Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

“अब तक छप्पन” वर प्रतिक्रियांचा पाऊस !
नमस्कार मंडळी.
श्री सुनील चिटणीस यांनी लिहिलेल्या “अब तक छप्पन” या स्नेह संमेलनाविषयी वाचकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.या सर्व प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ
संपादक


सुनील, खुप छान आठवणीं जपल्या आहेत. नाव पण योग्य. अब तक छप्पन्न 🙏
— दिलिप पाथरे, उद्योजक अलिबाग

लेख वाचताना जणू आपण अजूनही २८ जानेवारीचा कार्यक्रम प्रत्यक्षच अनुभवत असल्याचा क्षणभर भास झाला. कार्यक्रमाचे धावते समालोचन लेखातून व्यक्त करण्याची शैली कौतुकास्पद आहे.
— किरण गायतोंडे. चेंबूर, मुंबई

सुनील, खरेच 28 जानेवारी परत डोळ्यापुढे उभा केलास. तुझ्या लेखणीचे सामर्थ्य असेच फुलत राहू दे. वाचताना खूप आनंद झाला, मजा आली. 👍
— विलास बुटाला, उद्योजक, खेड, रत्नागिरी

तुमचं खेडचं स्नेहसंमेलन म्हणजे तुमचा छप्पन्न वर्षांनंतरचा आनंदोत्सव वाचून खूप आनंद झाला..
आपली गुहागरची सहल पुन्हा एकदा अनुभवल्याचा अनुभव आला..
प्रत्येक वर्षी निदान एकदा तरी चालेल अशा प्रकारचं संमेलन आयोजित करून सर्वांनी एकत्र येणं, एकमेकांना भेटणं, असा तुम्ही केलेला संकल्प स्वागतार्हच..
तुम्ही आपल्या गुहागरच्या सहलीच्या उत्कृष्ट आयोजनाची इथे खेडलाही पुनरावृत्ती करून तुमच्या अप्रतिम आयोजन/नियोजन कौशल्याची चुणूक दाखवलीत..
सुरूवातीला गुलाब पुष्प देवून केलेलं स्वागत व तिळगूळ देवून साजरा केलेला संक्रांतोत्सव मनाला भावला..
तसेच स्नेहसंमेलनाची सांगता प्रत्येकाला एक सुखद आठवण म्हणून स्मृतीचिन्ह देऊन केलीत, हेही आनंददायकच..स्नेह संमेलनाच्या दरम्यान तुम्ही स्वतः, देवेंद्र भुजबळ, विजय शिरीषकर इ. नी लिहिलेली १७ पुस्तकं व क्रीडासाहित्य शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करणं, हे विचारपूर्वक व कौतुकास्पद होतं..
पुढील वर्षानुवर्षे तुम्हीच एल पी इंग्लिश स्कूल च्या १९६८ बॅचचं नेतृत्व करावं, असं मला वाटतं आणि तुम्ही ते करणारच, याची खात्री आहे..

अलीकडच्या काळात संपर्काची साधनं वाढलीत, पण संवाद मात्र हरवत चाललाय, ही तुमची खंत बरोबरच व बोचरी आहे.. पण त्यावर फुंकर घालण्यासाठी अशा प्रकारची स्नेहसंमेलनं आयोजित करून एकत्र येणं गरजेचं आहे.. जेणेकरून एकमेकांशी संपर्क व संवाद साधता येईल आणि एकमेकांच्या अडचणी, समस्या, तसेच आनंदाचे क्षण व असंख्य जुन्या आठवणी शेअर करायला एक छान प्लॅटफॉर्म मिळेल..

तुम्हां सर्वांचे फोटो पहाताना आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद व हास्य न्याहाळताना एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही १९६८ बॅचचे विद्यार्थी ६८ वर्षांचेही वाटत नाहीत.. आणि खरंतर ५६ वर्षांनी भेटलेले हे विद्यार्थी ५६ वर्षांचेही वाटत नाहीत.. मला तर सगळे पंचेचाळीशीतले तरूणच दिसतात..
त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन.. पुढेही असेच चिरतरुण रहा.. त्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा..
— प्रकाश जुवळे. मुंबई

सांगायची गोष्ट म्हणजे सुखामागे दु:ख येतं. पण समाधानाचं तसं नाही आणि म्हणूनच समाधान हवं आयुष्यात ! समाधान मिळाल्यावर आनंद लगेचच गळ्यात हात टाकतो, आपल्याला आयुष्यात हेच तर हवं असतं.

व्यतित केलेल्या आपल्या जीवनातील स्नेहाचे कण कळत नकळतपणे जमवत असतो आणि हा साठा चिरकाल टिकणारा असतो, त्याची गणना- प्रतवारी करणं शक्य नाही तरीही आवश्यक आहे. रक्ताची नाती जशी ओढ लावतात तशीच *मैत्र* भेटीची आस लागते. पण मग नुसतं असं घोकून भूतकाळात रमून कडूगोड आठवणींनी उजाळा देऊनही काहीतरी अपूर्ण राहतंच…. आणि मग मनात येतं “ती सध्या काय करते ?”, कशी दिसते ? किंवा तो तसाच दिसत असेल का ? आपण त्याला ओळखू शकू ?? सांगायचा मुद्दा असा की, मैत्रीचा चिवटधागा असाच असतो. त्या ११ वी च्या वर्गातील मुलामुलींच्या जोड्या म्हणजे अदमु-या पौगंडावस्थेतील अपरिपक्व भावना !.. आज ते आठवल्यावर हसू येतं की नाही ?..

आणि मग आजचा दिवस उजाडला सूर्य आग ओकणारा नाही तर सोन्याचा गोळा भासला सकाळ होताच उषा आणि प्राची आठवली. अशावेळी मित्रमैत्रीणींच्या भेटीसाठी मनातील हुरहुर प्रगट झालीच !

एल्.पी.इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खेड, जि. रत्नागिरी  माजी विद्यार्थी ११ वी १९६८ ची बॅच. पहिलं वहिलं स्नेहसंमेलन सर्व ज्येष्ठांचं नव्हे तर अनुभवांनी पक्व झालेल्या या शाळकरी मुलामुलींचं !!
भेटण्याची उत्सुकता, सहवासाचा आनंद आणि उलगडा झाला तो याच दिवशी–तो सध्या काय करतो ? आणि तीही हल्ली काय करते ?
१९६८ च्या या हरहुन्नरी बॅचच्या सर्व मित्रमैत्रीणींचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आपली स्नेहांकित,
— नीलिमा जोशी. नाशिक

५६ वर्षांनंतर खेड येथील शाळेच्या प्रांगणात भरलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात जो तो आपले ‘ओल्ड फॅमिलियर फेसेस’ शोधून शोधून थकला असेल. अंतर राखून मुकेपणाने उभा असेल पण जेव्हा ओळख पटत गेली तेव्हा मुक्त संवाद साधत गळामिठीने स्नेहाचे आदान प्रदान करत आलेलं वृद्धत्व विसरून मिष्किल खोडकरपणात हरवत जाऊन वेळ कसा गेला हे कळलेच नसेल.

वृध्दांचीही पुन्हा नव्याने येथे शाळा भरते
जुन्या वास्तुच्या भिंतींनाही येइ नव्याने भरते

जिच्या कुशीला बसून तेंव्हा न्याहळिले अस्मान
त्या वास्तूचा जुन्या पिढीला नित वाटे अभिमान

वर्षे गेली दशके गेली जरी सोडले गाव
जरठ वयातहि हसे बालपण कुणी रंक ना राव

भोगायाचे भोगुन होते कुणी निरोगी नसतो
हिच्या प्रांगणी पडता पाउल जो तो योगी होतो
— सूर्यकांत द. वैद्य. माजी प्राचार्य, पुणे

मान गये सुनील.
५६ चे खूप सुंदर नियोजन व आयोजन. 👍👍👌👌💐
— अशोक शेठ.

_साल जो गुजरे छप्पन,_
_लौट के आया बचपन !_
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील एल.पी. शाळेतील काही माजी विद्यार्थी तब्बल छप्पन वर्षांनी एकत्र येतात काय आणि एक यशस्वी स्नेहमीलन करतात काय, सारेच अचंबित करणारे !
नुकताच ह्या आगळ्यावेगळ्या स्नेहमीलनाचे शिल्पकार श्री. सुनील चिटणीस यांनी लिहिलेला कार्यक्रमाचा वृत्तांत वाचनात आला. त्यात म्हटल्याप्रमाणे हल्ली संपर्क वाढला असला तरी संवाद खुंटलाय. संवाद आणि संपर्क ह्यावरच जगलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी ही मित्रमंडळी जेव्हा छपन्न वर्षांच्या दीर्घ काळानंतर प्रत्यक्ष समोर आली असतील तेव्हा त्यांच्या मनात नेमके काय भावतृषार उसळले असतील ह्याची कल्पना हे कार्यक्रम वृत्त वाचल्यावर येते. अशा स्नेहमीलनात किती जणांनी सहभाग घेतला, काय काय कार्यक्रम केले ह्यापेक्षा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची उर्मी जिवंत असणे हीच मोठी कौतुकाची बाब आहे ! मुख्य म्हणजे ह्या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षकांना आवर्जून सहभागी करून घेतानाच शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून शालेय ऋणाची जाणीवही जपण्याचा केलेला प्रयत्न अनुकरणीय आहे. ह्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
— संजीव माधव सुळे. पुणे

खुप छान……जुन्या आठवणीना उजाळा मिळाला……जुने मित्र आणि मैत्रीण भेटल्या की आनंद गगनात मावेनासा होतो सुरेख शब्दांकन 🤝👏👏👏👏
— उमा शृंगारपुरे. मुंबई

सुनील सर,
आपण आनंदाचे क्षण अनुभवलेत व त्याचे लेखन ही उत्कृष्ट केलेत. हा आनंद दीर्घ काळ टिकून राहो ही सदिच्छा व्यक्त करतो.
— विजय बाबा सावंत. नांदवी, गोरेगांव.
१०
साहेब, आपण खूप खूप सुंदर, मन भारावून जाणारे लेखन केले आहे. तुम्ही माजी विद्यार्थ्यांनी अनुभवलेल्या क्षणांचे  खूप समाधान वाटले. तुम्हां सर्वांचा दांडगा उत्साह, सहभाग मनाला भावला. *आपली बॅच शालेय विद्यार्थ्यांना वॉटर कूलरची सोय आपण करून देणार* ही शाळेप्रती असलेली औदार्य भावना खूप मोलाची आहे.
— बाळासाहेब भगत. विद्यमान मुख्याध्यापक
एल पी इंग्लिश स्कूल, खेड
११
मित्रवर्य सुनिल
“अब तक छप्पन” हा तुझा स्नेह संमेलनावरचा लेख वाचला आणि कार्यक्रम डोळ्यासमोर होतो आहे असंच वाटलं, छान. परवा म्हणजे २९ जानेवारी या दिवशी मी ज्या शाळेत मुख्याध्यापक होतो त्या शाळेतील 1990–91च्या विद्यार्थ्यांनी असाच कार्यक्रम मुरबाड जवळील एका फार्महाऊस मध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी होतो. या कार्यक्रमासाठी मी खास पुण्याहून आलो होतो.
तुझी खूप आठवण आली. All the best.
— जनार्दन राऊत.
निवृत्त मुख्याधापक, मुरबाड, अलिबाग
१२
आदर्श वृत्तान्त.
— राजा परळीकर. मुंबई
१३
माझी आई त्याच शाळेची विद्यार्थिनी होती. १९५० मध्ये एसएससी झाली. मॅट्रिक हे नांव जाऊन त्याच वर्षी अकरावी एसएससी सुरू झाले.
— राजेंद्र मसुरकर. शिरगाव खेड – रत्नागिरी
१४
श्री सुनील चिटणीस यांचा ‘अब तक छपन्न’ हा लेख कालच वाचनात आला. नाव वेगळं वाटलं म्हणून उत्सुकतेने वाचला. १९६८ सालातल्या खेड मधल्या एल. पी. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे चिटणीस यांच्या ओघवत्या शैलीतील वर्णन वाचून ते क्षण जणू डोळ्यांसमोर उभे राहिले. आजच्या डिजिटल युगात अशा भेटीगाठी होणे दुरापास्तच. एकीकडे  जग जवळ आले असले तरी माणसांना या प्रत्यक्ष भेटी किती गरजेच्या आणि आनंददायी असतात याची प्रचिती हा लेख वाचताना येते. आजी आजोबा झाल्यावरही विद्यार्थीपणाची बांधीलकी या सर्वांनी जपली आहे. ज्या वयात अनेक दुखण्यांनी त्रस्त होऊन माणसे घरी बसतात त्या वयात हि मंडळी “अभी तो मै जवान हूॅं” असं म्हणत एक दिवस आनंदात घालवतात आणि त्या आठवणी  श्री.सुनिल चिटणीस सुंदररित्या अशा प्रकारे शब्दरूपात जतन करतात, ही खरच अभिमानाची गोष्ट आहे.
— सौ. संपदा राजेश देशपांडे. पनवेल
१५
साष्टांग दंडवत चिटणीस साहेब १९६४ च्या माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनाची बातमी वाचली. खूप खूप आनंद वाटला. खेड येथील एल. पी. इंग्लिश स्कूल च्या ५६ वर्षापूर्वीचे विद्यार्थी आजोबा – आजी झालात. वैश्विकरणाचे आव्हान, संस्कृती संवर्धनाची जबाबदारी, संस्कार दाताची भूमिका अन उसळता चंगळवाद यांच्यात संतुलन ठेवताना जीवाची घालमेल निश्चितच होत असणार. जनरेशन गॅप मुळे प्रत्येक विषयात असणारी मतभिन्नता, त्यातून मनाला होणाऱ्या वेदना व यातना, मुलांचा व नातवांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दुरावणारी नाती, हरवलेला व विस्कटलेला संवाद, आई-बाबांची जागा मॉम-डॅडीने घेतली. “तुम्हाला काय कळतं मुकाट्याने गप्प बसा” असा शहाणपणाचा सल्ला किंबहुना आदेश किंचितही विरोध न करता आपल्या आयुष्यभराची पुंजी मुलांच्या स्वाधीन करणाऱ्या आजोबा आजींना प्रथम वंदन करतो. मुळातच चिटणीस साहेब एक वादक, कवी, लेखक आणि बरच काही अशी कवी मन असलेली  हळवी माणस  दुःखी होतात आणि कष्टी होतात.

आपण सर्व या शाळेत येऊन भूतकाळाला उजाळा देऊन शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अहो खरंतर कृतज्ञता, प्रेम, आत्मीयता, निष्ठा, भावना आणि वात्सल्य यांचा सुद्धा लिलाव झालेला दिसतो. पण अशाही परिस्थितीत आपण आपल्या समस्या, दुःख, व्याप, अडचणी व आजारपण बाजूला ठेवून या अभूतपूर्व आणि स्वप्नवत समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात व वैचारिक देवाणघेवाण केली या बद्दल आपणा सर्वांचे मनस्वी अभिनंदन ! उर्वरित आयुष्यात आपण नटसम्राट होऊ नका. ही कळकळीची विनंती करतो. शेवटी

मी जाता जाईल कार्य काय
जन पळभर म्हणती हाय हाय

पुन्हा सर्वांना साष्टांग दंडवत करून विधात्यास आपले उर्वरित आयुष्य निरोगी व निरामय राहो अशी विनम्र प्रार्थना करतो. धन्यवाद.
— प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी. श्रीवर्धन
१६
२८ जानेवारी २०२५ या दिवशी एल पी इंग्लिश स्कूल खेड १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी एकत्र येऊन जे आनंदी क्षण सर्व मित्र – मैत्रिणींनी वेचले त्याला खरोखरच तोड नाही. स्नेहमिलन ही कल्पना मनांत येऊन अंमलात येण्यास जवळजवळ एक वर्ष गेले. मला आठवतंय जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात कृष्णा चव्हाण याच्या आग्रहावरून मी एक व्हाटस् ग्रुप तयार केला अन एक एक करत पंचवीस मित्र या ग्रुपला जोडले गेले व त्याची परिणती, त्याचे गोड फळ म्हणजेच २८ जानेवारीला संपन्न झालेले स्नेहमिलन होय. सत्तावन्न वर्षानंतर एकमेकांची ओळख करताना चेहरे बरेच बदललेले असले तरी एकमेकांना पाहून, एकमेकांजवळ बोलून जो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसला त्यांनी माझ्यासह सर्व जण भारावून गेले.
हे स्नेहमिलन यशस्वी व्हावे म्हणून सर्वांचे सहकार्य होतेच परंतु सुनिल चिटणीस २० जानेवारी पासूनच सर्वांना फोन करून येण्यासाठी प्रवृत्त करत होता. कामाचे आयोजन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम प्रकारे त्याने केले. शिरिष पाटणे याने स्वतःच्या घरचा मोठा हॉल देऊन कार्यक्रम करण्यास अनुमती दिली त्याच्या कुटुंबाचीही खूप मदत झाली. विलास बुटाला याने त्याचा अमुल्य वेळ देऊन पडेल ती जबाबदारी आनंदाने पेलली. अगोदर ठरविले प्रमाणे शाळेला विविध पुस्तके व क्रिडा साहित्य भेट दिले. मनाला चटका लाऊन जाणारे डॉ. विजय शिरिषकर याने त्याच्या जीवनावरील आत्मकथन केलेले ‘वाया गेलेले पोर’ हे पुस्तक शाळेला भेट दिले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत सर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शाळेला वॉटर कूलर देणेचे मान्य केले यामधे किरण गायतोंडे, डॉ विजय शिरिषकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
सुनिल चिटणीस याने या स्नेहमिलनाचा ‘अब तक छप्पन्न’ हा साद्यंत वृत्तांत अगदी छान लिहिला, मी तर जपून ठेवला आहेच व अन्य मित्रही जतन करून ठेवतील हा विश्वास मला आहे. आपण ५७ वर्षांनी एकत्र भेटलो पुन्हा पुढच्या वर्षी असेच संमेलन आयोजित करूया असे मनाशी ठरवून सगळ्यांनी गोड निरोप घेतला.
‘न्युज स्टोरी टुडे’ या पोर्टलने अगदी सविस्तर तसेच फोटोंसह यथोचित प्रसिद्धी दिली. सौ अलकाताई भुजबळ व श्री देवेंद्रजी भुजबळ यांचे मी समस्त ६८ च्या मित्र मैत्रिणींतर्फे मनस्वी आभार मानतो.
— विश्वास दामले. ग्रुप ॲडमिन १९६८ ची बॅच
१७
“अरे: बापरे !! कित्ती दिवसांनी भेटतोय ! ?”
“कित्ती दिवसांनी ? कित्ती दिवसांनी नाही, वर्षांनी ! चक्क ५६ वर्षांनी भेटतोय आपण !!!”

मंडळी, शाळा सोडल्यानंतर कुणी ५६ वर्षांनी भेटतं, तर कुणी ४०, ४५, ५० वर्षांनी भेटतं. अहो, साधी बहिण एक वर्षानी माहेरपणाला २ दिवसांकरता आली की त्या बहिण भावंडांना किती आनंद होतो ? मग अनेक वर्षांनी बालपणीचे मित्र एकत्र आले किंवा मैत्रीणी एकत्र आल्या तर आनंद होणारच आणि त्यातही मित्र- मैत्रीणी एकत्र आले तर विचारूच नका. तर असे हे १९६८ च्या मॅट्रीकच्या बॅचचे खेडच्या एल्.पी. इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी- विद्यार्थिनी ५६ वर्षांनी एकत्र आल्यावर त्यांना आनंद होणार हे निश्चितच आहे. विशेष वाटलं ते याचं की, सगळेजणं आपला मीपणा, श्रीमंती, गरीबी इत्यादी बाजूला ठेवून, ५६ वर्षांपूर्वी वर्गात बसायचे तसा मित्रत्वाचा भाव मनांत ठेवून एकत्र जमले याचं. तसंच, नवल वाटलं ते आदरणीय
श्री. प्रकाश काळे सरांचं ! इतक्या वर्षांनी सगळ्यांना नांवाने ओळखणं म्हणजे काय चेष्टा आहे का ? खरंच, त्यांच्या स्मरणशक्तीचं कौतुक वाटतं.
थोडक्यात काय, बालपणीच्या मित्र- मैत्रिणींमधे रमण्यासारखा आनंद नाही. मनं ताजीतवानी होतात, सर्व सांसारीक चिंता विसरायला होतं आणि चेहऱ्यावर हसू उमलतं. थकलेल्या शरीराला उभारी मिळते. म्हणूनच बालपणीच्या सोबत्यांनी एकत्र येत रहावे. नमस्कार !
— संतोष गोविन्द जोशी. नाशिक
१८
“अब तक छपन्न”
एक सुंदर स्नेहमिलन !

अळवाच्या पानावरचे थेंब म्हणजे आपले बालपण असते ! स्फटिका सारखा तो थेंब एखाद्या गोल टपोऱ्या मोत्यासारखा असतो, तसे आपले अल्लड ‘बालपण’. १९६८ ची दहावीची बॅच म्हणजे, आम्ही तेव्हा दोन वर्षाचे असू ! … या विभुतीना एकत्र करायचे म्हणजे एखाद्या “तपा” सारखेच असते, यात कवी, लेखक उद्योजक श्री. चिटणीस सर आणि त्यांच्या टीमचे स्वागत आणि अभिनंदन करावेच लागेल, कारण एवढ्या वयोवृद्ध झालेल्या आणि त्या काळच्या विद्यार्थ्यांना शोधून एकत्र करायचे हे काम कवी आणि डॉक्टर्स करू शकतात असं मला वाटतं !
सुखद आनंद, त्या वयातील खोडकरपणा, टोपण नावे, फुल – हाफ पँट, स्पर्धा परिक्षा, शिक्षक, दुपारचे डबे खाणे आणि हुशार – ढ बालके विद्यार्थी……
काय मज्जा मज्जा असते हो ! त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतच राहावे असे वाटते !

त्या काळच्या सर्व यशस्वी विद्या्थ्यांना हार्दिक शुभेच्छा, “सदा आनंदी रहा” ही स्वामी चरणी प्रार्थना.
— ज्येष्ठ पत्रकार श्री. काशिनाथ उर्फ काका भोसले. शिरगाव – खेड
१९
शालेय जीवनाच्या आठवणी जिवंत, जागृत करणारा तुमचा ‘अब तक छप्पन्न’ हा लेख खूप आवडला. तुम्ही सर्व ६८ च्या बॅचचे विद्यार्थी अगदी सत्तावन्न वर्षानंतर एकत्र येऊन आनंदाने स्नेहमिलन करू शकलात, चार चांद लागलेत असं मी म्हणेन. तुम्हां सर्वांचा उत्साह वाचताना मला माझी एक खंत व्यक्त कराविशी वाटते………
मी १९६५ सालचा ‘विठोबा खंडाप्पा हायस्कूल – पनवेल’चा विद्यार्थी आहे. पळस्पे येथून चार पाच किलोमिटर चालत जाऊन शिक्षण घेत होतो. ते खडतर जाणे – येणे करून मॅट्रिक झालो. तुमच्यातले पुढारीपण मी तुमच्या सहवासात यापूर्वी अनुभवले आहे. तुम्ही रोटरी क्लबचे प्रेसिडेंट होतात अन मी सेक्रेटरी. खंत याचीच वाटते की सुनिल चिटणीसांसारखा एखादा मित्र मला माझ्या बॅचला लाभला असता तर…..  आमच्या बॅचचेही असेच छान संमेलन झाले असते !  हीच तर ती खंत तुमचा लेख वाचल्यावर मला प्रकर्षाने जाणवली, असो. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना माझ्या हार्दिक शुभेच्छा, मजेत जीवन जगा, आनंदी रहा.
— पद्माकर जावडेकर. पनवेल
२०
बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी
ख्वाबों ही मे हो चाहे, मुलाकात तो होगी
सुनिलजी तुमचं स्नेहसंमेलन बघून ह्या ओळी आपसूकच आठवल्या.
छप्पन्न वर्षानंतर पुन्हां आपल्या सहपाठींची भेट होणं, हे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.
शाळेत असतानाचे ते अल्लड दिवस, ती दंगा मस्ती आपण कदापि विसरू शकत नाही.
आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण असतात ते. ते सोनेरी क्षण तुम्हाला व तुमच्या मित्र, मैत्रिणींना पुन्हा एकदा जगायला मिळाले, अनुभवायला मिळाले हे बघून खूप खूप आनंद झाला.
पुढे ही अशीच स्नेहसंमेलनं होतील हीच शुभेच्छा देत आहे.
— प्रांजली प्रकाश दिघे. इंदौर
२१
सुनिलजी,
‘अब तक छप्पन’ हे तपशीलवार वृत्तांकन वाचले, तुम्ही लिहिता छानच यात काही प्रश्नच नाही, सुंदरच. अगदी सर्व संमेलन चलत चित्रपटासारखे माझ्या डोळ्यासमोर उभे केलेत. छान, खूप खूप कौतुक तुम्हां सर्वांचे. तुम्हां सारखा हरहुन्नरी सहकारी जेंव्हा आयोजन, नियोजन करण्यास सरसावतो तेंव्हा सर्वांची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार याची खात्री मला आहेच.
चालत चालत शाळेत गेलात, शाळेभोवती एक प्रदक्षिणा मारलीत हे वाचून शाळेप्रती असणाऱ्या तुम्हा सर्वांच्या भावनांचा मला मनोमन आनंद झाला. मुलामुलीं करिता तुम्ही सर्व वॉटर कूलर भेट देणार आहात खरंच कौतुकास्पदच कार्य हे. दुधावरची साय असणाऱ्या नातवंडांसाठीची ही गिफ्ट मला आवडली.
विजया मुकादम आमच्या घरा जवळच रहात होती. तिचा फोन नंबर असल्यास मला कृपया पाठवावा, मला संपर्क साधता येईल. पुढच्या वर्षीही अशाच स्नेह संमेलनाचे आयोजन जरूर करावे, त्या करिता माझ्या अनेक अनेक शुभेच्छा !
— सुमेध वडावाला. पार्ले, मुंबई
२२
खूप सुंदर वर्णन सुनिल तुझे अभिनंदन
— शिरिष पाटणे. खेड
२३
खूपच भाग्याच्या गप्पा, कार्यक्रमानी तुमचा असा आनंदोत्सव साजरा झाला. सुनिलदादा तू किती खूष असशील हे तुझ्या लिखाणावरून कळून आले. मी कल्पना करू शकते की वर्गमित्र हे निखळ आनंद, प्रेम देतात. तुम्ही असे करू शकला याचा मला खूप आनंद झाला, All the best, सुनिलदादा.
— चारू फाटक. पुणे
२४
धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हा सर्वांना एकत्र बघून. तुम्ही सर्वच खूप उत्साही वाटलात. असेच भेटत रहा. परमेश्वर तुम्हा सर्वांना असेच उत्साही ठेवो.
— प्रकाश काळे. माजी शिक्षक,गोवा
२५
मित्र हो, तुमचे “अब तक छप्पन्न” म्हणजेच छप्पन्न वर्षांनी एकत्र येवून साजरे केलेले स्नेहसंमेलन होय. खरंतर तुमची ही कल्पना मला खूपच आवडली. कारण छप्पन्न वर्षानंतर एकत्र येवून एकमेकांची सुखदुःखे शेअर करणं यासारखा परमोच्य आनंद दूसरा नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी निश्चितच जाग्या झाल्या असतील. त्यावेळी आपण कसे होतो आणि आत्ता आपण तेवढेच छोटे होवून बेंचवर बसणे, गप्पा मारणे एकमेकां कडील कलागुणांचे कौतुक करणे या सर्व गोष्टी आपल्याला पुन्हा अनुभवायला मिळाल्या यासारखे आपले दुसरे भाग्य नाही. खरोखरच आपण oसर्वजणं खूपच भाग्यवान आहात की, आपल्याला असा क्षण जो अनमोल आपल्याला आहे तो अनुभवायला मिळाला. तुमच्या ‘अब तक छप्पन्न’ या टीमला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद !
— सौ. मृण्मयी मनोज भुसाने. श्रीवर्धन
२६
‘ही आवडते मज मनापासूनी शाळा ।
लाविते लळा जशी माऊली बाळा ॥

जडणघडणीच्या काळात सुसंस्कार करून, शिक्षणाची – अभ्यासाची गोडी लावणाऱ्या आमच्या ‘एलू, पी. इंग्लिश स्कूल खेड शाळेच्या -१९६८ सालच्या माजी विद्याथ्यांचे पहिलेवहिले हे स्नेहसंमेलन २८ जानेवारी २०२५ रोजी खेड येथे संपन्न झाले, बरोबर ५७ वर्षांनी आम्ही वर्ग मित्र-मैत्रिणी (आजचे आजी- आजोबा) भेटत होतो. आनंदोत्सवच होता तो ! आठवणींना ऊजाळा देत, कुतुहल आणि भूत‌काळात रमल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता.

वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले, साहित्यात आपला ठसा उमटवणारे, उद्योजक, कारखानदार, शिक्षण क्षेत्रात झोकून देऊन ज्ञानदान करणारे, माझे शालेय स्नेही – आणि गुरुवर्य भेटल्याचा आनंद वर्णनातीत आहे. आयुष्यात असे काही क्षण येतात की जे चिरकाल स्मरणात रहातात, त्यातच हा ही एक एक पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असताना शालेय सोबत्यांनी एकत्र येउन स्नेहसंमे‌लनाचा विचार मनात येणे आणि तो कृतीत आणणे खरोखरच कौतुकस्पद आहे. “अब तक छपन्न” या सुनील चिटणीस यांच्या लेखाने सगळ्यांना (वाचकांना) अंतःर्मुख केले आहे. दरवर्षी असे स्नेह संमेलन भरविण्याचा उत्साह, त्याचे आतापासूनच सुरु असलेले नियोजन हे सारं आयुष्याच्या पुढील वाटचालीत खूप काही देऊन मला जाईल हे निश्चित् !
— सौ. मीना भडसावळे. एम ए एम एड
    (पूर्वाश्रमीच्य विजया मुकादम.)
२७
शाळेच्या मित्र मैत्रिणींचे संमेलन होणे हे खरंच मनाला आनंद देणारे क्षण असतातच. बाबा, तुमचा ‘अब तक छप्पन्’ हा विस्तृत लेख वाचला अन संपन्न झालेले हे संमेलन डोळ्यासमोर उभे राहिले. संमेलनासाठी चाललेली तुमची धावपळ मी अगदी जवळून अनुभवली आहे. कोणत्याही कार्याची जबाबदारी स्विकारली की iस्वतःला झोकून देऊन काम करण्याचा तुमचा स्वभाव माहित आहे. अन हा आदर्श आम्ही घेतला पाहिजे असाच आहे. तुमच्यापैकी updated कुणालाही म्हातारे न म्हणता मी सर्वांना “महातारे” आहात असंच म्हणेन.  ७२ – ७३ च्या वयाचे असूनही तुम्ही सर्व जणूं शालेय विद्यार्थी हे झाल्याचे पाहिले अन समाधान वाटले. यापुढेही असेच कार्यरत रहाण्यासाठी तुम्हाला परमेश्वर बळ देवो ही प्रार्थना.
— सौ मयुरी केदार चिटणीस. पनवेल
(“अब तक छप्पन” चे लेखक, श्री सुनील चिटणीस यांच्या साक्षात सूनबाई !.– संपादक).

प्रा आशी नाईक यांच्या जर्मन विश्व भाग ४ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

लिखाण अतिशय सुंदर झाले आहे. चारही लेख मी वाचले. त्यानिमित्ताने भारताबाहेर असलेल्या जर्मन भाषेतील साहित्यकारांची आम्हाला ओळख झाली. शाळेत असताना gate ह्या साहित्य कराची जराशी ओळख आम्हाला सरांनी करून दिल्याचे स्मरते. हे सगळे लेख एकत्र केल्यास एक सुंदर पुस्तक करता येईल. आणी माझ्या सारख्या असंख्य वाचकांना समाधान मिळेल.
— सुरेश आगटे. मुंबई

नेहमीप्रमाणे छान लेखन. एवढे सारे मुद्दे थोडक्यात कसे मांडावेत हे तुझ्याकडून शिकले पाहिजे. सुंदर.
— स्वाती पाठक. पुणे

खरच छान लिहितेस.
— सुनिता कुलकर्णी. पुणे

ॲन फ्रॅंक ची डायरी हे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचले होते. तुझ्या लेखामुळे पुन्हा त्यावेळेस झालेले ज्यू लोकांवरचे अत्याचार वाचुन  वाईट वाटले. आजुबाजुला एवढे घडत असताना ज्या कोवळ्या वयात तीने ह्या नोंदी लिहून ठेवल्या आहेत ते वाचून तीच कौतुक वाटते.
— स्वाती आगटे. मुंबई

सर्व लेख आत्ताच  वाचून झाले. मस्तच लिहिले आहेस. लेखमालेत सादर केलेले त्या, त्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती देणारे उल्लेख (फोटोज, संगीत व्हिडिओ वगैरे)  टाकल्यामुळे लेखनाला जास्तच उठाव आला आहे.
छान, छान….
— सौ. अंजली भट. पुणे

लिखाण अतिशय सुंदर झाले आहे. चारही लेख मी वाचले त्यानिमित्ताने भारता बाहेर असलेल्या जर्मन भाषेतील साहित्य करांची आम्हाला ओळख झाली. शाळेत असताना gate ह्या साहित्य कराची जराशी ओळख आम्हाला सरांनी करून दिल्याचे स्मरते. हे सगळे लेख एकत्र केल्यास एक सुंदर पुस्तक करता येईल. आणी माझ्या सारख्या असंख्य वाचकांना समाधान मिळेल.
— सुरेश आगटे. मुंबई

जर्मन विश्व भाग ४ उत्तम माहितीपूर्ण लेख.👌
— सुलभा गुप्ते. पुणे

प्रा. आशीताईंचे जर्मन विश्व अंतर्गत योहान वोल्फगांग फाॅन ग्योथ या जागतिक महान साहित्यिकाचा तपशीलवार परिचय वाचल्यानंतर मला तर अतिशय आनंद झाला. पण जेव्हा या महान लेखकाने संस्कृत भाषा शिकून त्यातील साहित्याचा अभ्यास केला आणि शाकुंतल सारखे नाटक आवडल्यामुळे ते डोक्यावर घेऊन नाचला म्हणजे किती प्रावीण्य मिळविले असेल या लेखकाने ! आता खरं सांगू का, माझे अज्ञान ! मला नं जर्मन कवी ‘गटे’ शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला असेच माहिती होते आणि पुस्तकांतूनही वाचले होते. खरंच खूप सुंदर लेख वाचायला मिळाला.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

प्रा.आशी नाईक यांनी ओळख करून दिलेले जर्मन लेखक “योहान वोल्फगांग” यांच्याबद्दल मला नवीन माहिती मिळाली आहे.
आता वाचायची इच्छा होतेय यातच लेखाचे श्रेय आहे. जर्मन स्पेलिंग आणि उच्चार यातील गम्मत जाणत असून ही मजा वाटली.. लेखासोबतचे फोटो ही छान आहेत.
— स्वाती वर्तक. मुंबई

“माझी जडणघडण” भाग ३४ वर  प्राप्त झालेले अभिप्राय….

अप्रतिम. बीम्बा (राधिका) तू दिवसेंदिवस फारच सुंदर आणि अतिशय प्रगल्भ  लिहीते आहेस. I am really proud of you. And fortunate to hv you as friend.
— अलका गुप्ता. पुणे

पडलेले प्रश्न खरेच विचार करण्याचे आहेत.
मोठ्ठे ग्रंथ आहेत पण अनेक प्रश्नांची उत्तरे, तशीच अनुत्तरीत आहेत.
राधिकाताई, छान सांगितले आहेत तुम्ही.
— छायाताई मठकर. पुणे

राधिका ताई आपल्या माझी जडणघडण भाग ३४ जो क्रमशः आहे पुढील भाग वाचायला मन अतुर झाले आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाने कधीच विचार केला नव्हता, जसे राजाचे मन, कंजूस माणसाचे धन, दुर्जनांना असणारे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे देवाला सुद्धा जाणता आले नसेल. नक्कीच सामान्य मनुष्याला कसे समजणार हे अगदी बरोबर आहे.
आपण गांधारी, कुंती,  द्रोपदी, वृषाली, अहिल्या, मीरा, राधा, सीता, मंदोदरी या सर्वांचा उल्लेख आणि त्यांच्या बद्दलच्या शंका माझ्याकरता तरी लेख वाचताना अधोरेखित झाल्या. प्रभू श्री राम राजा, हरिश्चंद्र, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, यांच्यासारख्या महारथींना आणि दुर्योधनासारख्या अधर्मी करण इंद्र अर्जुन भीष्म कृष्ण त्याचप्रमाणे वाल्याचा वाल्या कोळी या सर्व पुराणातल्या कथांचा पडसाद आजही जाणवतो. किती छान सर्वांचा संदर्भ. अगदी माझ्याही मनात त्याची उत्कंठा वाढवणारे प्रश्न आहेत, अगदी फूलन देवी पासून माननीय नरेंद्र मोदींपर्यंत सगळेच जसे घडतात जसे ते असतात खरं आहे की देवा नाही समजले नसेल ते आम्हाला तरी कसे कळेल ?
खूप छान लेख धन्यवाद.
— पांडुरंगशास्री कुळकर्णी. मुंबई

आजचा भाग फारच छान !
वाचकांना दिलेला सल्ला अगदी पटला. “जे देवालाही समजले नाही ते आपल्यासारख्या सामान्यांना कसे समजेल ?”
एकाच वातावरणात वाढललेली दोन मुले भिन्न कशी असू शकतात ?
हा लेख वाचताना माझ्या मनात हेच आले की जे मला पपांनी शिकविले तेच तुलाही शिकविले, पण तुझ्यासारखा विचार मला का करता येऊ नये ?
आपण पाचही बहिणी एकाच छत्राखाली, समान वातावरणात वाढलो तरीही प्रत्येकीचे वागणे, विचार करणे वेगळे कसे ?
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

मलाही तुझ्या सारखे रामायण महाभारत व इतर दंतकथा वाचून  तुझ्यासारखे अनेक प्रश्न पडले होते. तुझा लेख वाचून विचारधारा महत्वाची त्यावर भाग्य व चारित्य घडते हे पटल. अनेक वेळा आपले विचार घडणजडण हे आजूबाजूच्या परिस्थीतीवर अवलंबून असतात हे विसरून चालत नाहीं. आज काल तर मिडीयाचा खूप प्रभाव पडतो.
— रेखा राव. मुंबई

राधिका ..या भागामध्ये तू केवढी मोठी फिलॉसॉफी मांडली आहेस !! रामायण, महाभारत यासारखी महाकाव्ये मुळातच फार मोठी आवाका असणारी आणि अजूनही अगम्य असणारी आणि यातून आपण अजूनही कितीतरी गोष्टी शोधून काढत असतो आणि शिकत असतो.. त्यावर तू किती उत्तम शब्दात भाष्य केले आहेस !! खरोखरच तुझी प्रतिभा दिवसेंदिवस खूपच चांगले वळण घेत आहे आणि प्रगल्भ होत आहे हे निश्चितच !! या भागांमध्ये तुझ्या विचारांचा आवाका खरोखरच खूप मोठा आहे की ज्यामुळे मी अवाक झाले…..
— सुचेता खेर. पुणे

‘माझी जडण- घडण’ भाग 34 हा एकदम वेगळा विषय हाती घेऊन लिहिला आहेस राधिका.
लहानपणापासून आपण रामायण, महाभारत, पौराणिक कथा वाचत, ऐकत आलो आहोत. लहानपणी त्या कथावर विश्वास बसत असे. जसं वय वाढत गेलं तसे तू वर्णन केल्यानुसार अनेक प्रश्न मनात निर्माण होऊ लागले.
वाचन, विचार करण्याची वृत्ती यामुळे निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचा तू उल्लेख केला आहेस. स्वतः च्या परीने त्याचं योग्य उत्तर, मनाला पटेल असं शोधण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.
काही प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत किंवा समाधानकारक रित्या गवसत नाहीत अशा वेळी पुराणातील वांगी पुराणात असं मानावं लागतं.
रामायण, महाभारतातील अनेक व्यक्तीरेखा मनाला अचंबित करतात. पटत नाहीत तरी त्यांचे मानवी मनावरील गारुड कायम आहे. तू हा अतिशय वेगळा, लिहायला अतिशय अवघड विषय अतिशय सुंदरपणे हाताळला आहेस. त्याबद्दल तुझं अभिनंदन !
— अनुपमा आंबर्डेकर.

Bimba pharach chan Tuze he sarv prashna aaplya manat ahetach but tuze vishleshan (I don’t know if I have used the correct word) agdi uttam U have come to a rt conclusion  👍👌
— जयश्री कोतवाल. पुणे

Bimba, loved your Prashna also. All these questions I am sure everyone must b getting.. me too. Actually I start from whether Ramayana and Mahabharata घडली होतं का ? And then end up on feeling guilty for such thoughts. Anyways lovely write up as usual.
— संध्या जंगले. मुंबई
१०
स्त्रियश्चरित्रम् पुरुषस्य भाग्यम्
देवो न जानाति कुतो मनुष्य:?
ऊठ सूट आपण ही उक्ती  प्रसंगानुरूप एकमेकांच्या तोंडावर फेकत असतो. पण संपूर्ण रामायण-महाभारताचा लीलया परामर्श घेऊन राधिकाताईंनी ज्या स्त्रियांच्या चारित्र्याला आणि पुरषांच्या भाग्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे त्यांचे दाखले सहजपणे देऊन जो ‘अवाका’ दाखवला आहे त्याला तोड नाही. आपल्या विचाराच्या पुष्टिसाठी आधुनिक काळातली त्यानी दिलेली उदाहरणे प्रभावी असली तरी थोडी जास्त असती तर वाचायला आवडली असती. विषयाची मांडणी नेहमीप्रमाणे परिणामकारक !
— साधना नाचणे. ठाणे
११
बिंबा (राधिका) नेहमीप्रमाणे हा लेखही सुंदरच !
तुझा गाढा अभ्यास, तुझी दिवसेंदिवस उजळत जाणारी प्रतिभा या लेखातून जाणवते ! खूप छान.
— आरती नचनानी. ठाणे

सौ रश्मी हेडे यांच्या “मुलगी म्हणजे”…. या कवितेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

ही कविता मुलीच्या महत्वाचा आणि तिच्या अस्तित्वाचा अत्यंत सुंदर आणि भावनिक वेध घेते. प्रत्येक ओळीत मुलगी ही कुटुंबाचा आधार, जिव्हाळा आणि प्रेमाचा प्रतीक असल्याचं अगदी हृदयस्पर्शीपणे व्यक्त झालं आहे. तिच्या निरागसतेपासून ते तिच्या चैतन्याशीलते पर्यंत आणि नाती जपण्याच्या कौशल्य पर्यंत कवयित्रीने मुलगी या संकल्पनेचा संपूर्ण गौरव केला आहे. कविता नुसतीच वाचणाऱ्याच्या मनात भिडत नाही, तर त्याला मुलगी त्याच्या आयुष्यात किती अनमोल आहे याची जाणीव करून देते.
— कैलास सोनावणे. आम्ही साहित्यिक समूह

रश्मीताईनी लिहिलेली कविता अप्रतिम. मुलीचे महत्व विशद करणारी. अभिनंदन.
— स्वाती वर्तक. मुंबई

रश्मी हेडे यांची ‘मुलगी म्हणजे’ खूप सुंदर कविता.
— अरुणा गर्जे. नांदेड

खूपच छान. 👌
— अमृता पालकर. सातारा

खूपच छान.
— जयश्री कासार. सातारा

वाह…. खूपच छान.
— विशाखा खुटाळे. सातारा

खूप छान अप्रतिम कविता आहे.
— साधना कुंदप. सातारा

खूप छान कविता.
— वैशाली मंगरुळे. सातारा

रश्मी खूपच छान कविता.
घरात एक तरी मुलगी असायला हवी.
— उर्मिला पालकर. सातारा
१०
खूप सुंदर.
— ज्योती कासार. सातारा
११
फारच सुंदर, फारच छान
अप्रतिम मायेच्या गाभाऱ्यातूनच रश्मीने शब्द शोधून कविता लिहिलीय,असे वाटते.
— मीनाक्षी पालकर. सातारा
१२
खूपच छान.
— स्वाती मांजरकर. सातारा
१३
मुलगी म्हणजे काय हे खूप सुंदर अप्रतिम शब्दात वर्णन केले आहे. खूपच छान कविता केली आहे.
— शीतल विजय धडवई. सातारा
१४ 
मस्त रश्मी …. सुंदरच कविता. अभिनंदन. अशीच लिहीत रहा. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
— सुरेखा. पुणे
१५
Khupach chhan lihiliye ga 👏👏👏feeling proud of you 😘
— भारती चिटणीस. पुणे
१६
खूपच छान.
— संगीता सासवडे. सातारा

अन्य लेखनाविषयीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

अजित नाईक यांच्याविषयी आपण (देवेंद्र भुजबळ) लिहिलेला लेख मी वाचला. लेख खूप अप्रतिम लिहिला आहे. औरंगाबाद कॅबिनेटच्या वेळी त्यांच्या मैत्रीचा अनुभव मला आला आहे. सर्वांना आनंदाने मदत, मार्गदर्शन करणे हे त्यांचे महत्त्वाचे गुण आहेत. तसेच इतर कार्यक्रमांच्या वेळी देखील आम्ही एकत्र बऱ्याच वेळा होतो. सर्वांना मदत करणारे, असे अजित नाईक आहेत.
— गिरीश देशमुख.
निवृत्त शासकीय छायाचित्रकार, मुंबई

सर,
अजित नाईक सरांवरचा लेख वाचला. फारच छान व प्रेरणादायी आहे.
— नितीन सोनवणे. मुख्य छायाचित्रकार
इकॉनॉमिक्स टाइम्स, मुंबई

“अजितचं रामायण” मध्ये जाणीव होते की काही जण आपल्या कार्यात स्वतःला कसे वाहून घेतात. याला म्हणतात कार्यप्रेम, ओढ ते संपाकदजींनी उत्तम रित्या उदाहरणं देत सांगितले आहे. आवडले.
मेघना साने यांचे लेखन मला आवडते. त्यांच्या बद्दल वाचायला छान वाटले.
राधिकाताईंचा लेख उत्कृष्ट. जजमेंटल होऊ नये ..कधी कोणाचे भाग्य कसे उजळेल, ठाऊक नाही ..

संभाजी यांच्या कविता वेगळीच डूब असणाऱ्या खूप आवडल्या.

पद्मश्री डॉ शैलेश नायक यांची माहिती आवडली. धन्यवाद नीला ताई.

डॉ पांढरीपांडे यांचा लेख आधी वाचल्यासारखा वाटतो. नातवंडांनी आवर्जून वाचावा असा हा उत्तम पत्र व्यवहार आहे.

अजून ही आपल्या देशात रस्त्यावर इतके अपघात होतात हे दुर्दैव. त्यासाठी सुपर सेफ्टी मॅन पुस्तक लिहावे लागते. असो.. लोकांना जागृत करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.
रश्मी ताईंची माझी मुलगी ही कविता आवडली. सुंदर लिहिली आहे.

“एक प्रसन्न संध्याकाळ..”
छान स्टोरी. रामराजेला पाहून फार आनंद झाला.एक छान मितभाषी तंत्रज्ञ.
— श्रीकृष्ण साने. निवृत संकलक, मुंबई दूरदर्शन

पांढरीपांडे सर,
नातवांना आपण लिहिलेले पत्र वाचले. इतरांसाठी शेअर केले आहे. बदलता काळ आणि बदलती मानसिकता लक्षात घेऊन केलेले हे लेखन आत्मीय भावनेमुळे मनाला स्पर्शून जाते.
— प्रा सतीश बडवे.

