे बनवण्यास सुरुवात झाली आणि 9 महिने 24 दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 रोजी ही शिल्पं पूर्ण झाली. यातील महात्मा गांधींच्या शिल्पाची उंची 30 फूट असून वजन 22 टन आहे. तर विनोबा भावे यांच्या शिल्पाची उंची 19 फूट असून वजन 18 टन आहे. ही शिल्पंही मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालयानी तयार केली आहेत.
वर्धा शहर हे या दोन महान व्यक्तींच्या सहवासाने पावन झाले आहे. म्हणून ही आगळीवेगळी आदरांजली त्यांना अर्पण करण्यात आली आहे. आपण आपल्या या महान व्यक्तींचे अनेक ठिकाणी पुतळे पाहतो पण वर्ध्यातील हे वेगळेपण आपण नक्की पहाच.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
भारतीय स्वातंत्र्यात वर्धा या नगरीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.त्या दृष्टीने लिहिलेला लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे.