भुतपूर्व राष्ट्रपती पै. डॉ अब्दूल कलाम यांचा आज जन्म दिवस आहे. हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने हा विशेष लेख….
– संपादक
पहाटेची रम्य वेळ होती. मला जाग आली होती. पण तरीही अंथरुणात तसाच पडून होतो. अशातच थोडा डोळा लागला म्हणा की काय सांगता येत नाही पण एक दृश्य माझ्या नजरेसमोरून तरळून गेले. डोळ्यासमोर कन्याकुमारीचा समुद्र होता. किनाऱ्यावर लाटा आदळत होत्या. समुद्राची गाजही ऐकू येत होती. स्वामी विवेकानंदाचे स्मारक दिसायला लागले.
अचानक मला स्वामी विवेकानंद ज्या खडकावर ध्यानस्थ बसले होते, त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची उभी असलेली भव्य मूर्ती दिसू लागली. स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्यासारखीच ती मूर्ती होती. त्या मनमोहक मूर्तीकडे पाहत असताना आणखी एक चमत्कार घडला. ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे रूपांतर एका विशाल ग्रंथात झाले. मग त्या ग्रंथाची पाने उघडून ती विस्तीर्ण समुद्राच्या पटावर पसरली. समुद्राच्या दोन्ही दिशा त्या पुस्तकाच्या पानांनी व्यापल्या. जणू पुस्तकाने आपला डावा आणि उजवा हात पसरला होता.
आता मला पुस्तकातली अक्षरं तारकांसारखी दिव्य आणि प्रकाशमान दिसायला लागली. हळूहळू त्या अक्षरातून प्रकाश बाहेर पडू लागला. त्या अक्षरांची जणू रत्ने झाली. त्यांनी भोवतालच्या परिसराला व्यापले. मलाही व्यापले. हळूहळू ही प्रकाशकिरणे वाढत जाऊन संपूर्ण विश्वाला न्हाऊ घालू लागली. प्रकाशाचे कवडसे ठिकठिकाणी विखुरले. कोणाकोणाला ती अक्षररूपी प्रकाशकिरणे अनमोल रत्ने वाटली. त्यांनी वेचता येतील तेवढी रत्ने गोळा केली. मीही जमेल तेवढी ती रत्नं गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी माझी अवस्था झाली.
इतरांनीही ती पाहिली पण त्यांना ती रत्ने आहेत हे कळलेच नाही. त्यांनी गारगोट्या किंवा चमकणारे दगड समजून त्याकडे दुर्लक्ष केले. ज्यांनी ती रत्ने गोळा केली त्यांच्या जीवनाची वाटचाल नकळत आनंद आणि समृद्धीच्या मार्गावर होऊ लागली. देवघरचेच देणे ते !
मग ज्ञानेश्वर माउलींच्या एकेक अर्थपूर्ण ओव्या मला आठवू लागल्या. माउली पसायदानात शेवटी म्हणतात,
“आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये
दृष्टादृष्ट विजये होआवे जी।”
ज्ञानेश्वर माऊलींचे अक्षर वाङ्मयावर असलेले विशेष प्रेम आपल्याला इथे दिसते. माउली म्हणतात, ‘ज्यांचे ग्रंथांवर विशेष प्रेम आहे किंवा ग्रंथांवरच ज्यांची उपजीविका आहे आणि ग्रंथातील उपदेश, तत्वज्ञान ज्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणले आहे, त्याचा अनुभव घेतला आहे, अशा लोकांना दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणारे आणि न दिसणारे अशा सर्व सुखांचा लाभ होऊन ते विजयी होवोत.
ज्ञानेश्वरीत माउली आणखी एका ठिकाणी म्हणतात,
“बिंब जरी बचके एवढे
परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे ।
शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी ।।”
सूर्यबिंब जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या हाताने ते झाकता येईल एवढे लहान भासते. पण त्याचा प्रकाश त्रैलोक्य व्यापून टाकतो.
शब्दांचेही तसेच असते. शब्द दिसतो चिमुकला पण त्याच्या अर्थात विश्व व्यापण्याची क्षमता असते. आपले हृदय सुद्धा आपल्या मुठीत मावेल एवढे लहान असते. पण या हृदयाकाशात एकदा प्रकाशाचा उदय झाला की सारे आयुष्य तो प्रकाशमान करून टाकतो. असेच आपले आयुष्य प्रकाशमान करण्याची शक्ती अक्षरांमध्ये आणि ती अक्षरे ज्या पुस्तकात सामावलेली असतात त्या पुस्तकांमध्ये असते.
तुकाराम महाराज म्हणतात,
“आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्दे वाटू धन जनलोका ।।”
संत तुकारामांनी
शब्दांचे महत्व
किती यथार्थ वर्णन केले आहे ! पण ज्याला ते कळेल त्यालाच त्याचे महत्व !
एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे,
“पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलंमन्नम सुभाषितम
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ।”
सुभाषितकार म्हणतो, ‘ पृथ्वीच्या पाठीवर तीनच रत्ने आहेत. मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारे अन्न, पाणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुभाषित किंवा सुविचार. सुविचार हे चांगल्या वाङ्मयातून, चांगल्या ग्रंथातून आपल्याला मिळतात. म्हणून चांगले ग्रंथ हे सुद्धा रत्नासारखेच मौल्यवान आहेत.
पुस्तकच काय परंतु एखादा चांगला विचार किंवा चांगला लेख देखील आपले जीवन बदलू शकतो. म्हणून “वाचाल तर वाचाल” असे आपण म्हणतो. पण ज्या संस्कृतीची वाटचाल ‘ वाचाल तर वाचाल ‘ इथून सुरु होऊन ‘ वाचाल तर समृद्ध व्हाल ‘ इथपर्यंत जाते त्या संस्कृतीचा उत्कर्ष होतो.
प्रख्यात आंग्ल कवी मिल्टन असं म्हणतो, ‘एखाद्या देशाचे काही साहित्य माझ्या हाती द्या, मग मी तुम्हाला तो देश, त्याची संस्कृती या सगळ्यांची माहिती सांगतो.’
एका सैनिकाची गोष्ट यानिमित्ताने आठवली. हा सैनिक हिमालयात सीमारेषेवर राहून भारताच्या रक्षणासाठी लढा देत होता. त्या ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी होती. शून्याच्या खाली तापमान गेले होते. त्या कडाक्याच्या थंडीमुळे आणि आपल्या घरापासून दूर असल्याने त्या सैनिकाच्या मनात निराशेचे विचार येत होते. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत तो येऊन ठेपला होता. एवढ्यात भूक लागल्याने घरच्यांनी त्याच्यासाठी पाठवलेले फराळाचे पदार्थ खायला त्याने सुरुवात केली. ते पदार्थ ज्या कागदात गुंडाळून पाठवले होते, तो कागद एका मासिकाचा दिवाळी अंकाचे एक पान होते. त्या पानावर पु ल देशपांडे यांचा
‘ माझे खाद्यजीवन ‘ हा लेख छापलेला होता. त्याने शेकोटीच्या प्रकाशात तो लेख वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता पुलंच्या मिश्किल आणि खुमासदार लेखाने त्याच्या मनाचा ताबा घेतला. त्याचे निराशेचे विचार कुठल्या कुठे पळून गेले. पुलंनी ज्या खाद्य पदार्थांचे बहारदार वर्णन केले होते, ते पदार्थ खाण्यासाठी तरी आपण जगणे महत्वाचे आहे असे त्याला वाटले. पुढे त्याने पुलंना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्याने म्हटले, ‘ खरं सांगतो, माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण आपला लेख वाचला आणि जगावंसं वाटलं.’ एवढी शक्ती एखाद्या लेखामध्ये, पुस्तकांमध्ये असू शकते.
मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारख्या कोणत्याही महामानवाचे उदाहरण घेतले तरी पुस्तकांवर त्यांचे अतोनात प्रेम होते हे आपल्याला लक्षात येईल. पुस्तकांनीच त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. ही माणसे कुठेही गेली तरी त्यांच्याबरोबर पुस्तके असत. ‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ‘ असे पुस्तकांच्या बाबत त्यांचे होते.
डॉ कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व होते. डॉ कलाम चांगल्या पुस्तकांना देवदूताची उपमा देतात. ग्रंथांबद्दल बोलताना ते म्हणतात,
‘ ग्रंथ सदैव माझे मित्र आहेत. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ मला ग्रंथांनी प्रेरणा दिली, स्वप्नं दिली. स्वप्नांमधून जीवित ध्येये गवसली. ग्रंथानीच ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास दिला आणि अपयशाच्या प्रसंगी धीर दिला. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांनो, ग्रंथांशी मैत्री जोडा. ग्रंथ तुमचे उत्तम मित्र असतात.’
शांता शेळके यांचा ‘ सहावे सुख ‘ या नावाचा एक लघुनिबंध आहे. त्यात चिनी माणसांचा एक दाखला त्या देतात. दोन चिनी माणसे एकमेकांना भेटली म्हणजे, ‘ तुम्हाला सर्व सहाही सुखे प्राप्त होवोत ‘ अशा शुभेच्छा ते एकमेकांना देतात. सहापैकी पाच सुखे आपल्या नित्याच्या परिचयाची आहेत. ती म्हणजे संपत्ती, संतती, प्रसिद्धी, मनासारखा जोडीदार आणि उत्तम आरोग्य. मग सहावे सुख कोणते ? तर अर्थातच ते ज्याचे त्याने शोधायचे असते. सहावे सुख प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकेल. कोणी ते पुस्तकात शोधेल, कोणी आपल्या आवडत्या छंदात, कोणी परमेश्वराच्या नामस्मरणात. पण आपल्यासारखी सामान्य माणसे नेहमी पहिल्या पाच प्रकारच्या सुखातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. सुखाच्या मागे आपण आयुष्यभर धावत राहतो. पण मनात आतून कुठे तरी बोच असते, की सगळे मिळूनही काहीतरी अपूर्ण आहे. तुमचे सहावे सुख जेव्हा तुम्हाला सापडेल, तेव्हाच तुम्हाला खरे समाधान लाभेल.
मला वाटतं हे सहावं सुख आपण वाचनात शोधायला हरकत नाही. एकदा का आपण पुस्तकांच्या संगतीत राहायला सुरुवात केली की ती आपलं बोट धरून आपली वाटचाल आनंदाच्या, सुखाच्या मार्गावर करण्यासाठी मदत करतील.
वाचन प्रेरणा दिन साजरा करताना हे लक्षात ठेवायला हवे की वाचनाची प्रेरणा आजच्या दिवशी जशी आपण घ्यायचा प्रयत्न करतो आहोत तशीच ती आयुष्यभरासाठी कायम राहायला हवी. वाचन किंवा ग्रंथ हे आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवेत.
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची एक छान कविता आहे. या कवितेतील काही ओळींनी आपण आजच्या या लेखाचा समारोप करू या. ते आपल्या मुलांना म्हणतात ‘ मी तुमच्यासाठी घर, गाडी, बंगला, पैसा यासारखी भौतिक संपत्ती मागे ठेवली नाही. माझ्या वाडवडिलांनीही तशी ती माझ्यासाठी ठेवली नव्हती. पण मी तुमच्यासाठी पुस्तकरूपाने एक अमूल्य अशी संपत्ती मागे ठेवली आहे. तिचा तुम्ही उपभोग घ्या. ते आपल्या कवितेत म्हणतात ,
“मी नसेन तेव्हा ही पुस्तके असतील \
जी नेतील तुला जायचं आहे तिथे.
फक्त मी असेन तिथे मात्र
तुला पोहोचता येणार नाही कारण
मी आधीच होऊन गेलेलो असेन .”
एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता एखाद्या पुस्तकातली माझी अनावर आठवण आली
की या प्रचंड ढिगाऱ्यातलं
ते एखादं पुस्तक शोध .
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होऊन जाईल !
– लेखन : विश्वास देशपांडे. चाळीसगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
वाचन प्रेरणा दिनावरचा लेख फारच छान 🌷👌👍