आपण पाठवत असलेले पोर्टल प्रेरणादायक आहे. पोर्टल वरचे सर्व लेख हलकेफुलके आणि आल्हाददायक असतात.
यात सर्व प्रकार चे विषय असतात. तुमचं कलेक्शन फार विस्तृत आहे आणि निरंतर विस्तृत होत जावं ही सदिच्छा. बाल गंधर्व च्या कलादालनामधील पुस्तक प्रदर्शनात आपल्याशी आणि आपल्या पोर्टलशी जुळण्याचा योग आला ही किती मोठी घटना. आभार !
— किशोर पराते.

“एक प्रसन्न संध्याकाळ”
नमस्कार व अभिनंदन..
सुंदर अहवालात्मक, संपूर्ण विवरणासह लेख…
— विजया केळकर. हैद्राबाद

अच्युत पालव यांच्या लिहिलेला लेख सुंदर आहे.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
— सुरेश गोपाळे.
निवृत मुंबई महानगर पालिका अधिकारी

सर नमस्कार,
दि. २९ जानेवारीच्या पोर्टल मध्ये सुधीर ब्रम्हे यांच्या लेखणीतून साकारलेले शब्दशिल्पकार अच्युत पालव मनाला खूपच भावले. सुलेखनकार अच्युत पालव एवढीच फक्त माहिती होती. त्यांचे इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व, अनेक भाषांमधील शब्दशिल्पकारांना जोडून घेण्याची कला, ब्राम्ही, खरोष्टी, मोडी लिपींमधूनही सुलेखन अशा कितीतरी गोष्टी समजल्या. खरंच सुंदर परिचय.

प्रा. आशीताईंचे जर्मन विश्व अंतर्गत योहान वोल्फगांग फाॅन ग्योथ या जागतिक महान साहित्यिकाचा तपशीलवार परिचय वाचल्यानंतर मला तर अतिशय आनंद झाला. पण जेव्हा या महान लेखकाने संस्कृत भाषा शिकून त्यातील साहित्याचा अभ्यास केला आणि शाकुंतल सारखे नाटक आवडल्यामुळे ते डोक्यावर घेऊन नाचला म्हणजे किती प्रावीण्य मिळविले असेल या लेखकाने ! आता खरं सांगू का, माझे अज्ञान! मला नं जर्मन कवी ‘गटे’ शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला असेच माहिती होते आणि पुस्तकांतूनही वाचले होते. खरंच खूप सुंदर लेख वाचायला मिळाला.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
१०
नागेश शेवाळकर यांचा पद्मश्री अशोक सराफ यांच्यावरचा लेख आवडला. वाचताना अनेक चित्रपटस्मृती जाग्या झाल्या. एक काळ होता तो ! प्रचंड गाजलेला. सध्या कलर्स मराठीवर त्यांची अशोक मा. मा. ही मालिका चालू आहे. या मालिकेतील त्यांची भूमिका मात्र फारशी पटत नाही. असो.
पण लेख खूप छान आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
११
अच्युत पालव यांच्यावरील लेख खूप आवडला. मुख्य म्हणजे अच्युत याची कॅलिग्राफी शब्दातीत आहे पण त्याचे वर्णन करताना सुधीरजींनी इतके चपखल शब्द वापरले आहेत की मन प्रसन्न झाले .. खूप धन्यवाद.
— स्वाती वर्तक. मुंबई
१२
चित्रकार रमेश औंधकर यांची
चौमितीय रेखाचित्र शैली 👌
— चित्रकार हेमंत दंडवते. नगर.

सौ पौर्णिमा शेंडे लिखित “आठवणीतील गव्हर्नमेंट कॉलनी” या प्रत्यक्ष वास्तवावर आधारीत पण वाचताना जणू आपण ललित लेख वाचत आहोत, अशा आनंद देणाऱ्या स्मृती लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

“आठवणीतील गव्हर्नमेंट कॉलनी” हा लेख मला भूतकाळात घेऊन गेला. गेले ते दिन.!
— गांधी.  निवृत उपसचिव, मंत्रालय, मुंबई

बांद्रा पूर्व च्या या कॉलनीत एक वर्ष राहिलोय मी व त्यापूर्वी जे.जे.च्या होस्टेल मधे तीन वर्ष राहीलोय. जे कलानगर म्हणजे मातोश्रीच्या थोडे पुढे आहे. उद्धव ठाकरे होस्टेलवर कधी कधी यायचा. राजपण कधी कधी यायचा.
— चित्रकार रमेश औंधकर. मुंबई

नमस्कार सर.
“आठवणीतील गव्हरमेन्ट कॉलनी” हा पूर्णिमा शेंडे यांचा लेख वाचला आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अत्यंत ओघवत्या भाषेत सुंदर लिखाण लिहिले गेले आहे. माझं संपूर्ण बालपण म्हणजे जवळजवळ ४० वर्षे या कॉलनी समोर असलेल्या एक्सप्रेस हायवे पलीकडील झोपडपट्टीत गेले आहे.
कॉलनीत दोन शाळा खूप प्रसिद्ध होत्या. एक न्यू इंग्लिश स्कूल व दुसरी महात्मा गांधी विद्या मंदिर. माझे प्राथमिक शिक्षण कॉलनीतील महानगरपालिका शाळेत झाले. पुढे एसएससी पर्यंत महात्मा गांधी विद्या मंदिर येथे झाले. आज त्या दोन्ही शाळेतील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून बहुतेक जणं निवृत्त झाले असावेत. शेंडे मॅडमनी प्रस्तुत लेखात संपूर्ण चित्रच उभे केले आहे, एक एक गोष्ट कशी नजरेपासून दूर होत नाही. वसाहतीतील सर्व रहिवाशी सर्व सण कसे एकदिलाने साजरे करीत असत. कुठेही जातीय वाद नसे. सर्व गोडी गुलाबीने राहत असत. कित्येक जण निवृत्त झाले व ठिकठिकाणी दूर रहावयास गेले पण कधी त्या विभागात जाण्याचा योग आला तर “गेले ते दिन गेले” या ओळी विसरता येत नाही. शेंडे मॅडमना त्रिवार नमस्कार.
— सुरेश गोपाळे.
निवृत्त मुंबई महानगर पालिका अधिकारी.

“आठवणीतील गव्हरमेन्ट कॉलनी” खूप खूप छान लेख आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मी पण काही दिवस या कॉलनीत  ब128 या बिल्डिंग मध्ये राहत असे. तेथून मला रेकॉर्डिंग स्टुडिओत जाण्यासाठी बस मिळत असे. तेथून मेहबूब स्टुडिओ वांद्रा बॉम्बे लॅब प्रभादेवी  फिल्म सेंटर ताडदेव वेस्टर्न आऊट डोअर स्टुडिओ हुतात्मा चौक तसेच जुहू अंधेरी सांताक्रूझ इथे गाण्यासाठी स्टुडिओत मी जात असे. आमच्या शेजारी काही दिवस अभिनेत्री आशालता वाबगावकर  राहत असत. या तुमच्या लेखा मुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
— सिने गायक उदय वाईकर. परभणी

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी