मराठी साहित्य विश्वात अत्यन्त आदराने, प्रेमाने घेतले जाणारे नाव म्हणजे डॉ विजयाताई वाड होत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या एका सखीने केलेले हे हितगुज प्रातिनिधिक आहे…..
“माझी मराठी बोली कौतुके” म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेला हा मराठी भाषेचा वेलू आज बहू विस्तार होत गगनावरी गेला आहे.
यासाठी प्राचीन संत, पंत आणि शाहीरांनी जेवढी ही वेल समृद्ध केली, वाढवली, तेवढीच अर्वाचीन साहित्यिकांनी ती बहराला आणली. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित सोबत सर्वांगानी तिला खतपाणी घालून असंख्य नामवंत साहित्यिक रत्नांनी विस्तारित केले आहे..
तोच वारसा पुढे चालवण्यासाठी आज असंख्य नामवंत साहित्यिकांनी ही साहित्यसेवा अविरत ठेऊन या वेलीचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यातील एक महत्वाचे नामवंत नाव म्हणजे डाॅ.विजयाताई वाड.
साहित्य क्षेत्रात अतिशय आदर, आपुलकी, प्रेम आणि सन्मान मिळवलेल्या विजयाताईंनी आज वयाची ७६ वर्षे पूर्ण केली पण त्यांच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त साहित्य निर्माण करण्याचे अनमोल कार्य केले आहे. म्हणूनच या आधुनिक सरस्वतीचे साहित्यिक योगदान फार मोलाचे आहे.
कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र ललित वाङमया बरोबरच बालसाहित्य, कुमार साहित्याची विपुल निर्मिती त्यांनी केली. आकाशवाणी, दूरदर्शनसाठी मालिका लेखन केले. विश्वकोशाच्या निर्मितीचे फार मोलाचे कार्यही त्यांनी केले.
शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात मोलाची भर घालणारी ही सरस्वती असंख्य दिग्गजांच्या हस्ते अनेक श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित झाली आहे. इतकी प्रसिद्धी मिळवूनही त्यांच्याइतकी विनम्रता मी कुठे अनुभवली नाहीं. अत्यंत मधुर वाणी आणि प्रेमळ, लोभस, सालस, विनम्र व्यक्तीमत्व असणारी ही शारदा आमची “आई” आहे.
तिच्या दर्शनाने मनाला सुखशांती मिळते. तिच्या प्रेमळ स्पर्शाने उर्जा निर्माण होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्षे कार्य करणा-या तसेच या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तळमळीने पंतप्रधान मोदीजींना लाखो पत्र पाठवण्याची प्रेरणा देणारी ही सरस्वती आज ७७ वर्षात पदार्पण करीत आहे.
अजूनही त्यांची लेखनसेवा तेवढ्याच वेगाने, जिद्दीने चालू आहे.
एकाच वेळी दहा प्रकाशकाकडून १११ बालपुस्तिका प्रकाशित करण्याचे मौलिक कार्य या वर्षी त्यांनी करून घेतले आहे.
आपल्या आईचेच कार्य आणि तिचा समर्थ वारसा पुढे चालवणारी डाॅ.निशिगंधा वाड ही सर्व गुणसंपन्न अभिनेत्री त्यांचे गौरवास्पद कन्यारत्न होय.
मराठी साहित्य आणि कलाक्षेत्रात या दोघींचे कार्य अनमोल आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. विजयाताई आमच्या “आम्ही सिद्ध लेखिका” संस्थेच्या ज्येष्ठ सल्लागार समितीवर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो
डाॅ.विजयाताईंचा आज वाढदिवस…त्यांना प्रदीर्घ, संपन्न आयु आरोग्य आनंद आणि साहित्य निर्मितीचे अखंड समाधान मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
लाभो यश किर्ती सुख शांती
आयु आरोग्य आणि समृद्धी
या सा-या सदिच्छांना
घेऊन आले मी सांगाती !
आजच्या दिनी हीच भेट
अर्पण करते तुम्हाप्रति
स्विकारावी ती तुम्ही
ही माझी नम्र विनंती.

– लेखन : प्रा.पद्मा हुशिंग.
अध्यक्ष, आम्ही सिद्ध लेखिका ठाणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
विजयाताईंशी माझा परिचय सिद्धहस्त लेखिका आणि सखी माधवी कुंटेमुळे झाला. आणि लगेच मैत्रही जुळले.दुर्दैवाने मी कॅनडात फेकली गेले. देहात हजारो मैलांचे अंतर पडले. तरी मनाचे सामिप्य घटले नाही. माझ्या एकसष्टी समारोहावेळी माझे १६ व्य वर्षी केलेले लिखाण आणि ६१ व्या वर्षात केलेले लिखाण पर्काशित करण्यात येणार होते. त्या वेळी विजयाताई विश्वकोश तयार करण्याच्या कामात खूप व्यस्त होत्या. विरोधकांचा सामनाही होता. त्याचा त्या रणरागिणीच्या कौशल्याने पार पाडत होत्या. तरी त्यांनी या पुस्तकांच्या प्रकाशनाचे निमंत्रण आवर्जून स्वीकारले. माझ्या आईने सांभाळल्यामुळे माझे सोळाव्या वर्षी केलेले लिखाण शाळकरी मुलीचा डायरी प्रकाशित करताना त्यांनी माझ्या आईचा सुजाण माता असा उल्लेख करून त्या भरभरून बोलल्या. योगायोग असा की भरारी प्रकाशनने माझे महाराष्ट्र धर्म वाढवावा या पुस्तकाचा प्रकाशन समारोह जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या हस्ते ठेवला आहे, इतकेच मला ठाऊक होते. पण त्या दिवशी जानेवारी महिन्या पाऊण शतक पूर्ण करणाऱ्या विजयाताई आणि जुलैत पूर्ण करणारी विजया कप्तान म्हणजे स्मिता भागवत यांचा एकत्रित सत्काराचे भरारी प्रकाशनच्या लता गुठेने औचित्य साधले. असे आनंदाचे क्षण स्मृतीमंजुषेत अमर ठरतात. गाठीभेटी कमी झाल्या तरी मोजक्या भेटीतील स्मृतींचा दरवळ मन प्रसन्न करतो. या वाढदिवशी त्यांची प्रकृती बरी नसली तरी येत्या वर्षीचा वाढ दिवस आणि नंतरचे अनेकानेक वाढदिवस त्यांच्या वाचकांना उत्साहाने साजरे करण्याचे भाग्य लाभो, हिच ईशचरणी प्रार्थना. (विजया कप्तान – स्मिता भागवत)
खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व…पद्मा ताईंनी समर्पक वर्णन केले आहे
आदरणीय पद्मा ताईंनी दिली
विजयाताईंना भेट सुरेख शब्द फुलांची
यापेक्षा सुंदर काय असेल
भेट वाढदिवसाची
भारावून गेलं मन
विजयाताईंच्या कर्त्रुत्वाने
सर्व कला गुणांचं आकाश
उभं केलं सहज पद्माताईने
खरच विजया वाड
आहे कल्पतरुचं झाड
त्यांच्या प्रेम छायेखाली झाली
शेकडो विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ
अवघा महाराष्ट्र घडवला
विजयाताईंच्या संस्कारमय वाङमयाने
मन प्रसन्न होऊन जातं
त्यांच्या कथा कादंबरी अन् काव्याने
शैक्षणिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात
उमटवला विजयाताईंनी खास ठसा
अनाथ मुलींची माऊली होण्याचा
या गुरुमाऊलीने जपला वसा
मराठी विश्वकोशात सजवला
ताईंनी कवितांचा गाव
त्यांच्या महान कार्याने घेतला
आबालवृद्धांच्या मनाचा ठाव
विजयाताईंना सारे सारखे रंक वा राव
आदरणीय विजयाताई वाड यांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
उत्तम आरोग्यासह लाभो त्यांना
आनंदाचं सुखाचं दीर्घायुष्य हीच सदिच्छा
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई 🙏🌹
डॉ विजया वाड यांचं कार्य आभाळाएवढं उत्तुंग आहे. आपण त्यांच्या कार्याचा फार सुंदर आढावा घेतला आहे.विजयाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
विजयाताई वाड साहित्य क्षेत्रातील आदरणीय व्यक्ति. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
विजयाताई वाड हे एक उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.साहित्यक्षेत्रात त्यांचं योगदान खूप मौल्यवान आहे.त्यांनी लेखक कवी आणि वाचकही घडवले.
पद्माताईंनी त्यांचे मनोगत आतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे.
विजयाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!