सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री नीला बर्वे
यांच्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…
‘जुनं तेच सोनं’ म्हणणारी जुनी पिढी, आणि ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ म्हणणारी नवी पिढी.! असे दोन पिढ्यातील असलेले अंतर जर दूर करायचे असेल तर जुन्या पिढीने नव्या पिढीला समजून घेण्याची गरज आहे. जुनी पिढी आपल्या घरातच दूध, साखर, कॉफी, वेलची एकत्र करून, चमच्याने ढवळून फेसाळलेली कॉफी, घरातील माणसांच्याच बरोबर गप्पा मारत, आस्वाद घेण्यात समाधान मानत होती. तेच समाधान आजच्या नव्या पिढीला ‘सीसीडीत’ निवांत बसून कॉफी घेण्यात लाभते आहे, इतकेच.!
नव्या पिढीचे आयुष्य गतिमान तर आहेच शिवाय त्यांच्या पुढे अनेक आव्हाने आहेत, त्यांचा स्वीकार करून त्यांना मोठे व्हायचे आहे….. पैसा कमवायचा आहे.! त्यासाठीच त्यांना असलेला मानसिक ताण-तणाव दूर करायचा आहे. म्हणूनच ते ‘कामाशिवाय बसू नये’ ही पाटी नसलेल्या सीसीडीची पायरी चढून… शांतपणे बसून, तिथल्या फेसाळलेल्या कॉफीच्या एकाच प्याल्याचा मनसोक्तपणे आस्वाद घेऊन, त्यांना नव्या जोमाने कामाला लागायचे आहे. हीच गोष्ट जुन्या पिढीने समजून घेऊन, त्यांचे विचार समजून घेतले, आपला हेका सोडून पाठीशी उभे राहिले तर जुन्या-नव्या पिढीतील अंतर कमी होऊन कौटुंबिक स्वास्थ्य मिळणार आहे. हे सिंगापूरच्या नीला बर्वे यांनी त्यांच्या “वाफाळणारा एकच प्याला” या कवितेतून जुन्या पिढीतील सर्वांना सांगितले आहे. नव्या दमाची, नव्या विचारांची ही नवी कविता काव्य रसिकांना नक्कीच आवडेल.
– विसुभाऊ बापट. मुंबई
“वाफाळणारा एकच प्याला”
फेसाळ वाफाळणारा कप
त्यात हवा तो स्वाद
घेत एक एक घुटका
मारा गप्पा तासन् तास !
सीसीडी मधील दृश्य हे परिचित
तिथे पितो कॉफी सांगणे प्रतिष्ठित ।
एक उत्तेजित करणारे पेय…
ही ओळख झाली पुराणी
नव्या दमाची नवी पिढी
गतिमान, ताणग्रस्त आयुष्यात
त्यांची मागणीच वेगळी ।
कुणी म्हणे,
लहान वय, बराच पैसा हाती
ना पुढचा विचार, कुठेही उधळती
परि दिसते तसे न असे कधी…
मिळविण्या तोच पैसा,
आव्हाने झेलिती
झगमगती दुनियेत
काम करिती
हवी शांतता त्यांसही,
ती येथे मिळती
‘कामाशिवाय बसू नये’ ची
इथे पाटी नाही।
असेल घाई
तर चहा घ्यावा कुठेही टपरीवरी
आस्वाद घ्याया
फेसाळणारी कॉफीच हवी।
आग्रहाने मुलाच्या,
मीही चढले सीसीडीची पायरी
कॉफीचे विविध प्रकार
समाजावितांना तो फुलारुनी येई
कौतुके बघता,
आनंदे आस्वाद घेता कॉफीचा
उमजले मला
येथे पिढीचे अंतर कमी होई ।
दुधात कॉफी जशी मिसळुनी जाई
गप्पांत त्याच्या मी हरवूनी जाई
अन् आठवे तत्क्षणी मज,
माझी आई !!
‘कॉफी पिणं ही थेर्र ‘…..
म्हणण्याचा जमान्यात
कॉफी, साखर, दूध अन् वेलची
एकजीव होई तो ढवळत राही
अन् आस्वाद घेताना
दोघी मिळुनी
बालिश गप्पात माझ्या
तन्मय होई ।
वाटते आज,
जपता जपता नाते तीन पिढ्यांचे
स्वत:च पिढीजात झाली ही कॉफी !!
– रचना : नीला बर्वे, सिंगापूर.
🌹दोन पिढ्यातील अंतर 🌹
खूप छान वर्णन केलंत आपण,
आता खरी तीच वेळ आली आहे. दोन्ही पिढ्या समजून घ्या.
जुनं ते सोनं असं ठणकावून सांगणारे आहेत अजून.
मन जुळून घ्या.
अभिनंदन नीला बर्वे जी.
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
🌹🌹