यवतमाळ हा निसर्ग समृध्द जिल्हा आहे. तसेच हा जिल्हा जंगलांनी वेढेलेला आहे. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात जैव विविधता आपल्याला पाहायला मिळते.
घाटंजी आणि केळापुर या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदीच्या खोऱ्यात 148 स्केअर किलोमीटर परिसरात टिपेश्वर हे अभयारण्य पसरले आहे. नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र 7, पांढरकवडा गावापासून 20 किमी अंतरावर तर यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून 92 किमी अंतरावर हे अभयारण्य आहे.
या जंगलात टीपाई देवीचे जुने मंदिर आहे. त्या मंदिरामुळे या अभयारण्याला टिपेश्वर हे नाव पडले आहे. या अभयारण्यात एक इंग्रज कालीन विश्रामगृह आहे. 30 एप्रिल 1997 रोजी अध्यादेश काढून टिपेश्र्वर अभयारण्य घोषित करण्यात आले.

टिपेश्र्वर अभयारण्यात 2020 च्या व्याघ्र गणनेनुसार अंदाजे 20 वाघ आहेत आणि इथे जंगल सफारीसाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींना ते निश्चित दर्शन देतात. त्यामुळे टिपेश्र्वर व्याघ्र प्रकल्प हा निश्चित व्याघ्र दर्शन देणारा प्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची वाढती संख्या पाहता ताडोबा हा वाघांच्या अधिवासासाठी मर्यादित होत आहे. त्यामुळे ताडोबा जंगलातून वाघ बाहेर पडून आपला नवीन अधिवास शोधतात. त्यांच्यासाठी टिपेश्र्वर हे नंदनवन ठरत आहे.
टिपेश्वर प्रकल्पात वाघांसह इतरही प्राणी व पक्षी यांचा अधिवास आहे. हे शुष्क पानझडी जंगल असून इथे प्रामुख्याने साग हा वृक्ष आढळतो. सागासह बांबू, शिसव, पळस, बोर, खैर, मोह, बाभूळ, चंदन, बेहडा यासारखे अनेक प्रजातीचे वृक्ष या जंगलात सापडतात. वाघासह, बिबट, अस्वल, रानमांजर, हरण, सांबर, काळवीट, चौशिंगा, खोकड, भारतीय मुंग्याखावू मांजर आणि जवळपास 160 प्रकारच्या प्रजातीचे पक्षीही या जंगलात सापडतात. विविध सरपटणारे प्राणीही असून त्यामध्ये अनेक विषारी सापाच्या प्रजाती बघावयास मिळतात.
टिपेश्वर हे दुर्लक्षित अभयारण्य असून संरक्षित जंगलातील काही गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे प्राणी, खास करून वाघ आणि नागरिक यांच्यामध्ये संघर्ष पहावयास मिळतो. वाघांनी स्थानिक शेतकऱ्यांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे या अभयारण्यात तातडीने सगळ्या सुविधा वाढवाव्या अशी स्थानिकांची मागणी आहे.
टिपेश्वर हा डोंगराळ आणि मैदानी असा भूप्रदेश असलेले अभयारण्य आहे. वाघांची येथील संख्या लक्षणीय आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघोबांचे दर्शन होतेच. तरीही टिपेश्र्वर हा काहीसा पर्यटकांनी दुर्लक्षित केलेला व्याघ्र प्रकल्प आहे. पर्यटक पाहिजे त्या संख्येने या प्रकल्पाला भेट देत नाहीत.
चला तर वाघोबा दर्शनासाठी एकदा टिपेश्वर अभयारण्याला भेट घ्यायला आणि तेथील पर्यटनाचा, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटायला !
– लेखन : अपूर्वा शीतलकुमार वानखडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800