श्री विकास खारगे सर, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांचा आज, १७ मार्च रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख….
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांची व माझी पहिली भेट ते यवतमाळला जिल्हाधिकारी असताना झाली आणि ती अजूनही कायम आठवणीत आहे.
आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कामाची सुरुवात १२ मे २००० रोजी अमरावतीला झाली. या कार्यक्रमाला खारगेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार आय आर एस, मनपा आयुक्त श्री धनराज खामतकर, आय.ए.एस. हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२००० साली हॉटेल, विश्राम भवन या गोष्टी फारशा प्रचलित नव्हत्या. खारगेसाहेबांचे जेवण माझ्याच घरी ठेवले होते. माझी पत्नी विद्या व तिच्या मैत्रिणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला आलेल्या दोनशे मुलांचा स्वयंपाक करीत होत्या. खारगेसाहेबांना मी घरी जेवण करायला घेऊन आलो आणि मला आठवले की आपण आपला डायनिंग टेबल कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठवलेला आहे. जिल्हाधिकार्यांना खाली बसून जेवण देणे मला प्रशस्त वाटेना. माझा चिंताग्रस्त चेहरा पाहून खारगेसाहेब म्हणाले, काठोळे काही अडचण आहे काय ? मी नम्रपणे अडचण सांगितली. ते म्हणाले आपण खाली बसून जेवण करू ! एक आयएएस अधिकारी, जिल्हाधिकारी खाली बसून जेवण करतो ही तशी दुर्मिळच गोष्ट. आणि त्यामुळे ते कायमचे माझ्या लक्षात राहिले.
साहेब, वेगवेगळ्या ठिकाणी गेले पण सतत मी त्यांच्या व ते माझ्या संपर्कात राहिलो आहोत. साहेबांचा फोन नंबर जरी बदलला तरी साहेब एसएमएस करून बदललेला नंबर कळवायचे.
आज खारगेसाहेब एवढ्या मोठ्या पदावर आहेत परंतु त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पूर्ण मंत्रालयाला आदर्शवत आहे. मी फारच महत्वाचे सार्वजनिक काम असले तरच साहेबांना एसएमएस किंवा फोन करतो. आणि साहेबांचे वैशिष्ट्य असे की लगेच त्यांचा प्रतिसाद मिळतो. एका महत्त्वाच्या कामासाठी मी रात्री त्यांना १२ वाजून २२ मिनिटांनी एसएमएस केला. उद्या सकाळी आपल्याला प्रतिसाद मिळेल असे वाटले. परंतु लगेच १२ वाजून ३६ मिनिटांनी साहेबांचा प्रतिसाद आला.
तीच गोष्ट अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा स्मारक ट्रस्टची. मी गाडगे महाराज यांच्या मंदिरात गेलो. त्या ठिकाणी गाडगे महाराजांच्या समाधी मंदिराचा विकास आराखडा चार वर्षापासून मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे असे मला व्यवस्थापकांनी सांगितले. मी लगेच श्री खारगेसाहेबांना फोन लावला. साहेबांनी फोन उचलला नाही. पण पाचच मिनिटात साहेबांचा फोन आला. मी साहेबांना वस्तुस्थिती सांगितली. साहेब म्हणाले ती फाईल रिवाईस करून माझ्याकडे पाठवा. मी लक्ष घालतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जेव्हा स्वतःहून फोन करतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी किती विनयशीलता असेल त्याचा प्रत्यय येतो.
मध्यंतरी आमच्या मिशन आयएएसच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या उद्योजकता विकास केंद्राने करियर कट्टा हा उपक्रम सुरु केला. डाँ. ज्ञानेश्वर मुळे, आय एफ एस, यशवंत शितोळे हे त्याचे सूत्रधार. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मान्यवरांना निमंत्रित करायचे होते. खारगेसाहेबांना निमंत्रित करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी साहेबांना फोन केला. साहेब म्हणाले, काठोळे त्या तारखेला मी उपलब्ध आहे. पण नेमके त्या दिवशी काय होईल ते सांगता येत नाही.
कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला. संबंधित अधिकारी म्हणाले खारगेसाहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे .साहेब फोनवर आले आणि मला म्हणाले उद्या भरपूर सभा आहेत. मला उद्याला कार्यक्रमांमध्ये जॉईन होणे जमणार नाही. वेळेवर तुमची फजिती होऊ नये म्हणून मी तुम्हाला अगोदरच कळवले आहे. किती ही दक्षता ! एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्यासारख्या सामान्य माणसाची एवढी मोठी दखल घ्यावी ही खरोखरच फार मोठी जमेची बाजू आहे .
“घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी” या म्हणीप्रमाणे साहेबांचे आपल्या इचलकरंजी या गावाकडे लक्ष असते. नुकतेच ते आवर्जून ज्या शाळेत शिकले त्या शाळेमध्ये गेले. शिक्षकांना भेटले. सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या घरी जाऊन आले .त्यांना किती किती धन्य वाटले असेल! आज मुलांना आई वडिलांना भेटायला वेळ नाही आणि आई वडिलांना मुलाला भेटायला, बोलायला वेळ नाही .अशी परिस्थिती आहे. परंतु हा देव माणूस आपल्या गावाकडे वळून पाहतो.
सुरेश भटांच्या ओळीमध्ये सांगायचे तर – ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे … मी मात्र मागे वळून पाहतो मागे कितीजण राहिले …
मागे वळून पाहणारे व बुडत्याला काठीचा आधार देणारे खारगेसाहेब आज एक आदर्श आयएएस अधिकारी म्हणून मंत्रालयातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. वन खात्यात सचिव असताना त्यांनी केलेले कार्य इतिहासात नोंद करण्यासारखे आहे. हे सगळे करीत असताना त्यांनी आपला प्रामाणिकपणा ,
साधेपणा कायमचा जपला आहे. साहेब जेव्हा जेव्हा अमरावतीला येतात तेव्हा तेव्हा आठवणीने मला फोन करतात किंवा निरोप देतात. मी उद्या अमरावतीला येणार आहे. उद्याची सभा संपल्यानंतर तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी या. आपण सोबत जेवण करू.
मागे डॉ.पंजाबराव देशमुख प्रबोधिनी मध्ये वन विभागाचा कार्यक्रम होता. साहेबांचा व्यस्त दौरा होता. तरीपण साहेबांनी मला दुपारच्या जेवणाला निमंत्रित केले.
मला कधीकधी आश्चर्य वाटते मी प्राध्यापक, लेखक माणूस आणि साहेब उच्चपदस्थ आयएएस अधिकारी . पण साहेबांनी ही अति उच्च अधिकाऱ्याची वस्त्रे केव्हाच काढून ठेवलेली आहेत. एक सामान्य माणूस म्हणून मला कसं जगता येईल यासाठी ते सतत सहजपणे राहतात.
परवा मला मंत्रालयात जायचे होते. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड त्यांनी माझे भरगच्च कार्यक्रम ठेवले होते. मी साहेबांना भेटण्याची वेळ मागितली. साहेबांनी दिली. मी व निवृत्त माहिती संचालक तथा आमच्या मिशन आयएएसचे राज्य समन्वयक श्री देवेंद्र भुजबळ, खारगे साहेबांना भेटायला मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. आम्ही वेळे आधीच पोहोचलो. साहेबांनी आमचे मनापासून स्वागत केले. साहेबांना मी काही पुस्तके सप्रेम भेट दिली. साहेबांबरोबर फोटो काढले. आम्ही कितीतरी दिवसानंतर भेटत होतो. परंतु आमच्यातला जो स्नेह होता तो आहेच व पुढेही राहील.
कधी कधी मनाला असं वाटते की प्रत्येक आयएएस अधिकारी, प्रत्येक आयपीएस अधिकारी, प्रत्येक सनदी अधिकारी खऱ्या अर्थाने खारगेसाहेबांसारखा वागला तर या महाराष्ट्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” या विचाराने साहेब वागतात. आवर्जून खादीचे कपडे घालतात.
2 ऑक्टोबर असो की 30 जानेवारी असो, साहेब आठवणीने खादी ग्रामोद्योगाच्या दुकानात वहिनीसाहेबांना सोबत घेऊन जातात. आणि त्या ठिकाणी खादीचे कपडे खरेदी करतात. आज जेव्हा जिकडे तिकडे हाय फाय चा जमाना आहे .त्या हाय प्रोफाईलमध्ये वावरणारा हा माणूस स्वतः मात्र खादीच्या साध्या कपड्यांमध्ये वावरतो ही खरोखर नोंद करण्यासारखी गोष्ट आहे.
साहेबांच्या कार्याची ओळख प्रशासनातील आणि मंत्रिमंडळातील सर्वच लोकांना आहे आणि म्हणून जेव्हा उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली, पूर्ण जगात हाहाकार झाला तेव्हा महाराष्ट्रातील जे पर्यटक उत्तराखंडमध्ये गेलेले होते त्यांना सुखरूप आणण्याची जबाबदारी शासनाने माननीय श्री विकास खारगे यांच्यावर सोपवली.आणि त्यांनी ती आपल्या कुशल प्रशासनाने यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
कोविडच्या काळात आमचे मित्र प्रा. प्रवीण विधळे यांनी कोवीड दूर करण्यासाठी एक उपाय सुचवला .मी साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली. साहेबांनी लगेच त्यावर पाऊल उचलले. आपल्या सहकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्या सहकाऱ्यांनी प्रवीण विधळे यांच्याशी संपर्क साधला. पूर्ण प्रकल्प समजावून घेतला. खरं म्हणजे कोविडच्या काळामध्ये मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव किती व्यस्त असतील ? परंतु तरी देखील आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी या चांगल्या गोष्टीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला.
खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर माणूस आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे इतरांकडे लक्ष देऊ शकत नाही पण खारगेसाहेब त्याला अपवाद आहेत.
मागील ४ फेब्रुवारीला साहेबांच्या मुलाचे लग्न झाले. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत. पण या लग्नाची पत्रिका पाठवायला ते मला विसरले नाहीत. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पदावर असलेला आय ए एस अधिकारी किती व्यस्त असतो याची आम्हा सर्वांना जाणीव आहे .परंतु खारगे साहेबांनी यावेळेस त्यातूनही वेळ काढून आपले वेगळेपण सिद्ध करून दाखविले आहे.
जितनेवाले कोई अलग काम नही करते … वह हर काम अलग ढंग से करते है या शिव खेरा यांच्या ओळी मला पदोपदी जाणवतात आणि एवढ्या मोठ्या पदावरील माणूस आपल्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमात आमच्या पाठीशी उभे आहेत व राहतीलही. अशा या विशाल हृदयाच्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहणाऱ्या व माणुसकीला जपणाऱ्या हृदयशील व कर्तृत्वशील व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. असेच चांगले आयएएस अधिकारी महाराष्ट्राला सतत मिळत राहोत आणि साहेबांचा हा प्रवास उत्तरोत्तर प्रगतीकडे जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो.

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचन्द्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800