Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यवर्धा साहित्य संमेलन : ७

वर्धा साहित्य संमेलन : ७

गेली दोन दिवस सेवाग्राम आश्रमाच्या समोर राहूनही सेवाग्राम आश्रम हा बघितला गेला नव्हता. त्यामुळे आज रविवारी ५ फेब्रुवारीला सकाळीच आश्रम बघण्याचे ठरवले व सर्व आवरून मी आठ वाजताच सेवाग्राम आश्रमात शिरलो.

महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष या आश्रमात वास्तव्य होते. या आश्रमात अनेक गोष्टी आहेत, त्यात बापू कुटी, कस्तुरबा कुटी, महात्माजींचे कार्यालय, प्रार्थनेची जागा, त्यांचे सचिव महादेव देसाई यांचे निवासस्थान, कुष्ठरोग झालेल्या व त्यांची सुश्रुषा प्रत्यक्ष महात्मा गांधींनी केली त्या परचुरे शास्त्री यांची झोपडी, अशा अनेक गोष्टी तेथे जपून ठेवलेल्या आहेत. महात्माजींनी वापरलेल्या वस्तूही तेथे आहेत. त्याशिवाय गोशाळा, नई तालीम परिसर तेथे आहे.

एक महात्मा गांधींचे विचार भिंतींवर लिहीलेला बगीचाही तेथे आहे. महात्माजींच्या चष्म्याचे प्रतीक, तिन माकडे तेथे आहेत. शेतकऱ्याची प्रतिमाही तेथे आहे. या बागेचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता मात्र आहे. परिसर झाडा फुलांनी हिरवेगार आहे.

कृषी, खादी, स्वदेशी उत्पादनांचे एक दुकानही तेथे आहे. ते १० वाजता उघडत असल्यामुळे पहाता आले नाही.

त्यानंतर विनोबांचा पवनार आश्रम, गीताई मंदिर व विश्वशांती स्तूप बघण्यासाठी एक रिक्षा ठरवली. नाश्ता कोठे चांगला मिळेल असे विचारल्यावर तो मला जिथे गरम दूध व पाव हा नाश्ता केवळ मिळत होता तेथे घेऊन गेला. मग तोच नाश्ता करून मी पवनारकडे निघालो.

रस्त्याच्या कडेला कापसाची शेती ठिकठिकाणी दिसली. पवनारला शिरल्यावर एक किल्ल्याचा जुना दरवाजा दिसतो. पण किल्ल्याचे अस्तित्व नाही.धाम नदीच्या पुलावरून आपण विनोबांच्या आश्रमाकडे येतो. आश्रमात गोशाळा, विनोबांनी लिहिलेल्या ग्रंथांचे विक्रीदालन, विनोबांची समाधी व एक मंदीर आहे.

मी सर्व प्रथम विनोबांच्या समाधीवर नतमस्तक झालो. ज्या खोलीत त्या महात्म्याचे वास्तव्य होते ती वास्तू अत्यंत पवित्र आहे. तेथे थोडावेळ केलेले ध्यान आपल्याला मन:शांती देते.

हा आश्रम स्थापला त्यावेळी खोदकाम करतांना अनेक जुन्या मूर्ती मिळाल्या. त्यातील भरत-राम भेट दाखवणारी मुर्ती मंदिरात ठेवली आहे. इतरही मूर्ती जतन करून ठेवलेल्या आहेत.

मंदिराकडून आपल्याला नदी पर्यंत जाता येते. खडकांतून वहात असलेल्या पाण्यात पाय ठेवून बसता येते. आश्रमात गाईंच्या चाऱ्यासाठी थोडी देणगी देण्याचे भाग्य मिळवून मी तेथून बाहेर पडलो.

त्यानंतर रिक्षा गीताई मंदिराकडे आली. जमनालाल बजाज फाऊंडेशनने याची रचना केली आहे. एका मोठ्या बगिच्यात चहुबाजूंनी उभ्या केलेल्या प्रत्येक शिलाखंडावर गीताईचा एक एक श्लोक कोरलेला आहे. अप्रतिम असे हे आधुनिक गीताई मंदिर आहे.

संपूर्ण मराठीतील गीतेचे हे सारस्वत लेणे विनोबांची आपल्याला मिळालेली स्वर्गीय देणगी आहे. आपल्या आईसाठी विनोबांनी लिहीलेली ही गीताई आपणा सर्वांना गीता समजावून सांगते.

त्याच परिसरात स्व. जमनालाल बजाज यांचे जीवन दर्शन घडविणारी प्रदर्शनी आहे.
देशासाठी सर्वस्व दिलेल्या महात्मा गांधींना जमनालाल यांनी या भूमीत यावे म्हणून मनधरणी केली व बापू या भूमीत आले.

सर्व प्रदर्शन पहातांना इतिहासाची पाने उलगडली जातात. जमनालाल बजाज वापरत असलेल्या काही वस्तूही तेथे आहेत.
या भागात जमनालाल बजाज फाऊंडेशनने उभारलेली आणखी एक वास्तू म्हणजे विश्वशांती स्तूप. प्रांगणात शिरल्यानंतर आधी जपानी पद्धतीने बांधलेले गौतम बुद्धांचे मंदिर आहे. त्याचा गाभारा विविध मूर्तींनी सजलेला आहे. पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे व बगीचा आहे. शेवटी उंच असा एक स्तूप आहे. स्तूपाच्या बाहेर चारबाजूंच्या कोनाड्यात भगवान गौतम बुद्धांच्या सोनेरी रंगातील विविध मूर्ती आहेत. अत्यंत अप्रतिम असा हा स्तूप आहे.

ही ठिकाणे पाहून झाल्यावर आमची रिक्षा संमेलन स्थळी आली. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले होते. सर्व ठिकाणे पाहून मी योग्य वेळी संमेलन स्थळी आलो होतो.
क्रमशः

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं