Friday, November 22, 2024
Homeलेखविकासाकडून विनाशाकडे

विकासाकडून विनाशाकडे

गेल्या काही दिवसांतील बातम्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. कोलकत्ता येथील महिला डॉकटर वरील अत्त्याचार अन् खून, बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेले घृण अत्त्याचार, एका महिला प्राध्यापकाने संशोधक विद्यार्थ्यां कडून घेतलेली लाखो रुपयांची लाच … ही लांबच लांब साखळी आहे घोर, राक्षसी अपराधाची. आपल्या समाजाने सगळी शुचिता, चांगुलपणा, नैतिकता खुंटीवर टांगून अक्षरशः नंगा नाच चालवला आहे. ना कुणाला कायद्याची भीती राहिली ना चाड !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करायचे ते पोलीस चार पाच दिवस तक्रारीची दखल देखील घेत नाहीत. ज्यांना आपण कायदे कानून बनविण्यासाठी, समाजाचे कल्याण करण्यासाठी लोक प्रतिनिधी म्हणून निवडून देतो, तेही एकमेकावर कुरघोडी करण्यात, एकमेकांना शिव्या देण्यात दंग!समाजातले इतके अध्धपतन यापूर्वी पाहिले नव्हते आपल्या देशाने ! इतके गंभीर आरोप असूनही पोलीस एफ आय आर, तक्रार दाखल करायला मुद्दाम विलंब करतात. यापूर्वी देखील दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत या केसेस मध्ये पोलिसाची हलगर्जी, टाळाटाळ, पुरावे नष्ट करण्याचा, दिशाभूल करण्याचा डाव आपण अनुभवला. अशा केसेस तेव्हढ्या वेळ पुरत्या मिडीयाला टी आर पी साठी गाजावाजा करायला हव्या असतात. मग त्या कळत न कळत गायब होतात. आरोपी मोकाट सुटलेले असतात. अगदी महिनोन महिने जेलमध्ये गेलेले राजकारणी पुढारी मेडिकल ग्राउंड वर किंवा वकिली डावपेच वापरून जामिनावर सुटतात. बाहेर मोकाट फिरतात.

महिलांवर, लहान मुलीवर होणारे अत्त्याचार तर इतके निर्दयी, राक्षसी प्रवृत्तीचे असतात की अशा आरोपींना चक्क समाजासमोर हाल हाल करून फाशी द्यावे किंवा पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर करून झटका पटकी न्याय निवाडा करून टाकावा. कुणाचीही तक्रार असणार नाही. एरवी तारीख पे तारीख पडून, साक्षी पुरावे, मोटिव्ह तपासत बसले न्यायालय तर खऱ्या अर्थाने न्याय होणारच नाही. अनेक आरोपी तर पुराव्याअभावी सुटलेले, उजळ माथ्याने समाजात वावरताना आपण बघतो.

आजकाल तर मिडीयाच न्याय देखील करायला लागली आहे. प्रकरण नेमके काय आहे याचा म्हणजे निखळ सत्याचा शोध घेण्याऐवजी त्यात जात, धर्म, पक्ष शोधून प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करतात. स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्ष लोटली तरी आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून कोणत्याही घटनेकडे बघत नाही. हे जाती धर्माचे घाणेरडे राजकारण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललेले आपण बघतो. इथेही वेगवेगळे पक्ष, त्यांचे लोकनेते (!), अन् सोबतीला मीडिया, हे आगीत तेल ओतण्याचे काम यथा व्यवस्थित करतात! आपण देखील आपली बुध्दी गहाण ठेवून यांच्या मागे फरफटत जातो !

खरे तर सामान्य जनतेने तरी विवेकाने विचार करायला हवा. एक वेगळे, चांगले, निःपक्षपाती न्यारेटीव निर्माण करायला हवे. आपण देखील फक्त काठावर बसून निश्चल बघ्याची भूमिका घेत टाळ्या पिटत बसतो ! इतके थंड, निष्क्रिय आपण कधीही नव्हतो.पारतंत्र्याचा काळ आठवून बघा, तेव्हाची आपली ऊर्जा, देशभक्ती, तेव्हाच्या पुढाऱ्यांनी गुलामीच्या विरोधात जागवलेली चेतना, आपण दिलेला लढा .. हे सारे आठवून बघा.. स्वातंत्र्याने आपण सुधारण्याऐवजी बिघडलो, निष्क्रिय झालो, थंड रक्ताचे झालो हेच तुमच्या लक्षात येईल.

महिला वरील अत्त्याचार तर वाढलेले आहेतच. पण भ्रष्टाचार देखील कमालीचा वाढला आहे. राजकारणी पुढारी कसलाही कामधंदा, उद्योग न करता कोट्याधीश होताहेत. जमिनी लाटताहेत.
डॉकटर, प्राध्यापक, वकील, आय ए एस अधिकारी, सरकारी कर्मचारी.. असे एकही क्षेत्र उरले नाही जिथे भ्रष्टाचार नाही. सरळ हाताने, न्यायाने, कायद्याने कामच होत नाही. कुठेही प्रामाणिकपणा राहिलेला नाही. याचे कारण अशा आरोपात जन्मभराची अद्दल घडेल अशी शिक्षाच होत नाही.

वर उल्लेख केलेले महिला प्राध्यापिकेचे उदाहरण घ्या. अडीच लाख रुपये पगार घेऊनही या बाईला विद्यार्थ्यांकडून लाखोंची लाच घेण्याची हिम्मत होतेच कशी.? काही कुलगुरू देखील लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाले, भ्रष्टाचार करून मोकळे झाले. बेशरमांसारखे समजत मोकळे फिरायला लागले. कारण शिक्षाच होत नाही. खरे तर केवळ निलंबन न करता अशा व्यक्तीच्या सर्व सवलती, पेन्शन बंद करायला हव्या. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारापेक्षा दहा पट अधिक रक्कम त्यांनी सरकारी तिजोरीत दंड म्हणून जमा करायला हवी. अशा व्यक्तीच्या कुटुंबाचे, नातेवाईकाचे नाव जाहीर करावे. म्हणजे समाज देखील त्यांच्याकडे कुचेश्टेने बघेल.

महिला वरील अत्त्याचार करणाऱ्या, अन् भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींना समाजाने वाळीत टाकले पाहिजे. त्यांचे जगणे मुश्कील होईल अशी उघड शिक्षा समाजानेही त्यांना दिली पाहिजे. कुणीही असे कृत्य करायला पुन्हा धजणार नाही अशी कडक, कठोर शिक्षा वेळ न दवडता झाली पाहिजे. तरच कदाचित पुन्हा कुणी असे काळे कृत्य करावयास धजावणार नाही.

या सर्वाचा उमलत्या पिढीवर अतिशय वाईट परिणाम होतो आहे. हे असे अत्याचारी, बलात्कारी, भ्रष्टाचारी रोल मॉडेल्स आपण त्यांच्या पुढे ठेवणार आहोत का ? हीच शिक्षा या कोवळ्या जीवांना देणार आहोत का ? इतर देशांनी आपल्या देशाकडे वाईट नजरेने, घृणेने बघण्याची आपण वाट पाहणार आहोत का ?

सरकार यात काही करू शकेल अशी सध्या तरी लक्षणे दिसत नाही. कारण सरकारी यंत्रणाच यात सामील आहे. या अव्यवस्थेचा हिस्सा आहे ! आता समाजानेच खडबडून जागे व्हायला पाहिजे. नवी क्रांती, खरे तर उत्क्रांती घडली पाहिजे. जाती धर्माच्या भिंती ओलांडून एकत्र येत चळवळ उभारली पाहिजे. तरच काही शक्य आहे. वेळ लागेल, कठीण आहे पण अशक्य नाही !

— लेखन : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments