जागतिक महिला सप्ताहनिमित्ताने जाणून घेऊ या नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व..
– संपादक
माझा आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी मॅडम यांचा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. त्यात आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या मध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू हे देखील उपस्थित होते. मॅडमनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आमच्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. याच कार्यक्रमामध्ये श्री सुरेश प्रभू यांनी कोकण भागामध्ये मिशन आयएएस सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असेही आश्वासन दिले होते.
योगायोगाने विजयालक्ष्मी मॅडम नागपूरला विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाल्या. विजयालक्ष्मी मॅडमचा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील अनुकूल कल लक्षात घेता आम्ही त्यांना भेटलो. माझ्याबरोबर आय ए एस मिशनच्या नागपूरच्या संचालिका सौ सोनाली बुंदे मिशन आय ए एस नागपूरचे संचालक श्री अनिल मोहोड, श्री राजेश मोहोड, प्रा. रमेश पिसे, श्री संजय सवाई थूल व विद्यार्थी संचालक डॉ.हर्ष यादव हे होते.
नागपूर विभागातील येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये नागपूर वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मिशन आयएएस हा प्रकल्प राबवावा यासाठी आम्ही एक प्रस्ताव तयार करून आणला होता. विजयालक्ष्मी मॅडमनी प्रस्ताव वाचला आणि आपला अनुकूल अभिप्राय लगेच व्यक्त केला. त्या म्हणाल्या हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मला हा उपक्रम आमच्या नागपूर विभागात राबविणे आवडेल. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना आमच्या प्रस्तावावर स्वतःच्या हस्ताक्षरात या प्रस्तावावर तात्काळ अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. आणि त्या मला म्हणाल्या, सर जिल्हा परिषद बाजूलाच आहे, आपण लगेच जिल्हा परिषदेमध्ये जा आणि हा प्रकल्प सुरुवातीला नागपूर जिल्ह्यापासून सुरू करा.
आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेलो.नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा आय.ए.एस. यांना भेटलो .विभागीय आयुक्तांनी स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये या प्रस्तावावर शिफारस केल्यामुळे त्यांनाही लगेच कार्यवाही करणे आवडले आणि लगेच त्यांनी नागपूर जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना बोलावले. त्यांना सूचना केल्या आणि हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या शाळांमध्ये व इतर संस्थांमध्ये राबविण्याचा आदेश दिला .आणि एक चांगला प्रकल्प नागपूर विभागात सुरू झाला .
अनेक वेळा प्रस्ताव येतात आणि जातात. परंतु श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी मॅडम यांनी इतक्या तत्परतेने हा प्रस्ताव स्वीकारला आणि अमलातही आणला .खरं म्हणजे काही तासात हे सगळं झालं .पत्र काढणे, ते जिल्हा परिषदेला पाठवणे ,मग त्यावर कार्यवाही होणे याला विलंब लागू शकतो. हे लक्षात घेऊन विजयालक्ष्मी मॅडमनी स्वतःच आपल्या हस्ताक्षरात आमच्या प्रस्तावावर सौम्या मॅडमला सविस्तर लेखी सूचना दिल्या व त्या अमलात आणण्याची सूचनाही केली.
विभागीय आयुक्तांच्या या सूचनेमुळे आज नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचा मिशन आयएएस हा प्रकल्प नियमितपणे सुरू झालेला आहे .या कामासाठी मी स्वतः आणि आमचे नागपूरचे संचालक मंडळ कामाला लागलेले आहोत.
नागपूर बरोबरच आम्ही सर्वप्रथम निवडला तो गडचिरोली जिल्हा. मागासलेला, नक्षलग्रस्त जिल्हा. या भागात आमचे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती वडसा देसाईगंज येथील श्री नंदूभाऊ नरोटे आम्हाला मदत करावयाला आले.
त्यानंतर आम्ही निवडला तो चंद्रपूर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये आम्हाला मदत करायला चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोपणा येथील आमचे विभागीय संचालक श्री संजय ठावरी व शिक्षक आमदार हे मदतीला आले .नागपूरची जबाबदारी आम्ही सोनाली बुंदे, श्री प्रशांत भाग्यवंत प्रा. रमेश पिसे यांच्यावर सोपवली. त्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात येणारी महाविद्यालये तसेच बहादुरा बेसा पिंपळा, हुडकेश्वर, काटोल, मौदा, कामठी या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन या मिशन आयएएसला हातभार लावला. या उपक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण मदतीला आले. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील जागा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा उपक्रमासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी जागा देखील व इमारती देखील उपलब्ध करून दिल्या.
एक चांगला प्रकल्प नागपूर विभागात प्रारंभ झालेला आहे .आणि याचे श्रेय जाते ते नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री आय.ए.एस यांनाच. त्यांच्या सौजन्याने मला त्यांच्या सरकारी विदर्भ भवन ह्या बंगल्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा मान देखील मिळाला. आम्हाला नागपूरला श्रीमती विजयालक्ष्मी मॅडमला भेटायला जायचे असले तर एक एसएमएस पुरेसा आहे. मॅडम लगेच भेटायला बोलावतात. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्हाला मॅडमची लगेच भेट घेता येते. एक आयुक्त काय करू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे विजयालक्ष्मी बिदरी यांना मानावे लागेल.
विजयालक्ष्मी मॅडमचे वडील श्री शंकर बिदरी हे देखील आयपीएस अधिकारी म्हणून नावलौकिकास आलेले आहेत. चंदन तस्करी मध्ये संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या वीरप्पनचा सफाया करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या वडिलांनी आपल्या आयपीएस असण्याच्या कार्यकाळावर एक पुस्तक देखील लिहिलेले आहे. “सत्यमेव जयते” हे त्या पुस्तकाचे नाव आहे. वडील आयपीएस अधिकारी असल्यामुळे नकळत त्यांचे गुण, त्यांची तत्परता, त्यांची तेजस्विता आणि त्यांची तपस्विता विजयालक्ष्मी मॅडमच्या अंगी उतरली आहे आणि म्हणूनच कोणतेही काम अतिशय तत्परतेने करण्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
आजही आमचे नागपूरचे सर्व संचालक वेळोवेळी विजयालक्ष्मी मॅडमला भेटतात. त्यांचे मार्गदर्शन घेतात. आणि मिशन आयएएस नागपूर विभागातील वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये राबविण्यासाठी सातत्याने काम करतात. हे सगळे करण्याचे श्रेय व प्रेरणा विजयालक्ष्मी बिदरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच आहे. हे वेगळे सांगणे न लगे.
अशा या कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर व लगेच निर्णय घेणाऱ्या विभागीय आयुक्त अधिकारी असणाऱ्या विजयालक्ष्मी बिदरी यांना जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त मानाचा मुजरा.
— लेखन : प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालकमिशन आयएएस अमरावती.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मानाचा मुजरा