Wednesday, November 12, 2025
Homeलेख"वाढत्या आत्महत्या : या "शिक्षणा"चा काय उपयोग ?"

“वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”

तिकडे पंजाब राज्याचे माजी पोलिस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नीच नाही तर पंजाब राज्याच्या मंत्री राहिलेल्या रझिया सुलतान यांच्या अकील अख्तर या ३८ वर्षाच्या मुलाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली. तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने त्याचे वडील आणि त्याची पत्नी यांचे अनैतिक संबंध असल्याचे तसेच आई, बहीण यांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. तर अकील अख्तर हा व्यसनी होता, असे त्याचे वडील सांगत आहेत.

तर इकडे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासनाच्या ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांनी फलटण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार महिन्यात चारदा बलात्कार केल्याचे तसेच त्या रहात असलेल्या घर मालकाचा मुलगा; प्रशांत बनकर हा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचे डाव्या हाताच्या तळहातावर लिहून ठेऊन, ऐन दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी स्थानिक हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. यातील आरोपी प्रशांत बनकर हा केवळ घर मालकाचा मुलगाच नाही तर आयटी इंजिनिअरही आहे ! आता या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. त्या विषयीच्या बातम्या सतत वाचायला , पहायला मिळत आहेत, त्यामुळे त्या विषयी अधिक भाष्य नको.

यापूर्वी दोन आय ए एस दाम्पत्याच्या तरुण मुलीने आणि मुलाने दोन स्वतंत्र घटनांमध्ये मुंबईत उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्या.

ही तीन ठळक उदाहरणे दिली असली तरी, दररोजच कुठे ना कुठे,कुणाच्या ना कुणाच्या आत्महत्या होत असतात किंवा आत्महत्या करण्याचे प्रयत्न होत असतात. काही गाजत राहतात,तर काही एका दिवसाच्या, एका क्षणाच्या बातमीचा विषय होऊन संपून जातात.

या अशा आत्महत्या आणि त्यांच्या कायदेशीर बाबी, पोलिस तपास, या नंतर घडणाऱ्या कारवाईपेक्षा मला भेडसावणारा मुख्य प्रश्न आहे, तो म्हणजे मुळात या आत्महत्या झाल्याच का ? होतातच का ? शिक्षणाने माणूस सुसंस्कारित झाला पाहिजे, एक जबाबदार नागरिक झाला पाहिजे अशी रास्त अपेक्षा असते. त्यात जर आपले प्रश्न मार्गी लागत नसतील तर संविधानाने निर्माण केलेल्या विविध शासकीय,निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या, संबंधित क्षेत्रातील तज्ञ यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविल्या गेले पाहिजेत. पण असे न होता, काही प्रकरणी अशा या यंत्रणांकडे जाऊनही कदाचित प्रश्न सुटत नसतील, उलट जास्तच त्रास वाढत असेल किंवा दिल्या जात असेल आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नसल्याने शेवटी आत्महत्या हाच शेवटचा मार्ग समजून त्या दिशेने पाऊले उचलली जात असतील.

आत्महत्या हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने या विषयाचा अभ्यास करण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत असतो. काही तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करीत असतो. या सर्वांच्या आधारे, मला असे वाटते की, गेल्या काही वर्षांमध्ये आत्महत्या वाढण्याची काही कारणे म्हणजे, उध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यक्तीच्या मनावर, जीवनावर, नाते संबंध यावर पडत चाललेला प्रतिकूल परिणाम, आत्महत्या ग्रस्त व्यक्तीकडून कुटुंबीयांनी, वरीष्ठ व्यक्तिंनी अवास्तव अपेक्षा करणे, स्वतःच्या मनाचा कल न ओळखता, अशा अवास्तव अपेक्षांना बळी पडणे, स्पर्धेतून,कामातून निर्माण होणारा ताण तणाव, एकटेपणाची भावना, नैराश्य अशी मानसिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय कारणे होत.

माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ इथे काही उदाहरणे देता येतील. ज्या आयआयटीत प्रवेश मिळावा म्हणून मुले, मुली आणि त्यांचे पालक जीवाचे रान करतात, त्या विविध आयआयटी संस्थांमधील पहिल्या ते चौथ्या वर्षात शिकत असलेल्या ११५ मुलामुलींनी गेल्या १० वर्षांत आत्महत्या केल्या आहेत.

ज्या एमबीबीएस, एमडी, एमएस अभ्यासक्रमांसाठी दिवसरात्र अभ्यास करून, प्रवेश परीक्षेची तयारी करून, लाखो, करोडो रुपये खर्च करून प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविला आहे, अशा १२२ मुलामुलींनी गेल्या ५ वर्षात आत्महत्या केल्या आहेत.

पोलिस आणि सेना दलातील अधिकारी, जवान हे शरीराने धट्टेकट्टे असतात. पण ते केवळ तसेच असून उपयोग नाही, तर ते मनाने सुद्धा तितकेच सुदृढ असले पाहिजे. अन्यथा भारतात गेल्या ५ वर्षांत पोलिस दलातील ९३० आणि भारतीय लष्करातील ६४२, भारतीय वायू सेनेतील १४८ तर भारतीय नौदलातील २९ अशा एकूण ८२९ जणांनी मृत्यूला कवटाळले नसते.

एकट्या २०२३ या वर्षात १०.७८६ शेतकऱ्यांनी, शेतीवर आधारित उपजिविका करणाऱ्यांनी जीवनाचा शेवट केला आहे. उपरोक्त सर्व संघटित क्षेत्रे असल्याने एकत्र आकडेवारी उपलब्ध तरी आहे. पण इतर आत्महत्यांचे काय ?

कारणे काही का असेनात, या सर्वच आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत. या सर्व आत्महत्यांमुळे, त्या त्या व्यक्तींचे कुटुंबीय आयुष्यभर आनंदात जगू शकतील, असे मला तरी वाटत नाही. त्यात या सर्व आत्महत्या या केवळ त्या त्या कुटुंबांचीच हानी करणाऱ्या असतात,असे नाही तर इतके बुद्धिमान, आपापल्या क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देऊ शकणारे मनुष्यबळ असे अकाली संपुष्टात येणे ही देशाचीच फार मोठी हानी आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या निदान राजकीय कारणांनी का होईना, सतत संसद, संबंधित राज्यांची विधान मंडळे, निवडणुका, प्रसार माध्यमे यात चर्चिल्या तरी जातात. पण इतर क्षेत्रातील आत्महत्यांचे काय?

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी भारत सरकारने विद्यार्थ्यांमधील आत्महत्या रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या निर्देशानुसार भारत सरकार आणि पुढे राज्य सरकारे काय धोरणे आखतात, काय उपाययोजना करतात, हे यथावकाश स्पष्ट होईलच. पण माझ्या दृष्टीने आजचे शिक्षण, मग त्यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, व्यावसायिक, शिक्षण, काही बाबतीत प्रशिक्षण अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाचा समावेश आहे .तर असे हे सर्व मानसिक दृष्ट्या सक्षम,सुदृढ, सजग नागरिक घडविण्यासाठी कुचकामी ठरत चालले आहे का ?
कुचकामी ठरत चालले असेल किंवा कुचकामी ठरले असेल तर ते का ? तसेच कायद्यांचे, नियमांचे पालन करणे हा कमीपणा नसून ती आपली स्वतः पोटी, कुटुंबाप्रत, समाज आणि देशापोटीची जबाबदारी आहे, हे समाजभान निर्माण करण्यासाठीही हे सर्व शिक्षण कुचकामी ठरत चालले आहे का? तसे जर असेल तर संबंधित शिक्षणक्रमात बदल , सुधारणा करण्यासाठी देशातील शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ञ, राजकीय नेते, समाज शास्त्रज्ञ आणि ज्या कोणास हा विषय महत्वाचा वाटतो त्यांनी विचार मंथन करून भावी काळात तरी सर्व प्रकारच्या आत्महत्यांना पायबंद बसेल, असे पाहिले पाहिजे. अन्यथा काही आत्महत्या,काही ना काही कारणांनी गाजतात, काही दिवस गेलेत की तो विषय मागे पडतो आणि पुन्हा अशी एखादी आत्महत्या झाली की पुन्हा चर्चेला येऊन विस्मृतीत जातो. या अशा सर्व आत्महत्या कायमच्या थांबतील, तो सुदिन लवकरात लवकर येवो.

देवेंद्र भुजबळ


— लेखन : देवेंद्र भुजबळ.
(लेखक हे माजी पत्रकार, माजी दूरदर्शन निर्माता आणि निवृत्त माहिती संचालक आहेत)
ईमेल : devendrabhujbal@4760gmail.com
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !