Wednesday, January 15, 2025
Homeबातम्यावाचन समृद्ध होणे गरजेचे - लीना बनसोड

वाचन समृद्ध होणे गरजेचे – लीना बनसोड

वाचन संस्कृती वाढवायची असेल, ती टिकवायची असेल तर आपण प्रत्येकाने पुस्तके वाचली पाहिजेत. पुढच्या पिढीवर वाचन संस्कार केले पाहिजेत. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. हे आव्हान पेलायचे असेल तर आपल्याला वाचनाने समृद्ध व्हावे लागेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक लीना बनसोड यांनी केले.

दहावा मैल येथील आजीचं पुस्तकांचं हॉटेल आणि अक्षरबंध प्रतिष्ठानच्या माध्यमातून नाशिक येथे नुकताच पुस्तक महोत्सव आणि वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बनसोड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र वसंत खैरनार होते. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या आयोजक आणि पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे यांची उपस्थिती होती.

बनसोड पुढे म्हणाल्या, वयाच्या ७४ व्या वर्षीही भीमाबाई जोंधळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी घेत असलेले परिश्रम तरुणांना लाजवतील असे आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळ वाढविण्यासाठी हातभार लावण्याबरोबरच पुस्तकांच्या माध्यमातून अनेकांच्या हृदयात घर केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत खैरनार म्हणाले, भीमाबाई यांनी पुस्तकांची आई म्हणून अनेकांच्या हृदयात पुस्तकांबरोबरच आपलेही स्थान निर्माण केले आहे. पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे समाधान मोठे आहे. ते पैशाने विकत घेता येणार नाही. माणसाला विचार श्रीमंती प्रदान करण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांना महत्त्वाचे आणि मोठे स्थान असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मानवधनचे प्रकाश कोल्हे, गिरणा गौरवचे सुरेश पवार, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला आणि वाचन चळवळीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी विनायक रानडे, किरण दशमुखे, ब्रिजकुमार परिहार आदींसह साहित्यिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी बागडे यांनी केले. सप्तर्षी माळी यांनी आभार मानले.

‘अक्षरबाग‘, ‘अमृतवेल’, ‘मृदगंध’ची सुरुवात…
कुसुमाग्रजांच्या साहित्यकृतीच्या नावे ‘अक्षरबाग’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे कामगार कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांच्या हस्ते ‘मृदगंध’ वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली. विंदा करंदीकर यांच्या साहित्यकृतीच्या नावे हा कट्टा सुरू करण्यात आला. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही वाचनप्रेमी व्यक्तीने या कट्ट्यावर येऊन पुस्तके वाचावीत यासाठी हा कट्टा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर वि. स. खांडेकर यांच्या ‘अमृतवेल’ या साहत्यिकृतीच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पुस्तक दालनात नव्या-जुन्या पुस्तकांचा महोत्सव सुरू करण्यात आला आहे.

उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सन्मान

अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कार वितरण यावेळी करण्यात आले. पुढारी प्रकाशनच्या दीपस्तंभ दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक पुढारीचे निवासी संपादक मिलींद सजगुरे यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट विषयासाठी सकाळच्या ऋतुचक्रला सन्मानित करण्यात आले. प्रशांत कोटकर यांनी हा पुरस्कार स्वीकरला. सर्वोत्कृष्ट मांडणी दिवाळी अंकाचा पुरस्कार ‘वाघूर’च्या लेखिका तन्वी अमित यांनी स्वीकारला. सर्वोत्कृष्ट मुखपृष्टचा पुरस्कार कादवा शिवारचे विजयकुमार मिठे आणि सृजनसंवादचे विशाल महेकर यांना प्रदान करण्यात आला. ‘वारसा’चे जयंत येलुलकर यांनी उल्लेखनीय दिवाळी अंकाचा पुरस्कार स्वीकारला.

यांचा झाला गौरव

माळी समाज महिला सेवा समिती (नाशिक), योगाकार फिटनेस सेंटर (ओझर), श्री शंकर सेवा मंडळ (पुणे), शासकीय कर्मचाऱ्यांचे वाचनालय (नाशिक), रोटरी क्लब ऑफ नाशिक मिड टाउन (नाशिक), गिरणा गौरव प्रतिष्ठान (नाशिक), ब्राईट स्टार युनिव्हर्सल ॲकेडमी (ओझर), कामगार कल्याण मंडळ (मुंबई), रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ (नाशिक), जनसेवा मंडळ (ओझर), गुरूकुल परिवार संस्था ( पिंपळगाव बहुला), कल्याणी महिला पतसंस्था (निफाड), दिल दोस्ती फांऊडेशन (नाशिक), द्वारका ज्येष्ठ नागरिक संघ (नाशिक), निर्भया सामाजिक संस्था (सिन्नर), महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशन (नाशिक), समिज्ञा फाउंडेशन (नाशिक), स्मितहर्ष एज्युकेशन ॲकेडमी (नाशिक), शारदा बहुद्देशीय संस्था ( नाशिकरोड), परिवर्तन बहुद्देशीय संस्था (नाशिक), स्वामीराज प्रकाशन (मुंबई), हास्य सरीता क्लब (म्हसरूळ), मविप्रचे आयएमआरटी कॉलेज (नाशिक), राधिका फाउंडेशन (नाशिक), इगतपुरी साहित्य मंडळ (इगतपुरी), प्रवीण ठाकरे, निखिलकुमार रोकडे, भगवान पगारे, वैभव कातकाडे, ज्योती तुपे-आधट, ज्योती कपिले, यतीश भानू.

बुकलेट बॉय’ने साधला संवाद

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बुकलेट ॲपच्या माध्यमातून वाचन चळवळ तरुणांमध्ये रुजविणारे आणि वाचनाचा विश्व विक्रम करणारे मुंबईचे अमृत देशमुख यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थितांशी संवाद साधला.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments