कशी गंमत असते नाही का ? आपण लहान असतो तेंव्हा आपल्याला मोठ्ठ होण्याची घाई झालेली असते. नंतर पस्तिशी चाळीशीच्या वयांत संसाराच्या जबाबदाऱ्या व इतर टेन्शनस् मुळे परत लहान झालो तर बर असं वाटायला लागतं.
५०/५५ च्या वयांत आपले आई-वडील व त्यांच्या पिढीतले सर्व, वयस्क झालेले बघून मन धास्तावते व आपलं भवितव्य तसे होणारं ह्याची काळजी वाटते. त्या वयात मी लिहिलेली हि शब्दरचना.
आता लवकरच ८० मधे पदार्पण होणार. शब्द रचना वास्तवता होऊ पहात आहे. शब्दांना स्वानुभवाचा अर्थ येऊ लागला आहे. त्यामुळेच शेवटची २ कडवी मनांत जास्त रूंजी घालत आहेत. ……
म्हातारपण देऊ नको रे देवा,
वृद्धपणा नको वाटे जीवा,
पाहून वार्धक्य अवती-भवती,
शतायुषाची वाटे भिती ।।१।।
नाही मी जरी तपस्वी गौतमबुद्ध,
दु:ख्खी होते पाहूनी अगतिक वृद्ध ।।२।।
अंधपणा येई तो त्यांच्या दृष्टी,
रंगहीन भासे त्यांना हि सृष्टी,
कधी असेल वाटत “बरे” बहिरेपण,
एकाकी मात्र होई त्यांचे जिणं ।।३।।
दांत करती मुखातून पलायन,
जीव दमे यांचा चावून-चघळून,
सोसवेना त्यांना देहाचे दुबळेपण,
वाढते यांच्या मनाचे हळवेपण ।।४।।
त्यांच्या पदरी असे अनुभवांचा खजिना,
उपयोग मात्र आता नसे त्याचा कोणा,
सुख-दु:ख्खाच्या आठवणीच त्यांना सोबत,
कारण, मुले-नातवंडे सदैव कार्यरत ।।५।।
उरी करती खंत न साध्य गोष्टींची,
मान-अपमान मात्र मनी अजुनी बाळगती,
कशास हवे एैसे गलितगात्री जिवन,
खेद वाटे पाहून जगणे अर्थहिन ।।६।।
नको ते आशीष “शतायुषी भव”,
कळेना जन-मानस जगण्या शंभरीवर ।।७।।
कुठे ते समाधिस्त ज्ञानी ज्ञानेश्वर,
आहे मी एक अति-सामान्य पामर,
जगणे-मरणे, भवितव्य मज ना स्वाधीन,
करू नको रे देवा मज परस्वाधीन ।।८।।
जळू दे मनीचे मान-अपमान, अहंकार,
जे असती सर्व दु:ख्खाला कारण,
वाढो सर्वांप्रत प्रेम, माया, सहानभुती,
स्थिर होवो ईश्वरनिष्ठा,
तिच देईल मज मन:शांती ।।९।।

– रचना : सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन, यु. के.
मन:पूर्वक आभार सुहास गोखले. 🙏🙏
Excellent article and poem, I really love your emotions… especially the eigth stanza of the poem…
मनापासून धन्यवाद, अंकूशराव तानाजी.
जीवनात असणाऱ्या रोगराई, दारिद्रय, गरिबी, आणि लाजिरवाणे गलितगात्र झालेले म्हातारपण या सर्व अवस्था पाहूनच राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला….
जीवनाचं आणि म्हातारपणाचं वास्तव मांडणारी आपली कविता अंतरंगात पोचते आणि वेदना होतात….
खरंच शेवटी हेच म्हणावं वाटतं आपले शरीर आणि सर्व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असतील, शरीरात चालन्या फिरण्याची, विचार करण्याची ताकद आहे तोपर्यंतच परमेश्वराने मानवाला जिवंत ठेवावे…. लाचार आणि परावलंबी जीवन खरंच नको….
मातृतुल्य सौ.फाटक मॅडम यांना वंदन