उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ फेब्रूवारीला, रविवारी दिवसाच्या शुभारंभाच्या परिसंवादाच्या वेळी संमेलन स्थळी आले. त्यांचे भाषण सुरेख झाले. आपल्या भाषणात त्यांनी महात्मा गांधींची काही वाक्ये उद्धृत केली. गझलकार सुरेश भटां पासून सर्व वैदर्भीय साहित्यिकांचा उल्लेख केला. राजकारणीही साहित्यिक असतात, टिव्हीवर तुम्हाला दिसेल ते स्क्रिप्ट लिहिणारे असतात, स्टोरी रायटर असतात, राजकारण्यांमुळे लेखकांना प्रेरणा मिळते वगैरे… आपल्या भाषणात त्यांनी शासनाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त विदर्भ साहित्य संघाला १० कोटी रूपयांची देणगी जाहीर केली.
मा. देवेंद्रजींच्या भाषणानंतर “गांधीजी ते विनोबाजी वर्तमानाच्या परिपेक्षकातून” या विषयावर परिसंवाद सुरू झाला. अध्यक्षस्थानी मा. विनय सहस्त्रबुद्धे होते. या परिसंवादात माझे मित्र ठाण्याच्या बेडेकर महाविद्यालयातील प्रा. प्रशांत धर्माधिकारी यांचा समावेश होता.
त्या शिवाय गोव्याचे मा.रमाकांत खलप, मा.भानू काळे, मा.श्रीकांत देशमुख, मा.देवेंद्र गावडे यांचा समावेश होता.
प्रा.प्रशांत धर्माधिकारी सर्व वक्त्यांत तरूण होते. संत साहित्याचा अभ्यासक असलेल्या असलेल्या प्रा. धर्माधिकारी यांनी संतांची अवतरणे देवून महात्मा गांधी व आचार्य विनोबा संतांचे कसे वारसदार आहेत हे दाखवून दिले. त्यांचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत असे त्यांनी प्रतिपादन केले. इतर वक्त्यांचीही विषयानुरूप भाषणे झाली.
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून नंतरचा
“वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण” हा परिसंवाद झाला. परिसंवादाचे संवादक माझे मित्र मराठी अभ्यास केंद्राचे प्रा. दिपक पवार हे होते.
सुरवातीला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी परिसंवादाच्या मागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मा. दिशा पिंकी शेख, मा. बाळकृष्ण रेणके, मा. मुफिद मुजावर व मा.रझिया सुलताना यांना काही प्रश्र्न विचारून प्रा दिपक पवार यांनी बोलते केले. त्यांच्या बोलण्यावर प्रेक्षकांतून प्रश्र्न मागविण्यात आले, त्या प्रश्नांना पुन्हा वक्त्यांनी उत्तरे दिली.
तृतीय पंथीयां संदर्भात दिशा बोलल्या. मुस्लिमांसंबंधात मुफीद मुजावर बोलले. वंचित मुस्लिम स्त्रीया, वारांगना स्रीयांविषयी रझिया सुलताना बोलल्या. भटक्या विमुक्तांच्या व्यथा व कथा भास्कर रेणके यांनी सांगितल्या. जरा बर्या उपस्थितीत हा परिसंवाद संपन्न झाला.
क्रमशः

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800