१६ डिसेंबर.
भारताच्या इतिहासांतील दैदिप्यमान दिवस. कारण १९७१ च्या भारत पाक बांगला मुक्ति युद्धात भारताला अभूतपूर्व यश मिळाले. थोडे थोडके नाही ९३००० पाकिस्तानी सैनिक विनाशर्त, हातची शस्त्रे भारताच्या चरणांवर ठेवून, खाली मान घालून शरण आले. अगदी वरिष्ठ जनरल नियाझी पासून सामान्य सैनिकापर्यंत. हे यश साधेसुधे नव्हते.
शरणागति हे सैनिकाच्या जीवनातले सर्वात मोठे अपयश असते. मानहानी पेक्षा प्राणहानी स्वीकारायला सैनिक अधिक पसंत करतो. ह्या तहानंतर “बांगला देश” नावाचे चिमुकले राष्ट्र जन्माला आले. पूर्व पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नामोहरम होऊन, तिथे मित्रराष्ट्र आले. आपल्या साठी हे खूप भरघोस यश होते.
भारताची व बांगला देशची मैत्री प्रस्थापित झाली. दोन राष्ट्रात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. म्हणून १६ डिसेंबर ‘मैत्री दिवस‘. ह्या नावानेही साजरा केला जातो.
विद्यमान सैनिक, ७१ च्या युद्धातील शहीद, त्यांचे कुटुंबीय, निवृत सैनिक आदींचा सत्कार केला जातो.
नुकताच ईजिप्त मध्ये (कैरो), जिथे माझा सुपुत्र श्री. अजित विनायक गुप्ते भारताचा राजदूत आहे त्याने विजय दिवस / मैत्री दिवस सुवर्ण जयंती म्हणून खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. भारताचे राजदूत, बांगला देशचे राजदूत, अनेक राजकीय पुढारी, वरिष्ठ सैन्याधिकारी, चित्रसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मिळून सुमारे १५० लोक उपस्थित होते. अॅम्बॅसडर श्री. अजित गुप्ते ह्यांनी उपस्थितांच्या सन्मानार्थ मोठी मेजवानी आयोजित केली होती .
दोन्ही देशांच्या नावाजलेल्या कलाकारांनी नृत्य, गायनाचे करमणूक कार्यक्रम सादर केले. संपूर्ण वर्षभर, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी देशभर ‘विजय मशाल‘ चे आयोजन केले आहे. सैनिकांचा केवढा हा आदर ! गावोगावी, खेडोपाडी फिरून मशाल योद्ध्यांना मानवंदना देत आहे.
हाती सुवर्णमशाल घेऊन धावत किंवा जीपवर सैनिक आणि अधिकारी घरोघरी जाऊन सैनिकांचा सत्कार करत आहेत. माननीय मोदीच असा आदर व्यक्त करू शकतात. ही सुद्धा अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आहे.
काही वर्षां पूर्वी सांगली येथे दरवर्षीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर ‘विजय दिवस‘ साजरा झाला. त्यात आम्ही, माझे पती मेजर विनायक गुप्ते आणि मी निमंत्रित म्हणून गेलो होते. सगळा गाव हा सोहळा पाहण्यास उपस्थित होता. मैदानावर सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते. त्यांच्यासमोर मलाही मानवंदना म्हणून माझी कविता सादर करण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी भाग्याची गोष्ट.
माझी कविता :
सैनिक हो
सरहद्द रक्षणासाठी
तुम्ही लढता दिन राती
प्राणांची लाऊनी बाजी
लढती वीर मर्द बाजी
एकच ध्येय हो तुमचे
करणे रक्षण देशाचे
डोळ्यात तेल घालून
प्राणांची लावून पणती
ना बर्फ, ऊन, वारा पाहून
खडा पहारा देऊन
सैनिका पुढेच जायाचे
न मागे वळून पाहायचे
वृद्ध मातापिता पुत्र, पत्नी विसरून
कर्तव्य पाळणे तयाचा धर्म
सैनिकां जात, ना धर्म
तो पुत्र भरतमातेचा
प्राणांची देत आहुती
जरी प्राण ज्योत मालवली
अभिमाने सांगे माऊली
हा भारतमातेचा शूरवीर पुत्र
मी जन्मदात्री मात्र
कर्तव्य तयाने केले
तिरंगा हाती घेऊन
जरी देह तयाचा पडला
जयहिंद चा देत देत नारा
तो पुढे पुढे जाय
सैनिक हो तुम्ही लढता आमुच्या साठी
कौतुक सोहळा आज तुमच्या साठी
जयहिंद! जयहिंद ! जयहिंद !
जय हिंद की सेना 🙏🙏🙏

कवयित्री : सुलभा गुप्ते.
अतिशय सुंदर सुलभाताई…वाचताना अभिमानाने ऊर भरुन आले..
तुमच्या कवितेने तनु रोमांचीत झाली