नवी मुंबई (प्रतिनिधी) : मराठीतून विज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीकोनातून मराठी विज्ञान परिषद नवी मुंबई विभाग आणि मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान तीन दिवसीय ५८ व्या राष्ट्रीय मराठी विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नवी मुंबई विभाग अध्यक्ष डॉ. किशोर कुलकर्णी यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली. हे अधिवेशन साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे पार पडणार आहे.
या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून प्राज इंडस्ट्रीज, पुणेचे अध्यक्ष डॉ.प्रमोद चौधरी हे उपस्थित राहणार असून या परिषदेचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या राज्यात व राज्याबाहेर मिळून ६५ संलग्न विभाग असून नवी मुंबई हा त्यातला एक विभाग आहे. म वि प च्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी एक वार्षिक अधिवेशन घेण्यात येते. या वर्षीचे हे नवी मुंबईतील ५८ वे अधिवेशन असेल. नवी मुंबईत प्रथमच अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे अधिवेशन भरत असल्याने नवी मुंबईकरांचे काही प्रश्न या अधिवेशनात मांडले जाणार आहेत.
या अधिवेशनाचे शनिवार ९ डिसेंबर रोजी ९.३० ते १.३० च्या दरम्यान उद्घाटन होणार आहे. तर दुपारी उद्योग आणि पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात डॉ. एम. पी. देशपांडे, रिलायन्स उद्योगचे डॉ. विजय हब्बु, एमएमआरडीए माजी प्रमुख केदारनाथ घोरपडे हे सहभागी होतील, तर अध्यक्षस्थानी एम. एम. ब्रह्मे हे असतील. सायंकाळी ६.३० वाजता कांदळवन जैव विविधता आणि जैव विविधता केंद्र या विषयावर डॉ. मानस मांजरेकर यांचे व्याख्यान होणार आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १० डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता पद्मश्री डॉ.राजेंद्र बर्वे यांचे भाषण होईल. तर १०.३० ते १ वाजे दरम्यान घनकचरा व्यवस्थापन या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात पद्मश्री डॉ. शरद काळे, डॉ. एस.एल.पाटील, स्त्री मुक्ती संघटनेच्या वृषाली मकदुम, नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे हे वक्ते सहभागी होतील.
सायंकाळी उद्योग आणि ऊर्जा समस्या आणि उपाय या विषयावर आयएएस अधिकारी बिपिन श्रीमाळी यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत विज्ञान एकांकिका होईल. तर ११ डिसेंबर रोजी वैज्ञानिक सहल होईल, असेही डॉ.किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, कार्यवाह अजय दिवेकर, उपाध्यक्ष अनिल केळकर, न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांचीही उपस्थिती होती.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800