Home साहित्य वर्धा साहित्य संमेलन ( २ )

वर्धा साहित्य संमेलन ( २ )

0

संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी २०२३ रोजी मी गीतांजलीने संध्याकाळी वर्धा येथे पोहोचलो.

उतरल्यावर संमेलनाचे निवास व्यवस्था प्रमुख मा. विलास मानेकर यांना फोन केल्यावर त्यांनी माझी व्यवस्था सेवाग्राम यात्री निवास येथे केल्याचे सांगितले. त्यानुसार मी रिक्षाने येथे पोहोचलो.

सेवाग्राम आश्रमासमोरच हा यात्री निवास आहे. निवासाची व्यवस्था चांगली होती.गरम पाण्याची व्यवस्था, स्वच्छ बेड व पांघरूण स्वतंत्र कपाटे होती. हे स्थान संमेलन स्थळापासून आठ किलोमीटर दूर होते त्यामुळे सर्व निमंत्रितांना संमेलन स्थळी जाता यावे यासाठी सकाळी तासा तासाने बसेसची व्यवस्था संमेलन समितीने केली होती.

संमेलनाची सुरुवात ३ फेब्रूवारीला ग्रंथदिंडीने गांधी चौकातून होणार होती. त्यामुळे सर्व आवरून मी सकाळी साडेसात वाजता गांधी चौकात पोहोचलो. तेथे विविध शाळांचे चित्ररथ एकेक करून पोहोचत होते. शालेय विद्यार्थ्यांचा बँड, लेझीम पथक, भजन पथक, विविध साहित्यिकांचा, संतांचा, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा पोशाख केलेले शालेय विद्यार्थी यांनी सर्व परिसर फुलून गेला. ग्रंथांची पालखीही चौकात आली.

संमेलनाचे कार्याध्यक्ष मा. प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघाचे इतर पदाधिकारी यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ग्रंथ दिंडीत असलेल्या भारतीय राज्यघटना, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, गीताई, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र या ग्रंथांचे पूजन होऊन ग्रंथ दिंडी निघाली.

ही ग्रंथांची पालखी मलाही खांद्यावर घेता आली. अनेक मान्यवर तेथे भेटले. डॉ. ऋता खापर्डे, कवी मा. प्रशांत पनवेलकर भेटले. ग्रंथ दिंडीचे लाइव्ह प्रक्षेपण मी माझ्या फेसबुक अकाउंट वरून केले.

अत्यंत उत्साहात सकाळी आठला निघालेली ही ग्रंथ दिंडी जवळजवळ दहा वाजता संमेलन स्थळी पोहोचली.

विस्तृत अशा स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन स्थळी असलेल्या स्वागत कमानीवर महात्मा गांधी नगरी लिहीले होते. कमानीवर चरख्यावर सुतकाम करताना महात्मा गांधींची प्रतिमा लावली होती. त्याचप्रमाणे आचार्य विनोबा भावे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, यांचीही चित्रे या स्वागत कमानीवर होती.

मैदानावर मध्यभागी संमेलनाचा ध्वज डौलाने फडकत होता. मुख्य मंडप आचार्य विनोबा भावे यांच्या नावे होता. या मंडपात सर्व महत्त्वाचे कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

त्याशिवाय ग्रंथ नगरी, कै. मनोहर म्हैसाळकर सभामंडप, प्रा देवीदास सोटे कविकट्टा, कविवर्य सुरेश भट गझल कट्टा, वं. मावशी केळकर वाचन मंच, बा.रा.मोडक बाल साहित्य मंच, ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच असे इतर मंडप होते.

अभिजात मराठी संबंधात शासनाच्या मराठी भाषा संचालनालयाचे स्वतंत्र दालन होते. साहित्य कला दालन असे स्वतंत्र मंडप होते.

या प्रत्येक ठिकाणी दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावरून संमेलनाच्या भव्यतेची आपल्याला कल्पना येईल.
क्रमशः

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version